Weight Loss : सध्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. यामुळे दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या निर्माण होताना दिसतात. अशात वजन वाढ ही सर्वात मोठी समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो, पण काहीही फायदा होत नाही.
तुम्ही अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल की वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त कार्डिओ करण्याचा सल्ला दिला जातो. कार्डिओ हा व्यायामाचा एक प्रकार आहे, ज्यामुळे ह्रदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. जसे की चालणे, धावणे, सायकल चालवणे, डान्स करणे, पोहणे यांसारखे व्यायाम आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत; पण वजन कमी करण्यासाठी खरंच कार्डिओ प्रभावी आहे का, याविषयी मेडिसीन एक्सपर्ट आणि सेलिब्रिटी ट्रेनर विजय ठक्कर यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.
मिथ्य : कार्डिओमुळे वजन कमी होते
कार्डिओ हा एक शारीरिक व्यायाम आहे, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंची ताकद वाढते आणि त्यात सुधारणा दिसून येते. याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर दिसून येतो. याशिवाय कार्डिओ फुफ्फुसाची क्षमता सुधारण्याससुद्धा मदत करते.
बर्याच जणांना असेही सांगितले जाते की, जर तुम्ही कमी वेळात जास्त मेहनत केली तर तुमचा वर्कआउट संपल्यानंतरही तुम्ही जास्त कॅलरी बर्न करू शकता, पण हे सर्व तात्पुरते असते. कालांतराने आपण सर्व जण वजन कमी करण्यासाठी एक पर्याय म्हणून कार्डिओकडे बघतो.
जर आपण खूप धावलो, सायकल चालवली तर आपले वजन एखाद किलो कमी होईल, पण वजन कमी करण्यासाठी फक्त हे पुरेसे नाही. कारण वजन कमी करताना कार्डिओबरोबर आणखी काही गोष्टी कराव्या लागतात. जसे की योग्य आणि चांगला आहार आणि ट्रेनिंग, हे वजन कमी करण्यासाठी आपली शारीरिक क्षमता वाढवते आणि दीर्घकाळापर्यंत आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.
हेही वाचा : वजन कमी करायचे आहे? मोड आलेली कडधान्ये ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
वजन कमी करताना…
आहार
विजय ठक्कर सांगतात, “कार्डिओ व्यायाम करण्यात आपण कितीही वेळ घालवला तरी शरीरासाठी व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आठ किलोमीटर धावून तुम्ही कॅलरीज बर्न करू शकता, पण पिझ्झाच्या १४ इंच लांबीच्या एका स्लाइसमध्ये सुमारे ३०० कॅलरीज असतात आणि गुलाब जामुनसारख्या मिठाईमध्ये २०० कॅलरीज असतात. जर आपल्या आहारात असे पदार्थ नसतील, तर आपण ८०० कॅलरी बर्न करू शकतो. खरं तर जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाऊन आपण वजन वाढवत असतो. त्यामुळे आहार निवडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रथिने, फायबरने समृद्ध असलेला संतुलित आहार वजन कमी करण्यास मदत करतो.”
स्ट्रेंथ ट्रेनिंग
स्ट्रेंथ ट्रेनिंग स्नायूंची ताकद वाढवण्यास मदत करते, पण तुम्हाला माहिती आहे का वजन कमी करण्यासाठी स्नायू का महत्त्वाचे आहेत? स्नायूंच्या मदतीने तुम्ही व्यायाम न करता दिवसभरात अधिक कॅलरी बर्न करू शकता.
जेव्हा कार्डिओबरोबर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि संतुलित आहार घेता, तेव्हा वजन वाढण्याविरुद्ध आपले शरीर चांगले कार्य करते. कार्डिओमुळे तात्पुरते कॅलरी बर्न होतात, पण स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे चयापचय क्रिया सुधारते आणि स्नायू अधिक मजबूत होतात. याबरोबर निरोगी आहारसुद्धा शरीराला भरपूर पोषक तत्त्व पुरवतात.
हेही वाचा : वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की रात्री? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
वजन कमी करण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. संतुलित आहार, कार्डिओ व्यायाम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग दररोजच्या जीवनशैलीचा भाग बनवून आपण दीर्घकालीन निरोगी आरोग्य मिळवू शकतो.
वजन कमी होणे हे शरीराची किती हालचाल करता यावर नाही, तर तुम्ही काय खाता आणि तुम्ही तुमचे शरीर किती मजबूत आहे, यावर अवलंबून असते. त्यामुळे वरील गोष्टी आत्मसात करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.