शीतल वय वर्ष ५५ – ‘गेले काही महिने आम्ही घरीच काढा बनवून पितोय. या महिन्यात रिपोर्ट्स केले पण काही फरक जाणवेना शुगरमध्ये. यांची आणि माझी दोघांची तेवढीच शुगर तेवढीच आहे’.

मिलिंद – वय वर्ष ४५ – ‘डायबिटीस आहे हे कळल्याबरोबर दररोज नियमित व्यायाम सुरु केला. ६ महिने झाले. गोळ्या कमी झाल्या हो ! आणि साखरेचा चहा इतका डेंजर असेल वाटलं नव्हतं मला’.

‘आमच्या घरी आईची शुगर कधीच नॉर्मल आली नाही. आणि मला माझ्या आयुष्यात हा आजारच नकोय. ही वाढीव शुगर कमी व्हायला पाहिजे. मी हवं तर अर्धा तास आणखी व्यायाम करेन’, नीता काळजीने बोलत होती. HbA1c ५.८% आल्याने ती थोडी खचली होती.

‘आम्ही गेली अनेक वर्ष सगळ्या प्रकारची कंदमुळं खाणंच बंद केलंय आणि साखरपण. अधेमध्ये उपास असताना वापरतोय तेवढंच’, गिरीजा -वय वर्ष ३५

‘मी अनेक वर्ष इन्सुलिनचं इंजेक्शन घेते. आता व्यायाम आणि डाएट दोन्ही उत्तम सुरु आहे आणि इन्सुलिनचं प्रमाण पण बरंच प्रमाणात आलंय’, इति- दीक्षा वय वर्ष ४२

हेही वाचा : ड जीवनसत्त्व मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याची योग्य वेळ कोणती? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

‘मला अलीकडेच डायबिटीस असल्याचं कळलं. म्हणजे गेली काही वर्ष मी जरा अंगावर काढलं, आता खूपच वाढलंय म्हणून म्हटलं वेळीच लक्ष द्यावं. गोळ्या सुरु आहेत पण साखर किती कमी करावी कळेना. सगळं फिकंच लागतंय साखरेशिवायट, मनोज – वय वर्ष ५५

‘मी म्हणते साबुदाणा बंद करूया, आम्ही खूप खातो साबुदाणा. नाश्ता, संध्याकाळचं खाणं म्हणून पण . गेले काही आठवडे भात आणि बटाटापण कमीच केलाय फक्त एका वेळी खातोय. तरी शुगर काही कमी होईना. डायबिटीस कमी खाल्ल्याने जाईल ना हळूहळू’? शिवानी – वय वर्ष ४८

ही झाली मधुमेहाबद्दल असणाऱ्या समजांची आपल्या समाजातील विविध वयोगटात असणारी काही प्रातिनिधिक उदाहरणं! डायबिटीस म्हणजे मधुमेह. अलीकडे प्रत्येकाच्या माहितीतला शब्द. त्याचबद्दल आजचा लेख प्रपंच.

डायबिटीस मेलींटस आणि डायबिटीस इन्सिपिडस असे डायबिटीसचे प्रामुख्याने २ वर्ग त्यातील डायबिटीस मेलिटसने जगभरात ठिय्या मांडलेला आहे. या डायबिटीस मेलिटसचे २ प्रकार प्रमुख्याने जनसामान्यांत आढळून येतात.

टाईप १ आणि टाईप २

म्हणजे नक्की काय तर आपल्या स्वादुपिंडातून (ज्याला पॅनक्रियाज म्हणतात) स्त्रवणारी ग्रंथी म्हणजे इन्सुलिन. या इन्सुलिनचं तंत्र बिघडलं की मधुमेहाने तुम्हाला विळखा घातलाच समजा. तंत्र बिघडतं म्हणजे नक्की कसं?

१. इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशीच नष्ट होतात

२. इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी अमर्याद इन्सुलिन तयार करत राहतात

हेही वाचा : शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे? ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

हे इन्सुलिन तयार होणं हे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर देखील अवलंबून असतं. मधुमेही रुग्णांसाठी आहार हे प्रामुख्याने औषधासारखं काम करतं. मात्र आहारावर नियंत्रण नसेल तर मधुमेही रुग्णांना सातत्याने औषधांवर अवलंबून राहावं लागतं. मधुमेहाच्या दोन्ही प्रकारात वरील लक्षणं समान असली तरी वजनावर होणारे परिणाम मात्र वेगळे असतात. पहिल्या प्रकारात वजन वेगाने कमी होत जाते आणि दुसऱ्या प्रकारात अनेकदा अतिस्थूलपणा येतो.

इन्सुलिन त्याच्या आजूबाजूच्या चयापचय क्रिया नियंत्रित करणाऱ्या ऊतींवर बांधले जाते. याचे मुख्य काम पेशींच्या पडद्यापर्यंत ग्लुकोज पसरवणे. एडीपोज उतींमध्ये वाढीव ग्लुकोजचे प्रमाण हळूहळू त्यातील स्निग्धांश वाढवत जाते आणि त्यामुळे स्थूलपेशींचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. अनियंत्रित इन्सुलिनमुळे हळूहळू वजनाचा भर वाढू लागतो.

यकृताच्या पेशींमध्ये ग्लुकोज वाहून नेण्याकरिता इन्सुलिनची आवश्यकता नसते मात्र या पेशींमधील ग्लुकोजचा चयापचय क्रियेवर खोल परिणाम होतो. ज्यामुळे ग्लायकोजेनची निर्मिती वाढू लागते. यामुळे ग्लायकोजेनचे विघटन आणि अमिनो आम्ल आणि ग्लिसरॉल पासून ग्लुकोजचे होणारे संश्लेषण प्रतिबंधित करते.

त्यामुळे इन्सुलिनचा एकूण परिणाम म्हणजे ग्लुकोजचा साठा वाढविणे आणि ग्लुकागॉन याच इन्सुलिनच्या कार्याला विरोध करण्याचे काम करते. हे झालं इन्सुलिन बद्दल. मधुमेहामुळे इन्सुलिनचे होणारे अनियंत्रण रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण देखील वाढवतं.

हेही वाचा : अन्नाबरोबर पाणी प्यायल्याने गॅस किंवा अपचन होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

काही वर्षांपूर्वी वयानुरूप बदललेल्या जीवनशैलीमुळे बळावणारा मधुमेह अलीकडे ४५- ५० या वयातच हजेरी लावू लागला आहे. आता मी आधीच्या काळी कसं असायचं असं स्मरणरंजन..वगैरे अजिबात करणार नाही. आताच्या जीवनशैलीप्रमाणे अनुवांशिक कारणांव्यतिरिक्त मधुमेहासाठी कारणीभूत असणारी काही कारणं खालीलप्रमाणे :

१. बैठी जीवनशैली

२. व्यायाम न करणे

३. अपुरी झोप

४. प्रक्रिया केलेले पाकिटबंद पदार्थ खाणे

५. वेळीअवेळी खाणे

६. खाण्याचे अवाजवी प्रमाण

मधुमेह टाळण्यासाठी किंवा निदान कसे करावे ?

१. घरात आधीच्या पिढीमध्ये कोणाला मधुमेह आहे का हे जाणून घेणे.

२. दर वर्षी रक्ततपासणी करणे

३. आहारात कोणत्याही विशिष्ट चवीच्या ( अति गोड / अति कार्ब्स / अति प्रक्रिया केलेलं अन्न ) प्रकारचा अतिरेक टाळणे.

४. कोणत्याही प्रकारचं आजारपण खूप जास्त दिवस कमी होत नसेल तर आवर्जून डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक उपचार करणे