आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीचा सर्वाधिक फटका आपल्या आरोग्याला बसत आहे. त्यामुळे वजन वाढण्यासारखे जीवनशैलीशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. बहुतेक लोक त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असतात आणि त्यांना लवकरात लवकर वजन कमी करायचे असते. अशा स्थितीत अनेक लोक झटपट निकालाच्या मागे धावतात. पण, जलद वजन कमी करण्याचा हा हट्टाग्रह तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. कमी कॅलरीयुक्त आहाराने जलद वजन कमी केल्याचा तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो. याच विषयावर पुणे येथील डॉ. अभय सोमाणी यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. जाणून घेऊ त्यासंबंधी सविस्तर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डाॅक्टर सांगतात, “वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार खूप लोकप्रिय आहे. जलद वजन कमी करण्याच्या प्रयत्नात, आपल्यापैकी बरेच जण क्रॅश डाएटकडे वळतात; ज्यामध्ये तीव्रतेने कॅलरी कमी झाल्यामुळे शरीर ऊर्जा कमी होण्याच्या स्थितीत ढकलले जाते. जेव्हा शरीरात आवश्यक पोषक घटकांचा अभाव असतो, तेव्हा ते हृदयाच्या स्नायूसह ऊर्जेसाठी स्नायूंच्या उतींचे विघटन करण्यास सुरुवात करते. त्यामुळे हृदय कमकुवत होऊ शकते आणि मग हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. डाएटिंग करताना स्वत:च्या मनाने डाएट प्लॅन आखण्याऐवजी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे,” असे ते सांगतात.

क्रॅश डाएटमध्ये कॅलरीजचे प्रमाण मर्यादित ठेवून, कमी कालावधीत वजन कमी करता येते. या डाएटमुळे झटपट वजन कमी होते; पण याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. क्रॅश डाएट फाॅलो केल्यामुळे हृदयाचे दीर्घकालीन आजार होऊ शकतात. खरे तर या डाएटमुळे हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हृदयाची रक्त पंप करण्याची ताकदही यामुळे कमी होते. त्यामुळे हार्ट फेल होण्याचीही शक्यता आहे. रक्तात कोलेस्ट्राॅल आणि फॅट्सचे प्रमाण वाढून हृदयाचे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: थंडीत ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कुरळे केस देतात त्रास, केसगळती रोखण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलं खास उपाय)

डाॅक्टर सोमाणी म्हणतात, “आरोग्य व्यवस्थित ठेवून वजन कमी करायचं असेल, तर क्रॅश डाएट करू नये. कारण- आहारातले काही घटक कमी करून, वजन कमी होण्याची ‘किमया’ क्रॅश डाएटमधून साधली जाते. पण, कमी झालेलं वजन तिथेच थांबत नाही. ते परत वाढण्याकडे कल असतो. तसेच शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. शरीराला कमी उष्मांक मिळाल्यानं चयापचय क्रियाही मंदावते. त्यामुळे क्रॅश डाएट सोडून जेव्हा साधं जेवण जेवू लागतो तेव्हाही चयापचय क्रिया मंद राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएटच्या वाट्याला न जाता, समतोल आहार घेणं कधीही चांगलं.” असल्याचे ते सांगतात.

२०१८ मधील एका संशोधनात असे दिसून आले आहे की, कमी कॅलरीयुक्त आहाराने हृदयातील चरबीच्या पातळीत ४४ टक्क्यांनी वाढ झाली. संशोधकांनी सांगितले की, हा बदल हृदयाच्या रक्त पंप करण्याच्या क्षमतेतील बिघडलेल्या कार्याशी संबंधित आहे. वजन कमी करण्यात आहाराची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे झटपट वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही काही घटक कमी असलेला आहार घेऊ नका. त्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते आणि हृदयाशी संबंधित आजाराला निमंत्रण मिळू शकतो. म्हणून संतुलित आहार, योग्य झोप आणि व्यायाम या गोष्टींकडे लक्ष द्या…

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weight loss and its effect on your heart what happens to the heart during very low calorie diets pdb
Show comments