नवी दिल्ली : चालण्याचा व्यायाम अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. विशेषत: उच्च रक्तदाब, मधुमेह, थॉयराईड यासारख्या आजारांच्या रुग्णांना खूप फायदा होतो. तसेच यामुळे हाडांची क्षमताही वाढते. वृद्धांसाठी तर हा व्यायाम वरदान ठरतो, असे निष्कर्ष अनेक संस्थांनी काढले आहेत. पण, आता नव्या संशोधनानुसार या व्यायामामुळे वृद्धांची स्मरणशक्ती वाढते, असे अधोरेखित झाले आहे.
‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’चे हे संशोधन ‘जर्नल फॉर अल्झायमर डिजिज’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी ७१ ते ८५ वयोगटातील वृद्धांच्या आरोग्यावर १२ आठवडे लक्ष ठेवण्यात आले होते. त्यांना या काळात ‘ट्रेडमिल’वर चालण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी ‘अल्झायमर’शी संबंधित मेंदूच्या भागात सुधारणा दिसून आली. या संशोधनात सहभागी प्रा. जे. कार्सन स्मिथ यांनी सांगितले की, अनेक जेष्ठ नागरिक विचार करणे आणि आठवण ठेवण्याची क्षमता गमावतात. अशा परिस्थितीत चालण्याचा व्यायाम उपयुक्त ठरतो. तसेच त्यांच्या मेंदूच्या कार्यातही सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे.