ज्या व्यक्तीला कोड हा आजार झाला आहे त्यांनी मुख्य म्हणजे घाबरून जाऊ नये. मन शांत ठेवावे, हा आजार संसर्गजन्य नाही. हा आजार फक्त त्वचेच्या रंगापुरता मर्यादित आहे. या आजाराचा शरीरातील बाकी अवयवांवर काही परिणाम होत नाही. फक्त या आजारामुळे खचून गेल्यास व उदास झाल्यास त्यामुळे हा आजार वाढू शकतो. आजार झाला म्हणून आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका. रोज माफक व्यायाम करावा व समतोल आहार घ्यावा. वेळीच त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हा आजार असलेल्यांपैकी काहींना कुठे खरचटले, लागले किंवा भाजले तरी देखील तिथे कोडाचा डाग येतो. त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असते. डागांवर रोज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळातील ऊन १० मिनिटे घ्यावे. उन्हातील अतिनील किरणांमुळे रंगपेशींना रंगद्रव्य तयार करण्यास चालना मिळते. पण जिथे सूर्यप्रकाश पडतो त्या ठिकाणी हे डाग असल्यास उन्हात गेल्यावर हे डाग लाल होऊन तिथे आग होणे, खाज येणे व त्वचा जाड होणे अशी गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी उन्हात जाताना पायघोळ कपडे घालावेत, जेणेकरून अशा डागांना ऊन लागणार नाही व उन्हात जाण्याच्या अर्धा तास आधी ३० किंवा अधिक एसपीएफचे सनस्क्रीन वापरावे.
हेही वाचा… Mental Health Special: अभ्यास नको; युट्यूबच आवडतं? असं का?
शरीराच्या दर्शनी भागावर कोडाचा डाग असल्यास तो बेमालूलपणे लपवण्यासाठी रंग (Camouflage) उपलब्ध असतात. हा रंग लावून त्यावर पावडर लावल्यास तो दिवसभरासाठी कायम राहतो.
कोडावर उपाय काय?
कोडावर उपाय करताना त्या व्यक्तीचे वय, कोडाचा कालावधी, कोडाची व्याप्ती, इतर आजार व इतर चालू असलेली औषधे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तसेच तो भरभर वाढतो आहे की हळूहळू वाढतो आहे की वाढ पूर्ण थांबलीय (Stable) हेही पहावे लागते. कोड जास्त वाढत असल्यास काही कालावधीसाठी तोंडावाटे स्टीरॉईड किंवा प्रतिकारकशक्ती काबूत ठेवायच्या गोळ्याही द्याव्या लागतात. ही औषधे चालू असताना अधूनमधून रक्त तपासणी करणे आवश्यक असते. आजार कमी असल्यास काही मलमे, जीवनसत्वे व Antitioidants यांनीही चांगला परिणाम होतो. रंगपेशींना चालना देणारी काही औषधे (Psoralins) पोटावाटे घेऊन दोन तासांनी ऊन दिल्यास चांगला परिणाम होतो.
Narrow band ultraviolet therapy – या विशिष्ट अतिनील किरणांच्या उपचारांनी रंगपेशींना चालना मिळते. त्यामुळे डागांमध्ये परत रंग येण्यास व आजाराची वाढ थांबण्यास मदत होते. Excimer light/ laser चाही चांगला परिणाम होतो. हे उपचार आठवड्यातून २-३ वेळा असे बरेच महिने किंवा काही वर्ष करावे लागतात. उपचाराचा कालावधी काही महिन्यापासून ते काही वर्षे असू शकतो. तेव्हा घाई करून डॉक्टर किंवा उपचारपद्धती बदलू नये. काही रुग्णांमध्ये आजार पूर्ण बरा झाल्यानंतरही काही कालावधीने पुन्हा उद्भवू शकतो आणि उपचाराने बराही होतो.
हेही वाचा… Health Special: पहिल्या पावसाचे पाणी अंगावर घ्यावे का?
ज्यांचे कोड कमी प्रमाणात किंवा वाढणे थांबले आहे त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रियाही उपलब्ध आहेत. मिनिएचर पंच ग्राफ्टिंग या पद्धतीत २ मिलीमीटर व्यासाचे गोल बारीक असे त्वचेचे तुकडे कोड असलेल्या जागेवरून काढून तिथे रंग असलेल्या त्वचेचे तेवढ्याच मापाचे तुकडे लावले जातात. या रंग असलेल्या तुकड्यांचा रंग पुढील २-३ महिन्यात सभोवारी २ ते ४ मिलीमीटर पसरतो.
Melanocyte Transfer या पद्धतीत चांगल्या त्वचेचा पातळ पापुद्रा काढून त्यातल्या रंगपेशी प्रयोगशाळेत वेगळ्या काढल्या जातात. जिथे कोडाचा डाग आहे तेथील बाह्य त्वचा लेझरच्या सहाय्याने काढून तिथे या रंगांच्या पेशींचे द्रावण सोडले जाते. त्यानंतर काही महिन्यांनी तिथे रंगद्रव्य तयार होऊन ती त्वचा पूर्ववत होते. एखाद्याच्या संपूर्ण अंगावर कोड पसरलेले असते व त्याचा चेहरा व हात या दर्शनी भागावर काही काळे डाग शिल्लक असतात. असे डाग जर त्याला बरे दिसत नाहीत म्हणून घालवायचे असतील तर काही विशिष्ठ मलमाने ते घालवता येतात.
हेही वाचा… Health Special: आषाढी एकादशी आणि उपवास- आहार कसा असावा?
हा आजार फक्त त्वचेपुरता असतो व तो जरी तसाच राहिला तरी शरीरामध्ये काही गुंतागुंत निर्माण करत नाही. त्यामुळे ज्यांचा आजार फार वर्षांचा आहे, स्थिर किंवा वाढत आहे व विविध प्रकारचे उपचार करूनही त्यांना प्रतिसाद देत नाही अशा व्यक्तींना आम्ही उपचार थांबवण्याचाही सल्ला देतो. अशा व्यक्तींनी नाराज किंवा उदास न होता सत्य परिस्थितीचा स्विकार करणे आवश्यक आहे. कोड झालेल्या व्यक्तीने घाबरून जाऊ नये व उदास होऊ नये. तसेच न्यूनगंडही बाळगू नये.
मनाचा व रंगपेशींचा जवळचा संबंध आहे. आपण जेव्हा आईच्या उदरात वाढत असतो तेव्हा आपली त्वचा ही ECTODERM पासून तयार होते तर रंगाच्या पेशींचा उगम हा Neural crest पासून होतो. तेथून त्या पेशी आपल्या जन्माआधीच त्वचेमध्ये स्थलांतरित होतात. Neural crest हा Neural tube चा भाग आहे व Neural tube पासून आपला मेंदू तयार होतो. साहजिकच मेंदूचा व रंगपेशींचा फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे मनामध्ये जर सतत औदासिन्य व चिंता असेल तर हा आजार औषधांना म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही किंवा वाढूही शकतो. त्यामुळे मन जाणीवपूर्वक आनंदी ठेवावे, संयम बाळगावा व उपचारात सातत्य ठेवावे. तसेच समाजानेही कोड असलेल्या व्यक्तींबद्दल भेदभाव बाळगू नये. तो आजार संसर्गजन्य नाही हे लक्षात ठेवावे.