Walnut or Akhrot Health Benefits औषधाविना उपचार- सुकामेवा हे बहुतेकदा श्रीमंती खाणे समजले जाते. आर्थिकदृष्ट्या तर ते आहेच पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक श्रीमंत आहेत. म्हणूनच सुकामेवा खाणं गरजेचं आहे.
अक्रोड
अक्रोड आपल्या वापरात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अक्रोडाची रचना व आपल्या मेंदूची रचना यात बराच सारखेपणा आहे. डोक्याच्या कवटीत जशी मज्जा असते तसेच अक्रोडच्या टरफलात मेंदूच्या स्वास्थ्याकरिता निसर्गाने अप्रतिम मगज बनविला आहे. ज्यांना बौद्धिक थकवा आहे, मेंदूचे काम जास्त आहे, मगजमारी किंवा डोकेफोड जास्त आहे, विचार-चिंतन फार आहे, त्यांनी अक्रोड नियमितपणे दोन-तीन खावे. ज्यांना झोप येत नाही त्यांनी झोपताना अक्रोडच्या तेलाचा मसाज डोक्याला करावा, उत्तम झोप लागते.
वजन वाढविण्यासाठी अक्रोड उत्तम
अक्रोडचे बरेचसे गुण बदामासारखे आहेत. अक्रोड जास्त शुक्रकर आहे. अक्रोड कफपित्तवर्धक, वीर्यवर्धक, बल्य आहे. हृद्रोग, रक्तदोष, वातरक्त यावर उपयुक्त आहे. अक्रोड जास्त प्रमाणात घेतले तर शरीराचा दाह होतो. रेच होतात. वजन वाढविण्याकरिता अक्रोड चांगले. धातू क्षयामुळे उद्भवलेल्या वातविकारात, आमवातात अक्रोड पथ्यकर आहे. अक्रोड कामवासना वाढविणारा आहे. अक्रोडात प्रोटिन व स्निग्ध पदार्थ जास्त आहेत.

अक्रोड गराचा लेप

शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या गाठींवर अक्रोड गराचा लेप उपयुक्त आहे. विशेषत: गंडमाळावर अक्रोड वाटून त्याचा लेप करावा. तसेच अक्रोड खावयास द्याावेत. बाळंति‍णीस दूध कमी येत असल्यास गव्हाच्या चपातीत अक्रोड गर मिसळून पोळी खावी. सात दिवसात स्तन्यवृद्धी होते. स्वप्नदोष व वारंवार लघवी होणे या तक्रारींकरिता तूप-खडीसाखरेबरोबर अक्रोड चूर्ण खावे.

रेचक अक्रोड तेल

क्रूर कोठा असणाऱ्यांनी रेचक म्हणून अक्रोड तेलाचा प्रयोग जरूर करावा. पहाटे दुधाबरोबर अक्रोड तेल तीन-चार चमचे घ्यावे. कोठा न ओरबाडता सुखाने पोट साफ होते. चक्कर येणे, भोवळ येणे, फिरल्यासारखे होणे, मस्तक हलके होणे याकरिता मोठ्या प्रमाणावर नियमितपणे अक्रोड खावे. मासिकपाळीत स्त्राव कमी येणे, साफ न होणे या तक्रारी असणाऱ्या कृश स्त्रियांनी अक्रोड नियमित खावे.

जंत व पित्त यावर गुणकारी

अक्रोडच्या तेलाचे एरंडेलाच्या गुणाशी साम्य आहे. एरंडेलाने अशक्ती येते. अक्रोड तेलाने ताकद येते, हा फरक आहे. लांबलचक चपटे टेप वर्म किंवा जंत तसेच फाजील पित्त बाहेर काढण्याकरिता अक्रोड तेलाचा मोठ्या मात्रेत प्रयोग करावा. ज्यांचे केस दुबळे झाले आहेत त्यांनी अक्रोड नियमित खावे.

आहळीव

आहळीव किंवा आळीव बाळंतिणीकरिता खूप थंडीत लाडू किंवा लापशी करून देण्याकरिता वापरले जाते. दिवाळीत मातीच्या किल्ल्यावर लवकर उगवणारे धान्य म्हणून आम्ही लहानपणी वापरत असू. खूप उचकी लागली तर आळिवाचा उकळून काढा द्याावा. आळिवात एक उडून जाणारे तेल आहे. या तेलाने अन्ननलिका, आमाशय, स्निग्ध होऊन उचकी निर्माण करणाऱ्या वायूला आवर पडतो.

बाळंति‍णींसाठी…

बाळंपणात कंबरदुखी, पाठदुखी, गर्भाशयाला पूर्ववत आणण्याकरिता वायू ठिकाणावर आणण्याकरिता आळिवाची पेज घ्यावी. आळीव वाटून त्याचा लेप दुखऱ्या सांध्यांवर लावावा. बाळंतपणातून उठलेल्या स्त्रियांना दूध कमी येत असेल तर आळीव, ओल्या खोबऱ्याचे दूध व गूळ असे मिश्रण शिजवून दाट लापशी करून प्यावे. ज्यांना हिवाळ्यात व्यायाम करून शरीर कमवायचे आहे त्यांनी आळीव, ओले खोबरे, गूळ व भरपूर चांगले तूप असे लाडू करून खावे. तिखट, आंबट, खारट पदार्थ टाळावे. चहा पिऊ नये. निश्चयाने वजन वाढते. आळिवाचा काढा घेतला की लघवी साफ होते. पोट दुखून जुलाब होत असल्यास व आतड्यांच्या व्रणात आळिवाच्या काढ्याचा उपयोग होतो. कंबरदुखी, सायटिका या विकारात आळीव उपयुक्त आहेत. डोळे येणे किंवा डोळ्यांच्या सुजेवर बाहेरून आळिवाचे पोटीस बांधावे, उपयोग होतो.