Walking Benefits : दररोजच्या धावपळीत आपण अनेकदा आरोग्याकडे लक्ष देत नाही; पण पोषक आहार व नियमित व्यायाम यांमुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. नियमित चालणे हासुद्धा एक व्यायामाचा प्रकार आहे. खरं तर चालण्याचे असंख्य फायदे आहेत. जरी तुम्ही दिवसातून १० हजार पावले चालत नसाल तरीही दररोज फक्त ३० मिनिटे चालणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आपण या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.

हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार सांगतात, “३० मिनिटे चालण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नियमित ३० मिनिटे चालण्याने वजन जास्त प्रमाणात वाढणे, लठ्ठपणा, टाईप-२ मधमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कर्करोग आणि अचानक मृत्यूचा धोका यांच्या शक्यता कमी होतात.”

चालणे हे हाडांच्या आणि स्नायूंच्या आरोग्यासाठीसुद्धा फायदेशीर आहे. ऑस्टिओपोरोसिस (osteoporosis) म्हणजेच हाडे कमकुवत होणे, सार्कोपेनिया (sarcopenia) म्हणजे स्नायूंचे वजन कमी होऊन काम करण्याची क्षमता कमी होणे, डायनेपेनिया (dynapenia) म्हणजेच स्नायूंची ताकद कमी होणे इत्यादी आजारांचा धोका नियमित ३० मिनिटे चालण्यामुळे कमी होतो.
डॉ. कुमार सांगतात, “चालण्याने मानसिक आणि मेंदूचे आरोग्य सुधारते. तसेच स्मृतिभ्रंश, नैराश्य व एंग्झायटी कमी होते. चालण्यामुळे झोपेची गुणवत्तासुद्धा सुधारते.”

दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंदर पाल सिंग यांनीसुद्धा ३० मिनिटे चालण्याचे फायदे सांगत डॉ. कुमार यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. ते सांगतात, “दिवसातून ३० मिनिटे चालणे वजन कमी करणे आणि हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य यांसाठी खूप फायदेशीर ठरते.”

योग्य प्रकारे कसे चालायचे?

डॉ. सिंग यांनी योग्य प्रकारे कसे चालायचे याविषयी सांगितले आहे. वेग हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. ते सांगतात, “खूप हळुवारपणे चालणे तितकेसे प्रभावी ठरत नाही. चालण्याचे अधिक फायदे मिळविण्यासाठी वेळोवेळी चालण्याचा वेग वाढवणे महत्त्वाचे आहे. कारण- वेगाने चालणे ही बाब फॅट्स कमी करण्यास मदत करते आणि शरीरातील चयापचय शक्ती वाढवते. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्या आणि श्वसनाशी संबंधित आरोग्यसुद्धा सुधारते.”

एकाच वेळी सातत्याने ३० मिनिटे चालावे. पाच मिनिटे, दहा मिनिटे ब्रेक घेऊन चालण्याचे फायदा होणार नाहीत. डॉ. सिंग सांगतात, “चांगल्या फायद्यासाठी २० ते ३० मिनिटे चालण्याचे ध्येय ठरवा. चालताना वेग हळूहळू वाढवा. त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते. तसेच, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारणे, शरीरातील हाडे मजबूत होणे, स्नायूंची ताकद वाढणे व फॅट्स कमी करणे यांसाठी मदत मिळते. हळूहळू वेग वाढवल्याने हे फायदे मिळू शकतात.”

Story img Loader