“डॉक्टर, समीरला गोळ्या सुरू करून तीन महिने झाले. या आजाराची सुरुवात होण्याआधी जसा समीर होता ना, तसा आता हळू हळू परत वाटायला लागला आहे.” समीरची आई सांगत होती. खरेच होते ते. समीरला होणारे भास, मनात निर्माण होणारे संशय सगळे बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. त्याचा रागही खूप कमी झाला होता. आता त्याला झोप लागत होती, तो स्वतःची कामे करू लागला होता. “प्रतीक्षाला आम्ही आजारपण सुरू होऊन महिनाच झाला आणि औषधे सुरू केली, आज ती १००% बरी आहे. पण डॉक्टर आता सहा महिने झाले. किती दिवस औषधे सुरू ठेवायची?” असे अनेक प्रश्न रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात असतात.
आणखी वाचा: Mental Health Special: स्किझोफ्रेनिया अनुवांशिक आहे? तरुण वयातही होऊ शकतो?
स्कीझोफ्रेनियावर अनेक परिणामकारक औषधे आज उपलब्ध आहेत. स्कीझोफ्रेनियामध्ये मेंदूतील रसायनांचे संतुलन बिघडते. औषधांच्या मदतीने रासायनिक संतुलन परत निर्माण केले जाते. उदा. डोपामिन या रसायनाचे प्रमाण स्कीझोफ्रेनियात जास्त प्रमाणात आढळते, त्यामुळे ते कमी करणारी औषधे दिली जातात. उदा. हॅलोपेरिडॉल, ट॒रायफ॒लुपरेझिन(haloperidol, Trifluperazine). डोपामिन आणि सिरोटोनिन मधील बिघडलेले संतुलन पुनः प्रस्थापित करण्यासाठी रिस॒पेरिडोन, ओलॅन॒झेपिन (Risperidone, olanzapine) सारखी विविध औषधे दिली जातात. अनेक वर्षांच्या शास्त्रीय संशोधनाने या औषधांची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. या औषधोपचाराविषयी थोडी सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. जितक्या लवकर उपचार सुरू होतील तितके ते परिणामकारक असतात. स्किझोफ्रेनिया हा दीर्घ काळ चालणारा विकार आहे, त्यामुळे औषधेही बराच काळ द्यावी लागतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे बंद करावीत. रुग्णाच्या विकाराच्या तीव्रतेनुसार आणि किती वेळा विकाराचा त्रास झाला आहे या वर औषधे किती काळ द्यायची हे ठरते. दोन वर्षे, पाच वर्षे किंवा अनेक वर्षे असे हे औषधोपचार सुरू ठेवावे लागतात.
आणखी वाचा: दुभंगलेल्या मनाचा विकार
“गोळ्यांचे प्रमाण वाढवल्यापासून समीर दिवसभर झोपतो. त्याचे हातही हल्ली थरथरतात. असे का होते आहे?” डॉक्टरांनी गोळ्यांचे दुष्परिणाम (side effects) काय होऊ शकतात हे समजावले, “ काही वेळेस गोळ्यांमुळे जास्त झोप येते. बरे झाले सांगितलेत ते, आपण डोस बदलू गोळ्यांचा. काही गोळ्यांनी हात पाय थरथरू शकतात, विशेषतः डोस जास्त असेल तर. आपण डोस कमी करू शकतो किंवा गोळी सोसत नाही असे वाटले तर गोळ्या बदलता येतात. तरुण मुलींमध्ये पाळी अनियमित होऊ शकते. अशा कुठल्याही दुष्परिणामासाठी गोळ्यांचा डोस कमी करणे, दुसरी पूरक गोळी देणे किंवा औषध बदलणे असे उपाय योजता येतात. साईड इफेक्ट आला म्हणून घाबरून जाऊ नये. सातत्याने डॉक्टरांना भेटणे, त्यानी महिन्याभराने बोलावले तर सांगितल्या दिवशी जाणे महत्त्वाचे ठरते. म्हणजे डॉक्टरांना औषधांचे अपेक्षित परिणाम आणि विपरीत परिणाम दोन्ही गोष्टी तपासून पाहता येतात, पेशंट आणि नातेवाईक यांच्या मनातल्या शंका दूर करता येतात.”
स्किझोफ्रेनिया नियंत्रणात आणायला उपायांमधील सातत्य अत्यावश्यक असते. बऱ्याच वेळा पेशंटना आपल्या आजारपणाची जाणीव (insight into illness) नसते. त्यामुळे उपचारांचे महत्त्व त्यांना कळत नाही. अशा वेळेस घरातल्या कोणालातरी रोजच्या रोज गोळ्या द्याव्या लागतात. कधी कधी पेशंटना रोज औषधे खाण्याचा कंटाळा येतो, असे वाटते की आता मी बरा आहे. मग गोळ्या का घ्यायच्या? अनेक जण गोळ्या बंद करतात. काही वेळा घरातल्यांना वाटते की अशा मानसिक विकाराच्या गोळ्या घेणे म्हणजे त्यांची सवय लागते, व्यसन लागते. लक्षात असे ठेवले पाहिजे की या गोळ्यांचे व्यसन लागत नाही. मेंदूतील मूळ दोष रासायनिक असंतुलनाचा असतो, तो दोष दूर करण्यासाठी गोळ्या सुरू ठेवाव्या लागतात. परंतु अनेक वेळा औषधे बंद केली गेली, तर एक पर्याय असा असतो की ३-४ आठवड्यातून एकदा एक इंजेक्शन दिले जाते ज्याचा परिणाम तितके आठवडे टिकतो.(long acting) काही रुग्णांमध्ये याचा उपयोग केला जातो आणि लक्षणे नियंत्रणात राहतात.
“डॉक्टर, आपण समीरला अॅडमिट करून तीन महिने झाले. आता लक्षात येते, तेव्हा ई.सी.टी. दिले म्हणून आज तो इतका बरा आहे!” मला आठवले, बऱ्याच वेळा चर्चा करून ई.सी.टी. च्या प्रक्रियेबद्दल असलेल्या सगळ्या शंकांचे निरसन केल्यावरच समीरच्या आई वडिलांनी ई. सी. टी. द्यायला परवानगी दिली होती. असे लेखी अनुमोदन (informed, written consent) घेतल्याशिवाय ई.सी.टी. देता येत नाहीत. ई.सी.टी. दिल्याचे फायदे मात्र नक्की असतात. स्वतःची काळजी न घेणारे रुग्ण, अति आक्रमकता असलेले रुग्ण, आत्महत्त्येचे सतत मनात विचार येणारे रुग्ण, एका जागी स्तब्ध असलेले, कोणाशी संपर्क नाही, बोलणे नाही असे जणू पुतळ्यासारखे असलेले रुग्ण अशांना ई.सी.टी.चा खूप फायदा होतो. वर्षानुवर्षे शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झालेला हा उपाय आहे.
औषधे, आवश्यक तर इंजेक्शन, ई.सी.टी. अशा अनेक उपचारांनी स्किझोफ्रेनिया सारख्या गंभीर मानसिक विकाराचा सामना करता येतो. उपचारांचे लक्ष्य रुग्णाची लक्षणे कमी होणे हे असतेच, पण एवढेच मर्यादित उद्दिष्ट नसते. रुग्ण पुन्हा एकदा समाजात सामावून जाणे आणि त्याचे आयुष्य सुरळीत सुरू राहणे हा उद्देश मनात ठेवून उपचार केले जातात. त्या संदर्भात पुढील लेखात.