दैनंदिन आहाराचा भाग असलेला कांदा आणि कोबी यांच्यासह कोहळा तुमचं आरोग्य सुस्थितीत ठेऊ शकतात. आहारात या तिन्हीचा समावेश कसा असावा हे जाणून घेऊया. कोबीमध्ये कीड नाही याची मात्र काळजी घ्यावी लागते. कारण कोबी प्रत्येक पान वेगळे करून चिरला जात नाही. कांदा वजन वाढवावयास मदत करतो. तो थंड का उष्ण हा वादाचा भाग आहे.
कोबी
कृश व्यक्ती, दमछाक झालेले रुग्ण, थोड्याशा श्रमाने फाफू होणारे, थकवा, गळाठा, खूप घाम येऊन विश्रांती घ्यावीशी वाटणाऱ्यांकरता कोबीचा रस किंवा कच्च्या कोबीची कोशिंबीर फार उपयुक्त आहे. कोबी तुलनेने स्वस्त भाजी आहे. मजूर माणसांकरता कोबी हे उत्तम टॉनिक आहे. तोंड कोरडे पडणे, चेहऱ्यावर टापसा, चिडचिडेपणा, राग येणे, भय, निराशाग्रस्त, रसक्षय झालेल्या रुग्णाकरिता कोबी हे सोपे औषध आहे. छातीत धडधड होणे, उगाचच उमासे येणे, तोंड येणे या तक्रारीत कोबी भाजी नियमित खावी. कोबीमध्ये कीड नाही याची मात्र काळजी घ्यावी लागते. कारण कोबी प्रत्येक पान वेगळे करून चिरला जात नाही. कोबीला भोक पाडून कीड खोलवर गेलेली असू शकते. मूतखडा विकार किंवा लघवी कमी होण्याची तक्रार असणाऱ्यांनी कोबी खाऊ नये.
कोहळा
कुष्मांड या नावाने कोहळा आयुर्वेदात ओळखला जातो. पांढऱ्या जाड सालीचा, भरपूर बिया असलेला व जून कोहळा अधिक चांगला असे शास्त्रवचन आहे. कोवळा कोहळा भाजी म्हणून चांगला असला तरी आयुर्वेदशास्त्राप्रमाणे तो हितकारक नाही. उलट विषसमान आहे. शरीरातील आद्याधातू रसधातू होय. धातूच्या कमतरतेमुळे शरीरात रुक्षता येते. श्रम सहन होत नाही. शरीर शुष्क होते. ग्लानी येते. रसधातूच्या क्षीणतेमुळे जरासा कमी-जास्त शब्द सहन होत नाही. माणसाला चटकन राग येतो. बारीकसारीक गोष्टीत दोष दिसतात. नको तेथे माणूस चिडचिड करतो. अशा रसक्षय विकारात कोहळ्याचा रस विलक्षण गुण देतो. ताज्या कोहळ्याचा रस, त्याबरोबर गरजेप्रमाणे मध किंवा साखर मिसळून घ्यावा. किंवा कोहळ्याच्या वड्या, कोहळेपाक घ्यावा. विशेषत: डिहायड्रेशन किंवा जुलाब, कॉलरा या विकारातील बलक्षयावर कोहळा फारच प्रभावी उपाय आहे.
भाजल्यामुळे शरीराला अपाय झाल्यास, त्वचा लवकर सुधारावी म्हणून कोहळा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेवर थापावा. त्वचेचा नैसर्गिक रंग परत येतो. कृश बालके, बल गमावलेले वृद्ध, नेत्रक्षीणतेचे रुग्ण, अनिद्रा, पांडुता या विकारात कोहळ्याचा रस किंवा भाजी अतिशय उपयुक्त आहे. कष्टाने किंवा कमी प्रमाणात लघवी होत असल्याने कोहळा रस नियमाने घ्यावा. लघवी मोकळी सुटते.
कांदा
कांदा श्रीमंतांपासून गोरगरिबांकरिता रोजच्या जेवणातील आवश्यक पदार्थ आहे. काही धार्मिक कारणांकरिता काही जण कांदा खात नाहीत. पण ज्यांना औषधाशिवाय ताकदीकरिता उपाय हवा, त्यांना कांद्याचा आश्रय करावयास हवा. गोरगरिबांकरिता विशेषत: मोलमजुरी, श्रमाची कामे, हमाली, खाणीतील, समुद्रातील किंवा शेतीकाम करणाऱ्यांना इतके स्वस्त दुसरे टॉनिक मिळणार नाही.
कांदा वजन वाढवावयास मदत करतो. तो थंड का उष्ण हा वादाचा भाग आहे. तरीपण कफ व पित्त दोन्ही प्रकारच्या विकारांत तो सारखाच उपयुक्त आहे. कांदा उष्ण, तीक्ष्ण, कफवर्धक, पित्तवर्धक असला तरी बलवर्धक नक्कीच आहे. कांद्याामुळे रुची येते. तो शुक्र धातूचे पोषण करतो, वीर्य वाढवते. स्त्री-पुरुषांनी गमावलेली ताकद भरून आणण्याकरिता कांद्याची मदत फार मोलाची आहे. कांदा फाजील प्रमाणात घेतला तर पोटात वायू धरण्याची खोड उत्पन्न होते. कांद्याचे अजीर्ण बरे करणे अवघड आहे. त्याकरिता धर्मशास्त्राने पावसाळ्यात कांदा चार महिने खाऊ नये असे सांगितले असावे. पावसाळ्यात अग्निमंद असतो. आधुनिक मताप्रमाणे कांद्यात तिखट चवीचे, उग्र गंध असलेले तेल व गंधक असते. नवीन मताप्रमाणे कांदा उत्तेजक, मूत्रजनक उष्ण व कफघ्न आहे. कांदा खायला लागल्यापासून कफ मोकळा होऊन सुटतो. नवीन कफ होणे बंद होते. तसेच आतड्याची ताकद सुधारून शौचास साफ होते. याकरिता अंग बाहेर येणे, कफप्रधान मूळव्याध व काविळीमध्ये कांदा वापरावा असे एक मत आहे.
आम्हा वैद्य लोकांच्या अनुभवात मात्र कांदा अजीर्णाचे कारण आहे. ज्यांचा अग्नी अगोदरच मंद झालेला आहे त्यांनी कांदा खाल्ला की अजीर्णाचे रूपांतर मलावरोध, उदरवात, पोटफुगी, पोटदुखी, जुलाब, मूळव्याध, आम्लपित्त, गुदभ्रंश अशा नाना विकारांत होते. कांदा खायचा असला तर पेण, अलिबाग येथील माळेचा कांदा खावा. तो बाधत नाही. सांबार करण्याकरिता खूप छोट्या आकाराच्या लाल कांद्याचा वापर करावा. तो दक्षिण भारतातून येतो. चवीने गोड असतो.
नेत्रक्षीणता किंवा डोळ्यांचे विकार झालेल्या रुग्णांनी कांदा जरूर खावा. विशेषत: पांढरा कांदा नियमित खावा. डोळ्यांची भगभग थांबते. डोळ्यांत तेज येते, डोळे आले असताना कांद्यााचा रस व मध असे मिश्रण डोळ्यात काही थेंब टाकावे. थोडे झोंबते, पण नंतर बरे वाटते. तीव्रवेगी तापाकरिता हातापायाला, कानशिलाला कांदा वाटून चोळण्याचा प्रघात आहेच. बाह्योपचार म्हणून तीव्र उन्हाळ्यात कांदा वाटून चोळण्याचा प्रघात आहेच. बाह्योपचार म्हणून तीव्र उन्हाळ्यात कांदा फार उपयुक्त आहे. फार पूर्वी दुपारी कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून टोपीत कांदा बाहेर पडायचा प्रघात होता. ऐन उन्हाळ्यात आलेल्या पांथस्थाला गूळ-पाणी देण्याचा जरा प्रघात आहे, तसा प्रघात म्हणून तळपायाला कांद्याचा रस चोळला तर उष्माघात होणार नाही.
तापाचे प्रमाण वाढल्यास, डोक्यात ताप जाऊ नये म्हणून कांद्याचा रस तळहात, तळपाय, डोळे यांना चोळावा. तापाचे प्रमाण कमी होते. कांदा टोचावा व तो मधात बुडवून ठेवून सात दिवसांनी खावा. शुक्रधातू मजबूत होतो. त्याकरिता रोज एक कांदा थोड्या मधात, आठवड्याने खाण्याकरिता तयार करावा. घुसमटणाऱ्या कफविकारात विशेषत: लहान बालके व वृद्ध यांना कांदा किसून त्याचा रस द्यावा. कफ मोकळा होतो. अंगातील कडकी दूर होण्याकरिता कांदा उपयुक्त आहे. कॉलरा, पटकी या विकारांत एकदोन उलटी जुलाब झाल्याबरोबर कांद्याचा रस द्याावा. बहुधा उतार पडतो. कृश व्यक्तींना झोप येण्याकरिता रात्री कांदा खाणे हा उत्तम उपाय आहे. ज्यांना फिट्चे झटके नेहमी येतात त्यांनी रोज सकाळी नाकात कांद्याचा रस दोन थेंब टाकावा. फिट्स येत नाहीत.