Walking Pneumonia Vs Common Cold In Marathi : जेव्हा खोकला, सौम्य ताप व थकवा यांसारखी लक्षणे जाणवतात किंवा दिसू लागतात तेव्हा हे सांगणे कठीण होऊ शकते की, तुम्हाला सामान्य सर्दी आहे की दुसरा कोणता गंभीर आजार. जसे की, वॉकिंग न्यूमोनिया; हा एक सौम्य फुप्फुसाचा संसर्ग आहे. या संसर्गामुळे जाणवणाऱ्या सूक्ष्म लक्षणांकडे अनेकदा सर्दी समजून दुर्लक्ष केले जाते.
या आजाराला इंटेन्सिव्ह उपचारांची (Intensive Treatment) आवश्यकता नसली तरीही सामान्य व वॉकिंग न्यूमोनियामधील फरक (Walking Pneumonia Vs Common Cold) समजून घेणे आणि आवश्यकतेनुसार योग्य काळजी घेण्यास मदत करू शकते. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने दिल्लीच्या सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर विकास मित्तल यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी वॉकिंग न्यूमोनियाची लक्षणे, कारणे व उपचार यांच्याबद्दल सांगितले आहे (Walking Pneumonia Vs Common Cold).
वॉकिंग न्यूमोनिया म्हणजे काय (What is walking pneumonia)
वॉकिंग न्यूमोनिया हा न्यूमोनियाचाच एक प्रकार आहे; जो फुप्फुसातील स्थानिक संसर्गाद्वारे दर्शविला जातो. सामान्य न्यूमोनियाव्यतिरिक्त वॉकिंग न्यूमोनियाग्रस्त रुग्णांना सहसा रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे अस्वस्थता असूनही तुम्ही दैनंदिन हालचाली सुरू ठेवू शकतात.
डॉक्टर विकास मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, वॉकिंग न्यूमोनियाच्या लक्षणांमध्ये कमी दर्जाचा ताप, सततचा खोकला, थुंकीचा त्रास व अधूनमधून श्वसन समस्या यांचा समावेश होतो. परंतु, रक्तदाब, नाडीची गती (पल्स रेट) व ऑक्सिजनची पातळी सामान्यतः स्थिर राहते; ज्यामुळे हा रोग सामान्य न्यूमोनियापेक्षा वेगळा ठरतो. तुम्ही जर या आजारादरम्यान एक्स-रे काढलात, तर तुमच्या छातीच्या एक्स-रेवर पांढरा बिंदू दिसतो. हाच बिंदू अनेकदा वॉकिंग न्यूमोनिया आहे हे दाखवून देतो आणि फुप्फुसाचा दाह अधोरेखित करतो.
वॉकिंग न्यूमोनियाची कारणे (Causes of walking pneumonia)
अशा प्रकारचा न्यूमोनिया प्रामुख्याने मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, क्लॅमिडिया न्यूमोनिया व लेजिओनेला न्यूमोफिला यांसारख्या ॲटोपिकल बॅक्टेरियामुळे होतो. तरुण लोकांवर याचा अधिक दुष्परिणाम होतो आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तीवर याचा दुष्परिमाण होऊ शकतो.
डॉक्टर मित्तल म्हणाले की, वॉकिंग न्यूमोनिया होण्याच्या कारणांमध्ये खराब पोषण, झोप न लागणे, हवेतील प्रदूषकांचा संपर्क व विषाणूजन्य संसर्ग यांचा समावेश होतो. सामान्यतः चांगली रोगप्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींनाही वॉकिंग न्यूमोनिया प्रभावित करतो; परंतु बहुतांशी त्यांच्यात दिसणारी लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात.
वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक (Walking pneumonia vs. the common cold)
डॉक्टर विकास मित्तल यांनी स्पष्ट केले की, वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्यत: सर्दी या दोहोंमध्ये खोकला, सौम्य ताप, थकवा यांसारखी लक्षणे जाणवत असली तरीही त्यांच्यातदेखील महत्त्वाचा फरक आहे. वॉकिंग न्यूमोनिया हा फुप्फुसांवर परिणाम करणारा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे आणि सामान्य सर्दी हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे; जो विशेषत: फक्त श्वसनमार्ग (नाक आणि घसा) प्रभावित करतो.
एक्स-रे न्यूमोनियाची उपस्थिती दर्शवू शकतो. तर सामान्य सर्दी क्वचितच इमेजिंगवर दिसणारी चिन्हे दर्शवते. पण, मुख्य फरक हा उपचारांमध्ये असतो. वॉकिंग न्यूमोनियामध्ये ॲटोपिकल बॅक्टेरियांना लक्ष्य करणारे अँटिबायोटिक उपचार आवश्यक असतात. तर सामान्य स्वरूपाची सर्दी आपोआप बरी होते आणि त्याला अँटिबायोटिक्सची गरज नसते.
प्रतिबंध आणि उपचारांसाठी टिप्स (Treatment and prevention tips)
डॉक्टर मित्तल म्हणाले की, वॉकिंग न्यूमोनियाचे निदान झालेल्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली अँटिबायोटिक्स घेणे महत्त्वाचे ठरू शकते. वॉकिंग न्यूमोनिया होण्याचा धोका कमी करण्यासाठी काही उपाय पुढीलप्रमाणे :
१. संतुलित आहार : जीवनसत्त्वे, खनिजसमृद्ध आहार रोगप्रतिकारक कार्यास समर्थन देतो.
२. विश्रांती आणि झोप : योग्य विश्रांती आपल्या शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास चालना देते.
३. नियमित व्यायाम : शारीरिक हालचालींमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.
४. वायुप्रदूषण आणि संसर्ग टाळा : श्वसन संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी प्रदूषण टाळून, स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
हे महत्त्वाचे फरक समजून घेऊन आणि निरोगी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करून, तुम्ही तुमचे श्वसन, आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकता आणि लक्षणे उद्भवल्यास योग्य ते उपचारसुद्धा घेऊ शकता.