Health Special: प्रदूषण हेदेखील पोटाच्या विकारांमागचे एक महत्त्वाचे कारण आहे, असे अलीकडच्या संशोधनात लक्षात आले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरावर परिणाम करत असते. याचा सर्वात मोठा घाला असतो तो आपल्या पचनसंस्थेवर आणि मग सुरुवात होते ती पोटाच्या विकारांना. आजच्या या भागामध्ये आपण प्रदूषणामुळे नेमके कोणते विकार होतात ते पाहूया.
मुंबई सारख्या शहरांमध्ये कचरा जाळणे तसेच रासायनिक उद्योगांमुळे काही विभागात प्रदूषण वाढते. प्रदूषणामुळे नेहमी खोकला, सर्दी, छातीचे व हृदयाचे विकार, क्षयरोग, अॅलर्जी, डोळे चुरचुरणे अश्या आरोग्य समस्या होतात हे सर्वज्ञात आहेच. परंतु आज आपण प्रदूषणांपुढे पोटात काय विकार होऊ शकतात याचा आढावा घेऊया.
अॅसिडिटी
प्रदूषणातील दूषित हवेमुळे मळमळ होते. तसेच श्वासाबरोबर आम्लपित्ताच्या रोगाचे लक्षण, जसे की पोटामध्ये किंवा पोटाच्या वरच्या भागात किंवा छातीत जळजळ होणे हे दिसून येते. यामुळे जठरात किंवा आतड्यात व्रण (अल्सर) होऊ शकतो. तसेच व्रणाशिवाय पोटामध्ये दुखणे, वारंवार ढेकर येणे व गॅसेस होणे (डीस्पेप्सिया) हे प्रदूषणामुळे होऊ शकते. ढेकर देणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. भरभर जेवतांना किंवा पाणी पितांना नकळत हवा पोटात शिरते. ती हवा मग ढेकर देण्याच्या रुपाने बाहेर पडते.
हेही वाचा : खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून लावल्यास खरेच केसांची वाढ होते का? डॉक्टर म्हणाले…
अपचन
प्रदूषणामुळे अन्नपचन योग्य तऱ्हेने होत नाही. अन्न नीट पचले नाही तर आपण अपचन झाले असे म्हणतो. आपल्या शरीरात काही पाचक रसांची कमतरता असल्यास अन्नपचन योग्यरित्या होत नाही. अन्न नीट पचले नाही तर तसेच ते पुढे जाते व त्यातील मोठे कणही आतड्यांत शोषले जातात, त्यामुळे अॅलजी होऊ शकते. अन्नपचन योग्य झाले नाही तर शरीरासाठी आवश्यक असलेली पोषणद्रव्ये तयार होत नाहीत व थकवा जाणवून लागतो.
आतड्याची चिडचिड (IBS -Irritable Bowel Syndrome)
गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या संशोधनात असे लक्षात आले आहे की, हवा व पाणी यांच्या प्रदूषणामुळे आतड्याच्या चिडचिडीचे प्रमाण वाढले आहे. IBS (Irritable Bowel Syndrome) त्रास असलेल्या व्यक्तीला आव पडते किंवा बद्धकोष्ट होते. कधी कधी संडासला अनेक वेळा जावे लागते. अन्नपदार्थातील रासायनिक प्रदूषणामुळे असे होऊ शकते.
डिस्बायोसिस (आतड्यातील सूक्ष्मजीव असंतुलन)
मायक्रोबायोटा ज्याला मायक्रोबायोम म्हणूनही ओळखले जाते, हा सूक्ष्मजीवांचा समुदाय आहे जो आपल्या शरीरात आणि त्यावर बांडगुळाप्रमाणे राहतो. या सूक्ष्मजीवांमध्ये बॅक्टेरिया, आर्किया बुरशी, विषाणू आणि प्रोटोझोआ यांचा समावेश होतो. यातील बहुसंख्य सूक्ष्मजीव निरुपद्रवी किंवा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सर्वसाधारणपणे आपल्या आतड्यांत वर सांगितल्या प्रमाणे 100 ट्रिलियन सूक्ष्मजीव एकत्र राहतात. प्रदूषणामुळे ह्या सूक्ष्मजीवामध्ये बदल होऊन शरीराला घातक असे जीवाणू तयार होतात. त्यांचा अनेक आजारांशी व आरोग्य परिस्थितींशी जोडलेले आहे. ह्याची काही उदाहरणे:
ए) दाहक आंत्र रोग (Inflammatory Bowel Disease ): IBD हा विकारांचा एक समूह आहे. ह्यामध्ये क्रॉन्स crohns disease या सारखा आतड्यांवर जखमा करणारा आजार आहे. ह्यामुळे शौचातून रक्त व आव जावू शकते व आतडे अरुंद होऊ शकते. पूर्वी हा आजार भारतामध्ये अभावानेच आढळत होता. परंतु, वाढलेल्या प्रदूषणामुळे ह्या आजाराचे प्रमाण आता वाढले आहे. हवा प्रदूषण व आपली स्वयंप्रतिकार शक्ती यांच्या बदलामुळे आपल्या शरीरात सायटॉकिन्स (पेशीतील संप्रेरक) यांची वाढ होते व त्या मुळेच हे आजार वाढल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : १०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…
बी) लठ्ठपणा: लठ्ठपणा ही शरीरातील अतिचरबीमुळे दर्शविलेली एक स्थिती आहे. सूक्ष्मजीवामध्ये बदल झाल्याने चयापचय योग्य होत नाही व लठ्ठपणा वाढतो.
सी) मधुमेह: सूक्ष्मजीवामध्ये बदल झाल्याने मधुमेह होऊ शकतो.
डी) स्वयंप्रतिकार रोग: स्वयंप्रतिकार रोग ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती शरीराच्या स्वतःच्या ऊतींवर हल्ला करते.
ई) कर्करोग: कर्करोग हा एक आजार आहे जो पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो.
चांगले पर्यावरण हे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. बदलत्या पर्यावरणामुळे व प्रदूषणामुळे पोटाचे आरोग्य धोक्यात आले आहे व त्यामुळेच विविध आजार वाढले आहेत. मनुष्याचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी, आपल्या आसपासचं पर्यावरण कसं आहे ते पाहणं आवश्यक आहे. पर्यावरणातील अवनती, वायुमानातील प्रदूषण, कमी वृक्षारोपण, जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) अशा गोष्टींनी आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पर्यावरणातील बदलांमुळे आपली आहारपद्धती, पाण्याचा वापर आणि अन्य काही घटक परिस्थितीत बदलतात त्यामुळे पोटातील विकार होऊ शकतात.
हेही वाचा : Sugarcane : उन्हाळ्यात उसाचा रस पिताय? जाणून घ्या, उसाचे सेवन करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?
पर्यावरणातील अनियमितता, वायुमानातील प्रदूषण, औषधे आणि खाद्यांमध्ये असलेले अनिवार्य रासायनिक पदार्थे आपल्या पाचक प्रणालीला प्रभावित करू शकतात. ह्यामुळेच पोटाच्या समस्या हल्ली खूप वाढल्या आहेत. पोटाच्या समस्या रोखण्यासाठी प्रदूषण विरहीत आहार, पाणी आणि हवेची गुणवत्ता, मायक्रोबायोम आरोग्य आणि मानसिक स्वास्थ यासारख्या पर्यावरणीय घटकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य उपक्रम, नियामक उपाय आणि वैयक्तिक जीवनशैलीतील बदल हे बदलत्या पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाताना पोटाच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. म्हणूनच आरोग्यासाठी पूरक वातावरण तयार करण्यात, वन्यजनांचं संरक्षण करण्यात, आणि प्रदूषण कमी करण्यास आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. पोटाच्या स्वास्थ्यासाठी हवा, पाणी व अन्नाची रासायनिक प्रदूषण नियंत्रित केले पाहिजे व या मध्ये समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे. पर्यावरण आणि पाचक आरोग्य यांच्यातील गुंतागुंतीचे परस्परसंबंध ओळखणे आणि समजून घेणे हे परिपूर्ण आरोग्यासाठी महत्वाचे आहे.