तुम्हालाही असे वाटते का, तुम्ही कॉफी प्यायल्याशिवाय जगू शकत नाही. असे वाटणारे तुम्ही एकटेच नाही. कॉफी ही अनेकांच्या रोजच्या आहारातील भाग आहे. काही जणांचा दिवस कॉफी प्यायल्याशिवाय सुरू होत नाही. पण, कॉफी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? होय, एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कॉफी प्यायल्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होतात आणि परिणामी वजन कमी होते. या संशोधनाबाबत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊ या.
‘हार्वड टी. एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’च्या एका संशोधनातून समोर आले की, ‘तुम्ही जर रोज चार कप ब्लॅक कॉफी प्यायली तर तुमच्या शरीरातील फॅट्स चार टक्क्यांनी कमी होऊ शकते.’ या संशोधनानुसार वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले आहे. ‘जर ब्लॅक कॉफीमध्ये साखर किंवा कोणतेही गोड पदार्थ न टाकता प्यायले तर त्याचा दुप्पट फायदा मिळू शकतो’, असा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे.
शिवाय ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजची संख्या खूप कमी आहे, यावर तज्ज्ञांनी जास्त भर दिला आहे. ‘युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर ‘ (USDA) ने असे म्हटले आहे की, “ग्राउंड बीन्सपासून (Ground Beans) तयार केलेल्या ब्लॅक कॉफीच्या एका कपमध्ये दोन कॅलरीज असतात, तर एस्प्रेसोच्या एक औंसमध्ये फक्त एक कॅलरी असते. जर डिकॅफिनेटेड बीन्स वापरली, तर कॅलरीजची संख्या शून्यावर येते.
याबाबत इंडियन एक्स्प्रेसबरोबर संवाद साधताना आहार आणि जीवनशैली सल्लागार वसुंधरा अग्रवाल यांंनी सांगितले की, “जेव्हा कमी प्रमाणात ब्लॅक कॉफी घेतली जाते, तेव्हा त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. पण, अति प्रमाणात कॉफी प्यायल्यामुळे निद्रानाश, चिंता, हृदयाची गती जलद होणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि मळमळ यांसारखे नको असलेले दुष्परिणाम होतात.”
हेही वाचा – तुम्ही रोज तूप खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या….
वजन कमी करण्यास ब्लॅक कॉफी कशी मदत करते?
ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. “हे कॉफीमध्ये आढळणारे एक महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट, फिनोलिक ग्रुपचे एक संयुग (Compound) आहे, जे जेवणानंतर इन्सुलिन आणि ग्लुकोजची होणारी वाढ कमी करते, परिणामी वजन कमी होते. ते नवीन फॅट्स तयार करणाऱ्या पेशींच्या निर्मितीस विलंब करते, ज्यामुळे शरीरातील कॅलरी कमी होतात आणि ॲन्टीडायबेटिक, डीएनए आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह परिणादेखील दर्शवते”, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – आलिंगन किंवा मिठी मारणे हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, “कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्याचे शरीरासाठी विविध फायदे आहेत. “हे एक नैसर्गिक उत्तेजक (Stimulant) आहे, जे चयापचय सुधारते. हे ghrelin (भूकसंबंधित हार्मोन) ची पातळी कमी करते आणि भूक कमी करते हे देखील दर्शविले गेले आहे, जे शरीराचे वजन नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. जेव्हा आपण ग्रीन कॉफी बीन्सचे (Green Coffee Beans) सेवन करतो तेव्हा आपल्या शरीराची फॅट्स कमी करण्याची क्षमता वाढते. यामुळे शरीरात फॅट्स कमी करणारे एन्झाईम अधिक प्रमाणात बाहेर पडतात, यकृत शुद्ध होते आणि खराब कोलेस्ट्रॉल आणि अनावश्यक लिपिड्स (Superfluous Lipids) कमी होतात, ज्यामुळे शरीराची चयापचय क्रिया अधिक चांगली होते.”
अग्रवाल यांच्या मते, ब्लॅक कॉफी शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराचे काही प्रमाणात वजन कमी होते. पण, हे वजन कमी करणे तात्पुरते आहे. “कॅफिन आणि त्याच्याशी संबंधित मिथाइलक्सॅन्थाइन सयुंगामध्ये (Methylxanthine Compounds) लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे, ज्यामुळे मूत्रपिंडांवर परिणाम होतो. हे लघवीचे प्रमाण वाढवून जास्तीचे पाणी काढून टाकते आणि शरीरातील पाण्याने व्यापलेले वजन कमी करते. कॅफीन जास्त प्रमाणात घेतल्याने शरीराच्या हायड्रेशन (hydration ) स्थितीवर परिणाम होतो आणि निर्जलीकरणाचा धोका संभवतो, म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, जे धोकादायक ठरू शकते.