Akshay Kumar Daily Routine : बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने नुकत्याच एका मुलाखतीत अक्षय कुमारच्या शिस्तप्रिय जीवनशैलीची प्रशंसा केली आहे आणि अक्षय कुमारचे कौतुक करताना त्याने रितेश देशमुख आणि त्याच्याबरोबर घडलेला एक मजेशीर किस्सासुद्धा सांगितला.
विवेक सांगतो, मी आणि रितेश एकदा अक्षयकडे जेवायला गेलो. रात्री ९.३० वाजता अक्षय अचानक आम्हाला दिसेनासा झाला. आम्हाला वाटले तो वॉशरूमला गेला असेल, पण त्याची पत्नी ट्विंकलने सांगितले की तो झोपायला त्याच्या खोलीत गेला. तो चक्क झोपायला गेला होता, यावरून तो किती वचनबद्ध (committed) आणि आत्मकेंद्री आहे हे तुम्हाला कळेल; कारण त्याला सकाळी ४.३० वाजता उठायचे असते. त्याला खरंच सलाम!”
अक्षय कुमारच्या या चांगल्या दिनचर्येचा आढावा घेत, ही दिनचर्या कशी तयार करावी आणि त्याचे महत्त्व काय आहे, हे समजून घेऊ या.
- मुंबई, परळच्या ग्लेनीगल्स हॉस्पिटल येथील इंटरनल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल सांगतात, “यामुळे सकाळी झोपेतून उठण्याची तुमची एक दिनचर्या तयार होऊ शकते. तुम्ही अलार्मशिवाय एका ठरलेल्या विशिष्ट वेळी सकाळी उठू शकता. हळू हळू तुमचे शरीर तुमची दिनचर्या स्वीकारते आणि त्यानुसार तु्म्ही उत्साहाने दिवस सुरू करू शकता.”
- झोपण्याची वेळही तितकीच सातत्यपूर्ण असणे गरजेचे आहे, असे डॉ. अग्रवाल सांगतात. “चांगल्या आरोग्यासाठी दररोज रात्री किमान सात ते आठ तास शांत झोप घेणे महत्त्वाचे आहे. हे तुमच्या शरीराला पुरेशी झोप घेण्यास मदत करू शकतात,” असे डॉ. अग्रवाल सांगतात.
- झोपण्यापूर्वी डिजिटल स्क्रीन आणि सोशल मीडिया वापरणे टाळा. यामुळे तुमची दिनचर्या सुधारू शकते आणि तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर ताजेतवाने वाटू शकते, असे डॉ. अग्रवाल सांगतात.
- सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्याजवळ भरपूर वेळ असतो. या वेळेत तुम्ही नियमित व्यायाम किंवा वर्कआउट करू शकता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दर आठवड्याला १५० मिनिटे तीव्र व्यायाम किंवा ३०० मिनिटे सौम्य-मध्यम-तीव्र व्यायाम करावा. (जसे की चालणे, सायकलिंग, धावणे, हायकिंग, पोहणे इत्यादी) याशिवाय तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्ट्रेंचिंगचासुद्धा समावेश करू शकता. - डॉ. अग्रवाल यांनी रात्रीचे जेवण लवकर म्हणजेच झोपण्याच्या तीन-चार तासांपूर्वी करण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे, असे डॉ. अग्रवाल सांगतात. तसेच स्नायूंच्या आरोग्यासाठी हायड्रेशन खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे आठ-नऊ ग्लास पाणी प्या.