आयुर्वेदानुसार पावसाळ्यात पाण्यामध्ये एक दोष निर्माण होतो, तो म्हणजे पिच्छिलता अर्थात बुळबुळीतपणा.वर्षा ऋतूमध्ये पावसाच्या पाण्याचा मातीशी संबंध आल्यानंतर त्यामध्ये पिच्छिलता म्हणजे बुळबुळीतपणाचा दोष निर्माण होतो, असे चरकसंहितेचे भाष्यकार चक्रपाणी सांगतात. (संदर्भ-चरकसंहिता१.६.४२) हा दोष शरद ऋतूमध्ये नष्ट होतो. पावसाळ्यानंतर काही दिवस उलटून गेल्यामुळे काळाच्या परिणामाने शरदातले पाणी पक्व होते म्हणजेच दोषरहित व शरीरामध्ये दोष न वाढवणारे असे बनते. मात्र पावसाळ्यातील पाण्यामध्ये बुळबुळीतपणाचा दोष असतो. चरकसंहितेने या ऋतूमध्ये बरसणारे पाणी निश्चित दोषकारक सांगितले आहे. मथितार्थ हाच की पावसाळ्यामध्ये स्वास्थ्य बिघडते त्याचे एक कारण म्हणजे पाणी.
आणखी वाचा: Health Special: पाणी पिणं इतकं का महत्त्वाचं?
दूषित पाण्याची चरकसंहितेनुसार परीक्षा (संदर्भ-चरकसंहिता ३.३.७) ‘पाणी प्रदूषित का होते व प्रदूषित पाणी कसे ओळखावे’, याचे आयुर्वेदाने इसवी सनाच्या एक हजार वर्षे इतक्या प्राचीन काळामध्ये केलेले मार्गदर्शन आजही उपयोगी पडण्य़ासारखे असल्याने आजसुद्धा आपल्याला मार्गदर्शक आहे.
आणखी वाचा: Health Special: आरोग्यदायी केशर
-जे पाणी विचित्र गंधाचे असेल (ज्याला अतिशय वेगळा वास येत असेल),
-ज्या पाण्याचा रंग बदललेला असेल,
-ज्याची चव बदलली असेल,
-ज्या पाण्याचा स्पर्श विचित्र-वेगळा असेल,
-जे पाणी बघून किळस येत असेल,
-ज्यामध्ये अत्यधिक क्लेद असेल अर्थात ज्याला बुळबुळीतपणा आला असेल,
-ज्या पाण्यामध्ये तंतू (धागे) सुटत असतील,
-ज्या पाण्यापासून पक्षी दूर जात असतील
-ज्या पाण्यामधील बेडूक, मासे, कासव वगैरे जलचर प्राणी अतिशय कृश झाले असतील
-ज्या पाण्यामधील बेडूक, मासे, कासव वगैरे जलचर मरुन पडत असतील…
…असे पाणी विकृत आहे असे ओळखून ते आरोग्यासाठी घातक समजावे.
वरील आजारांपैकी डेंग्यू, मलेरिया हे अप्रत्यक्षरित्या पाण्याशी संबंधित आहेत, कारण पाण्यावर डासांची पैदास होते, जे डास या आजारांच्या संसर्गास व फैलावास कारणीभूत होऊ शकतात. पचनसंस्थेशी संबंधित इतर आजार हे थेट दूषित पाण्याशी संबंधित आहेत. साहजिकच हे संसर्गजन्य रोग टाळण्याचा सोपा उपाय म्हणजे दूषित पाण्यापासून स्वतःला दूर ठेवणे आणि पाणी उकळवून पिणे. प्रदेश कोणताही असो, पावसाळ्याच्या या दिवसांत पाण्याला उकळी येईपर्यंत उकळवावे आणि गाळूनच प्यावे. मलेरिया,डेंगू यासारख्या आजारांना प्रतिबंध करायचा उपाय म्हणजे डासांची पैदास होणार नाही याची काळजी घेणे, जे कठीण असले तरी अशक्य नाही. प्रशासन, नगरपालिका, कर्मचारी आणि नागरिक यांच्या सहकार्याने डासांचे आणि पर्यायाने मलेरिया, डेंगू या रोगांचे निर्मूलन शक्य आहे. श्रीलंकेने जर मलेरियाचे त्यांच्या देशातून उच्चाटन केले तर आपण का करु शकत नाही.