डॉ. अश्विन सावंत
जगात असा कोणताही पदार्थ नसेल ज्यामध्ये दोष नसतात, तर निव्वळ गुणच असतात. कोणताही सजीव खाद्यपदार्थ असो, प्राणिज असो वा वनस्पतीज, नैसर्गिक असो वा मानवनिर्मित; इतकंच नाही तर सोने, रुपे या मातीतल्या धातूंपासुन शंख-शिंपल्या-पोवळ्या या समुद्रातील पदार्थांपर्यंत विविध निर्जीव पदार्थांचाही अभ्यास आपल्या ऋषिमुनींनी करुन तो ग्रंथरुपात हजारो वर्षे जतन करुन ठेवलेला आहे. हा अभ्यास करताना एकांगी केवळ गुणांचा अभ्यास न करता दोषांचाही केलेला आहे. कारण प्रत्येक पदार्थामध्ये गुणांबरोबरच दोष सुद्धा असतात आणि म्हणूनच आयुर्वेद शास्त्र ((संदर्भ-चरकसंहिता १.२६.४३(३),अष्टाङ्गसंग्रह १.१८.१२) कोणत्याही पदार्थाची माहिती देताना गुणांबरोबरच दोषांविषयीही माहिती देते. खारट रसाचे (खारट चवीचे) गुण समजून घेतल्यावर जाणून घेऊ खारट रसाचे दोष.
खारट चवीचे पदार्थ अति प्रमाणात खाण्यात आले म्हणजेच खारट रसाचा अतिरेक झाला तर…
-पित्तप्रकोप होतो व पित्तविकार संभवतात.
-रक्ताचे प्रमाण वाढते (रक्तामधील मीठयुक्त पाण्य़ाचे प्रमाण वाढते) व रक्तसंबंधित रोग संभवतात.
-तहान वाढते
-मूर्च्छा येऊ शकते
-शरीर तापते (उष्ण होते)
-मांस शिथिल होऊन गळू लागते
-विषाचा प्रभाव वाढू शकतो
-त्वचा विकार असल्यास त्यामध्ये स्त्राव वाढू शकतो वा पू वाढू शकतो
-अंगावर पित्ताच्या गांधी येणारा आजार होऊ शकतो किंवा असल्यास वाढू शकतो
-जखम भरु देत नाही,जखमेमध्ये पू वाढवू शकतो
-मद (नशा) वाढवतो
-सूज वाढवतो
-सूजेला फोडतो
-दात पडण्यास कारणीभूत होऊ शकतो
-त्वचेवर सुरकुत्या वाढवतो
-केस पिकण्यास कारणीभूत होऊ शकतो.
-केस गळण्यास व टक्कल पडण्यास कारणीभूत होऊ शकतो.
-इंद्रियांना जड (मंद) करतो
-पौरुषशक्ती कमी करतो किंवा तिचा नाश करतो
-शरीराचे बल कमी करतो
आणखी वाचा-Health Special : खारट रस अनुलोमक असण्याचा काय फायदा?
खारट रसाच्या अतिसेवनाने संभवणारे आजार
-अम्लपित्त
-रक्तपित्त (शरीराच्या वेगवेगळ्या मार्गांमधुन रक्तस्त्राव किंवा शरीरामध्ये रक्तस्त्राव)
-वातरक्त (ज्याला आधुनिक वैद्यकामध्ये गाऊट म्हणतात तो संधिविकार)
-विचर्चिका (त्वचाविकार) व अन्य विविध प्रकारचे त्वचारोग
-इन्द्रलुप्त (चाई पडणे)
-आक्षेपक ( शरीराला वा एखाद्या अंगाला आचेक येण्याचा आजार)
मीठ आणि त्वचारोग
अन्नाला रुची देणार्या, अग्नीवर्धन करुन अन्न पचवण्यास साहाय्य करणार्या मीठाचे कितीही गुणगान गायिले तरी मिठाचे अतिसेवन हे अनारोग्याला आमंत्रण देते यात काही शंका नाही. प्राचीन काळापासून आजच्या २१व्या शतकातील आधुनिक जगामध्येही मीठाचा सहज लक्षात येणारा दोष म्हणजे त्वचादुष्टी अर्थात त्वचेमध्ये दोष निर्माण करणे. मीठाचे अतिसेवन करणार्यांच्या त्वचेवर लवकर सुरकुत्या पडू लागतात व एकंदरच त्यांच्यामध्ये वार्धक्याची लक्षणे थोडी लवकरच दिसू लागतात, हे आपण बघितले. मात्र त्वचादुष्टी म्हणताना त्वचेच्या रचनेमध्ये व तिच्या कार्यामध्येही दोष निर्माण करणे असा अर्थ होतो.ज्यामुळे त्वचारोगांना आमंत्रण मिळते.
ईसब (aczema) हा अतिशय जुनाट असा त्वचाविकार, ज्याचे सहसा पायाच्या घोट्याभोवती अतिशय खाजणारे असे चट्टे येतात. मात्र ईसबाचे चट्टे कपड्याआड लपतात तरी सोरियासिसचे चट्टे मात्र संपूर्ण अंगभर येतात. मुख्यत्वे मधल्या धडावर. डोक्यावर केसांमध्ये सोरियासिस होणारे रुग्ण हल्ली खूप पाहायला मिळतात. त्वचा विद्रूप करणारा हा आजार मागील दोनेक दशकांमध्ये खूप बळावला आहे. रुग्ण त्चारोगतज्ञ बदलत राहतात, मात्र तो आजार काही रुग्णाचा पिच्छा सोडत नाही.
आणखी वाचा-Health Special: शरद ऋतूमध्ये खारट रस प्रबळ का होतो?
आयुर्वेदीय उपचाराने सोरियासिससारखा आजार व्यवस्थित बरा होताना दिसतो. सोरियासिस (psoriasis) बरा करण्यासाठी औषधी उपचार तर लागतोच, मात्र त्याबरोबर एक अतिशय महत्वाचे पथ्य आम्ही रुग्णाला सांगतो,ते म्हणजे मीठाच्या सेवनावर नियंत्रण. सोरियासिसच नव्हे तर अनेक त्वचाविकारांमध्ये उपचार यशस्वी व्हायचा असेल तर मीठाच्या सेवनावर नियंत्रण हे आणावेच लागते. मग ज्या पदार्थच्या सेवनावर नियंत्रण आनल्यावर आजार बरा होतो,तोच पदार्थ त्या आजाराला कारणीभूत असला पाहिजे, हे तर सरळ गणित आहे, नाही का?
टीप- तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय मीठाचे सेवन कमी करण्याची किंवा थांबवण्याची चूक करु नका.