Vitamin C Health Benefits in Marathi: आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती उत्तम असली, तर कोणतेच विषाणूजन्य आजार होऊ शकत नाहीत. शरीर सुदृढ, ठणठणीत व आरोग्यसंपन्न ठेवायचे असल्यास योग्य आहार, वेळेत व पुरेशी झोप घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. निरोगी शरीर ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या शरीराला प्रत्येक जीवनसत्त्वाची गरज असते. व्हिटॅमिन सी शरीरासाठी अधिक गरजेचे आहे.
व्हिटॅमिन सी हे एक असे जीवनसत्त्व आहे; जे आपल्या निरोगी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समाविष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराचे योग्य पद्धतीने पोषण व्हायचे असेल, तर प्रथिने, व्हिटॅमिन, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, खनिजे, लोह असे सर्व घटक शरीराला पुरेशा प्रमाणात मिळणे आवश्यक असते. आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी गरज का आहे, याच विषयावर बोलताना अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चटर्जी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे.
“ऋतू बदलत असताना आपल्याला आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. शरीरामध्ये जर शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल, तर थकवा येणे, वजन वाढणे, सांधेदुखी, डोळे कमकुवत होणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन सी हे अँटीऑक्सिडेंट म्हणूनदेखील काम करते. ते शरीरातील पेशींना बांधून ठेवते”, असे डॉक्टर चटर्जी सांगतात.
(हे ही वाचा : Papaya: पपईचा आहारात समावेश केल्यानं झपाट्याने वजन कमी अन् कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं? तज्ज्ञांनी दिलं उत्तर…)
डॉक्टर सांगतात, “व्हिटॅमिन सी’मुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि त्यामुळे संसर्गाविरोधात लढण्यास आपल्याला मदत मिळते. अनेक पोषक तत्त्वांचा साठा असल्याने ‘व्हिटॅमिन सी’ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ‘व्हिटॅमिन सी’मुळे रक्तवाहिन्यांचे कार्य अडथळ्याविना सुरू राहते. रक्तदाबाची समस्याही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन सीयुक्त आहाराचे सेवन केल्यास तणाव कमी होण्यास मदत मिळते आणि आरोग्य निरोगीदेखील राहते, असे ते सांगतात.
व्हिटॅमिन सी चे मुख्य स्रोत
व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. फळं आणि भाज्या व्हिटॅमिन सीचा मुख्य स्रोत आहेत. रोगप्रतिकारक शक्तीच्या योग्य कार्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. संत्री, लिंबू, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, आवळा, पेरू, किवी, पपई यांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश असावा, असा सल्ला डाॅक्टर देतात.
आपल्या आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश करणं, ही गरज बनली आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं. शरीराच्या नियमित वाढीसाठी आणि देखभालीसाठी जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. मात्र, बहुतांश जीवनसत्त्वं शरीरात तयार होत नसल्यानं आहारातून किंवा फळांमार्फत ती घेणं गरजेचं ठरतं, असंही ते सांगतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी याकरिता जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. तसंच संतुलित आहारही घेतला पाहिजे, असंही डाॅक्टर सांगतात.