नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कठीण व्यायाम प्रकारांची निवड करण्याऐवजी, पुन्हा सर्व जण दररोज ‘चालणे’ या सोप्या, तरी परिणामकारक स्टेडी-स्टेट कार्डियो व्यायामाची निवड करत आहेत. अति तीव्रतेचा व्यायाम किंवा हाय इंटेन्सिटी वर्कआउट हे केवळ स्नायू किंवा शरीर रचनेवरच नव्हे, तर मनुष्याच्या मेंदूवरदेखील ताण निर्माण करू शकतात. असे व्यायाम प्रकार करताना तुमची वजन किंवा जाडी कमी होत असेल, मात्र तुम्ही जे करत आहात किंवा जे काही करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन देत आहात, त्याने तुम्ही स्वतःचे वजन वाढणे रोखू शकणार आहात की नाही? हा खरा प्रश्न आहे.
एखादा व्यायाम सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल आपल्याला माहिती आणि त्यांचे फायदे काय आहेत हे माहीत करून घेणे महत्वाचे असते. स्टेडी-स्टेट कार्डियो म्हणजे काय आणि त्याने शरीराला कोणते फायदे होतात ते पाहा.
स्टेडी स्टेट कार्डियो म्हणजे काय?
तुमच्या हृदयाची धडधड/गती एका ठराविक काळानंतर किमान पाच मिनिटांपर्यंत वाढवण्यासाठी केली जाणारी कुठल्याही प्रकारची शारीरिक हालचाल यामध्ये केली जाते. तुम्ही अगदी चालणे, धावणे, उड्या मारणे, सायकलिंग यापासून अगदी नाचण्यापर्यंत अशा कोणत्याही गोष्टी या स्टेडी स्टेट कार्डियोमध्ये करू शकता, अशी माहिती सर्वांगीण आरोग्यतज्ज्ञ डॉक्टर मिकी मेहेता [holistic health expert Dr Mickey Mehta] यांनी दिली असल्याचे इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखातून समजते.
हेही वाचा : रिकाम्यापोटी आल्याचा रस पिण्याने पोटासाठी फायदा होतो का? काय आहेत टिप्स जाणून घ्या…
याचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो?
या स्टेडी स्टेट प्रकारामध्ये व्यायामाची तीव्रता कमी असून, आपले संपूर्ण शरीर एका लयीत असते. ज्यामुळे आपण आपले शरीर चक्र [बॉडी क्लॉक] पुन्हा आपल्या पद्धतीने हवे तसे सेट करू शकतो. आपले श्वासोच्छवास एका लयीत, संतुलित असल्याने त्याचा फायदा केवळ आपल्या हृदयाचे आरोग्य वाढवण्यासाठीच नव्हे तर शरीरातील इतर अवयवांसाठीही होत असतो.
शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होणे
एरोबिक [व्यायामाचा एक प्रकार] क्षमता आणि स्नायूंची शक्ती ही आपल्या दैनंदिन जीवनासाठी प्रचंड महत्वाची असते. मध्यम इंटेन्सिटी/तीव्रतेचा एरोबिक्स हा व्यायाम प्रकार दररोज केल्याने आपल्या स्नायूंची शक्ती वाढवण्यासोबतच, एरोबिक करण्याची क्षमताही वाढते. या व्यायामामुळे, स्नायू पेशींच्या वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी, पेशींमधील मायटोकॉन्ड्रियाच्या [mitochondria] ज्याला मराठीमध्ये तंतुकणिका असे म्हणतात, त्यांची संख्या वाढण्यासाठी मदत करत असतात; ज्यामुळे आपल्या स्नायूंची शक्ती वाढते, असे डॉक्टर मिकी सांगतात.
इतकेच नव्हे तर याचा फायदा आपल्या हृदयालादेखील होतो. शरीराची, ऑक्सिजनची वाढती गरज बघून हृदय आपल्या कामाची क्षमता वाढवून शरीराला, स्नायूंना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करत असतो. परिणामी आपली एरोबिक क्षमताही वाढते. स्टेडी व्यायामाची ही पद्धत आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला योग्य प्रमाणात प्राणवायू पोहोचवून आपली रोगप्रतिकार शक्ती, चैतन्य आणि आयुष्य वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.
प्रत्येकासाठी फायदेशीर असणारी दिनचर्या
प्रत्येकालाच हाय इंटेन्सिटी वर्कआउट सहन होतील किंवा झेपतील असे नाही. मात्र, चालण्यासारखा स्टेडी/स्थिर व्यायाम प्रकार कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला, अगदी सहज करता येणासारखा आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असा प्रकार आहे.
हेही वाचा : दही खाणे आरोग्यासाठी खरंच चांगले असते का? काय आहे डॉक्टरांचं मत जाणून घ्या…
ज्यांना सांधे दुखी, संधिवात, हृदयासंबंधी समस्या यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी आहेत, त्यांनाही हा स्टेडी व्यायाम प्रकार करणे उपयुक्त आणि सोयीचे ठरू शकते. तीव्र व्यायाम प्रकारांनी विनाकारण हृदयावर, स्नायूंवर ताण येऊन त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.
मानसिक आरोग्यासाठी फायदे
व्यक्तीचे मन शांत करणारे, लयबद्ध आणि सोपे प्रकार हे योगासनाचे मूळ आहे. त्याचप्रमाणे या स्टेडी व्यायाम प्रकारांचेही हेच मूळ तत्त्व आहे, असे म्हटले तरीही चालू शकते. स्टेडी म्हणजेच स्थिर व्यायाम प्रकाराने तुमचे मन, विचारही स्थिर, शांत होण्यास मदत होते. जेव्हा अशा प्रकारचे व्यायाम दररोज केले जातात, तेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम होता. जेव्हा आपण असे व्यायाम करत असतो, तेव्हा शरीरातील होणाऱ्या रक्ताभिसरणासह, स्ट्रेचिंग आणि दीर्घ श्वासोच्छ्वासाद्वारे आपल्या सर्व चिंता, ताण, तणाव, दुःख आपल्या शरीराबाहेर टाकून देत असतो, असे डॉक्टर मिकी म्हणतात.
शरीरासोबत, हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी अजूनही अनेक जण सर्वांगीण आरोग्य वाढवणाऱ्या पारंपरिक पद्धतींच्या व्यायाम प्रकारांची निवड करत आहेत हे स्पष्ट आहे. यासाठी आपल्याला दिवसातून केवळ ३० ते ६० मिनिटांची गरज असते.