स्वत:च्या आरोग्याचा विचार न करता, कुटुंबासाठी राबणारी गृहिणी प्रत्येक घरात दिसते. नोकरी, व्यवसाय आणि घराच्या जबाबदाऱ्या पार पडताना या महिलांना कधी कोणते दुखणे सुरू होते हेच लक्षात येत नाही. स्त्रियांना होणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक व्याधींमध्ये पाठदुखी ही एक गंभीर समस्या बनत आहे. अशा वेळी पाठीच्या खालच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी महिला वेगवेगळे औषधोपचार करतात; पण काही फरक पडत नाही. आइस थेरपी, व्यायाम व वेदना कमी करणारी औषधे काही महिने पाठीचे दुखणे कमी करण्यास मदत करतात; पण एकदा का गोष्टींचा प्रभाव कमी झाला की, महिलांना घरातील अगदी छोटी कामंही करता येत नाहीत. अशा वेळी महिलांमधील पाठदुखीच्या समस्येमागे नेमकी काय कारणे आहेत जाणून घेऊ …
अनेक महिलांना लठ्ठपणामुळे पायांपर्यंत वेदना जाणवत अशक्तपणा येतो. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत वेदना रोखण्याचे इंजेक्शन घेऊनही काही उपयोग होत नाही. अशाने अनेकदा नीट उभे राहतानाही खूप त्रास होतो. याच प्रकारे एका ५५ वर्षीय शिक्षिकेला व्यायामाच्या अभावामुळे तीव्र पाठदुखी सुरू झाली; ज्यामुळे त्यांना शाळेत शिकवण्यासाठी उभे राहणेही अवघड झाले. त्यामुळे एका वर्षात दोन ते तीन वेळा त्यांना पाठदुखीच्या तीव्र वेदनांचा सामना करावा लागला. त्या पाठदुखीच्या समस्येने इतक्या हैराण झाल्या की, त्यांना कामावर जाणेदेखील अवघड झाले. यावेळी त्यांना लंबर डिस्कची म्हणजे पाठीच्या खालच्या भागात खूप वेदना होण्याची समस्या जाणवू लागते. अशाच प्रकारे अनेक महिलांमध्ये क्रॉनिक लिव्हर डिसीजची समस्याही वाढत आहे.
‘संचेती हॉस्पिटल’चे चिफ स्पाइन सर्जन डॉ. शैलेश हदगावकर यांच्या मते, अनेकांना पाठीच्या सौम्य आणि तीव्र दुखण्यामुळे कोणतेही काम करताना खूप त्रास होतो. अशा प्रकारे रोज अंदाजे ७० लोक या समस्येचा सामना करीत आहेत. ‘द लॅन्सेट रुमेटोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अहवालानुसार, जगभरात पाठदुखीची अर्ध्या अब्जाहून अधिक प्रकरणे आहेत. २०२५ पर्यंत हीच संख्या ८०० दशलक्षवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
वाढत्या वयानुसार पाठदुखीशी समस्या अधिक वाढते?
पाठीच्या दुखण्यामुळे अनेक कामगारांना मुदतीपूर्वी निवृत्ती घ्यावी लागत आहे; तर अनेक कामगार कामावर वारंवार गैरहजर राहत आहेत. पाठीचे दुखणे वाढल्याने अनेकांना शारीरिक अपंगत्व आल्याप्रमाणे जगावे लागत आहे. ही समस्या वयानुसार अधिक वाढत जातेय. वयाच्या ८५ वर्षांपर्यंत ही समस्या शिखरावर पोहोचते. निवडक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया उपयुक्त ठरू शकते; परंतु ती प्रत्येक वेळी परिणामकारक ठरू शकते, असे सांगता येत नाही, असे मत डॉ. हदगावकर यांना व्यक्त केले. तीव्र पाठदुखीची समस्या ही सहसा वाढत्या वयाशी संबंधित असते. तर सामान्य कारणांमध्ये मणक्याचे आजार, स्पायनल स्टेनोसिस व फुगवटा यांसारख्या डिस्क समस्यांचा समावेश होतो. म्हणूनच बहुतेक प्रकरणांमध्ये नॉन सर्जिकल पेन मॅनेजमेंट प्रोटोकॉलचा सल्ला दिला जातो.
पाठदुखीसाठी सुधारण्यायोग्य जोखीम घटक
इतर कोणत्याही दीर्घकालीन आजारांपेक्षा पाठदुखीमुळे अधिक लोकांना काम सोडावे लागत आहे. अंदाजानुसार, पाठीच्या खालच्या दुखण्याच्या जागतिक ओझ्यामध्ये तीन बदल करण्यायोग्य घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. जवळजवळ एक-चतुर्थांश लोक या आजारासाठी व्यावसायिक अर्गोनॉमिक घटकांना जबाबदार धरले आहे. त्यात खूप वेळ बसणे, उभे राहणे, वाकणे किंवा उचलणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
२०२० मध्ये जागतिक स्तरावर आणि सर्व वयोगटांतील २२ टक्के प्रकरणे व्यावसायिक अर्गोनॉमिक घटकांमुळे नोंदवली गेली; तर १२.५ टक्के प्रकरणे धूम्रपानामुळे आणि ११.५ टक्के तक्रारी उच्च बीएमआय (बॉडी मास इंडेक्स)मुळे होती. धूम्रपानामुळे पाठदुखीचा धोका मध्यमवयीन (५०-६९ वर्षे) मध्ये सर्वाधिक होता. तर तरुण रुग्णांमध्ये (१५-४९ वर्षे) व्यावसायिक अर्गोनॉमिक घटकांमुळे ही समस्या अधिक वाढत होती.
पाठदुखीचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते?
वयोमानानुसार हाडांची झीज, गर्भधारणा, स्त्री-पुरुषांमधील पेल्विक संरचनात्मक फरक व संप्रेरक समस्यांमुळे स्त्रियांना पाठदुखीचा धोका अधिक असतो. भारतात पाठदुखीचे प्रमाण, त्याचे जोखीम घटक आणि लोक वेदना व्यवस्थापित करण्यासाठी कोणते औषधोपचार करतात याची माहिती घेणे आवश्यक आहे. या सर्वांमुळे लोकसंख्येच्या पातळीवर प्रतिबंधक धोरणे तयार करणे, कामाच्या ठिकाणी पाठदुखीचे प्रमाण कमी करणे, योग्य पुनर्वसन सेवा उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. पाठदुखीचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे म्हणून लिंग-हेतूपूर्वक धोरणे आवश्यक आहेत; जेणेकरून स्त्रियांना फायदा होईल. तसेच नॉन-कम्युनिकेबल डिसीज (NCD) कार्यक्रमात मस्कुलोस्केलेटल स्थितींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, असे पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI) येथील प्राध्यापिका डॉ. राखी डंडोना म्हणतात.
भारतात पाठदुखीची ८७.५ दशलक्ष प्रकरणे
जागतिक स्तरावर इयर्स ऑफ लिव्हिंग विथ डिसॅबिलिटी (YLDs)चे पाठदुखी हे प्रमुख कारण आहे आणि २०२० मध्ये जगभरात पाठदुखीची अर्ध्या अब्जाहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. द लॅन्सेट अभ्यासानुसार, भारतात पाठदुखीची ८७.५ दशलक्ष प्रकरणे आहेत. मस्क्युकोस्केलेटल स्थितींवरील डेटा उपलब्ध नसल्यामुळे ही संख्या कमी असण्याची शक्यता आहे. तसेच या अंदाजांमध्ये कोविड-१९ चा प्रभाव विचारात घेतलेला नाही, असे जे ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाचा भाग असलेले डॉ. डंडोना यांनी म्हटले.