मधुमेह हा आजार आता सामान्य होत चालला आहे. कोविड – १९ नंतर, जगभरातील लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये टाइप १ मधुमेहाचे निदान होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जामा नेटवर्क जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, २०१९ मध्ये लहान वयात मधुमेह होण्याची सर्वाधिक प्रकरणे आणि मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे.
बीबीसीच्या एका अहवालानुसार, बदलती जीवनशैली, सुधारित राहणीमान, शहरांमध्ये स्थलांतर, कामाचे अनियमित तास, बसून राहण्याच्या सवयी, तणाव, प्रदूषण आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमामात वाढ झाली आहे. भारतात मधुमेह वाढण्यास फास्ट फूड हे एक कारण आहे.
- मुलांमधील मधुमेहाची लक्षणे –
लहान मुलांमध्ये टाइप १ मधुमेहाची विविध लक्षणे दिसू शकतात. डॉ नवनीत अग्रवाल, चीफ क्लिनिकल ऑफिसर, बीटओ यांनी सांगितलं, “टाईप १ मधुमेह असलेल्या मुलांना इन्सुलिनचे अपर्याप्त उत्पादनामुळे अनेकदा गंभीर हायपरग्लायसेमिया होतो. यामुळे डायबेटिक केटोअसिडोसिस (DKA) नावाची स्थिती निर्माण होऊ शकते. तीव्र ओटीपोटात दुखणे किंवा वारंवार उलट्या होणे हे देखील डायबेटिक केटोआसिडोसिस झाल्याची लक्षणे आहेत.”
याव्यतिरिक्त, लक्षणांमध्ये जास्त लघवी (पॉल्युरिया), वाढलेली भूक (पॉलीफॅगिया), जास्त तहान (पॉलीडिप्सिया) आणि लक्षणीय वजन कमी होणे यांचादेखील समावेश असू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितलं. मुलांचे वजन न वाढने, तसेच लगेच वजन कमी होणे किंवा मुलाच्या लघवीकडे मुंग्या आकर्षित झाल्याचं लक्षात येताच पालकांनी मुलांसाठी वैद्यकीय मदत घेण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. अग्रवाल म्हणाले, “पालकांनी या लक्षणांबद्दल जागरूक असणे गरजेच आहे, तसेच मुलांमध्ये टाइप १ मधुमेहाची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.”
- मुलांच्या रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी –
मुलांमध्ये टाइप १ मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्राथमिक आणि शिफारस केलेले उपचार म्हणजे इन्सुलिन थेरपी. डॉ अग्रवाल इन्सुलिन थेरपी सुरू करण्यासाठी डायबेटोलॉजिस्ट किंवा एंडोक्राइनोलॉजिस्ट सारख्या आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घेण्याचा सल्ला देतात. मुलाच्या वैयक्तिक रक्तातील ग्लुकोजच्या पातळीनुसार इन्सुलिनचा विशिष्ट प्रकार आणि डोस निश्चित केला जातो. इन्सुलिन थेरपी सुरू केल्यानंतर, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक असते. रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करणे आणि इन्सुलिनच्या डोसमध्ये योग्य बदल करणे हे लहान मुलांमधील टाइप १ मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वाचा घटक असल्याचंही डॉक्टर अग्रवाल म्हणाले.
हेही वाचा- Oversleeping : वीकेंडला तुम्हाला जास्त झोपण्याची सवय आहे? आताच थांबवा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…
- आरोग्यदायी सवयी जोपासा –
सध्या, टाइप १ मधुमेहासाठी कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक थेरपी नाही कारण ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे. डॉ अग्रवाल म्हणाले, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, किशोरवयीन आणि पौगंडावस्थेतील लठ्ठपणाचे वाढते प्रमाण टाइप २ मधुमेहाच्या नंतरच्या विकासाशी संबंधित आहे. मुलांना नियमित शारीरिक हालचाली करण्यास प्रवृत्त करण्यात, संतुलित आणि पौष्टिक आहाराची आणि आरोग्यदायी सवयी जोपासण्यात पालकांची महत्त्वाची भूमिका असते. हे सक्रिय उपाय भविष्यात टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता कमी करू शकतात. जर एखाद्या किशोरवयीन मुलाचे वजन जास्त असेल किंवा लठ्ठ असेल तर, हेल्थकेअर व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली वजन कमी करण्याच्या दिशेने काम करणे टाइप २ मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते,” असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.