राधा – वय वर्ष २८. “गेली अनेक वर्ष मी स्वतःवर काम करतेय. मी कधीच अतिरेकी खात नाही. पण माझा सगळ्यात मोठा इश्यू म्हणजे तोंडाला येणारा स्पेसिफिक वास. आधी वाटलं दुधामुळे होतंय . मग वाटलं डेंटल हायजिन बिघडलंय. अलमोस्ट सगळं ट्राय करतेय. आणि वजन वाढीव आहेच म्हटलं बघू जर डाएट करून काही फरक झालाच तर उत्तम! मी एकदा फक्त फळं खाऊन पाहिलं पण काहीच उपयोग झालाय असं वाटत नाही. काही दिवस फ्रेश वाटलं..पण पुन्हा वजन एवढं वाढलं आणि मी नेहमीपेक्षा जास्त थकतेय असं जाणवायला लागलं. मग म्हटलं पुरे झाले प्रयोग. मला आता खरंच शिस्तीत खाण्यापिण्यावर काम करायचंय.
राधाने सहा महिने स्वतःवर उत्तम काम केलं. आहारात बदल केले. आणि या कालावधीमध्ये तिचे आरोग्य उत्तम झाले आणि तोंडाची दुर्गंधी देखील नाहीशी झाली. तिच्या भेटण्याने तोंडाची दुर्गंधी हा पोटाच्या आरोग्याबाबत महत्वाचा मुद्दा आहे आणि तो बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे हे अधोरेखित झालं. तोंडाला येणारी दुर्गंधी ही सामान्यतः सगळ्याच वयोगटातील लोकांना जाणवणारी गोष्ट पण लक्षात यायलाच खूप वेळ लागतो. आजूबाजूला माऊथ फ्रेशनर , च्युईंग गम, मिंट चघळणारी अनेक माणसं तोंडाच्या दुर्गंधीचं भान ठेवून विविध पदार्थ खाताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

आहारशास्त्रानुसार किंबहुना शरीर शास्त्रानुसार पाहिलं तर तुमच्या आतड्याच्या आरोग्याचा आणि तोंडाच्या दुर्गंधीचा जवळचा संबंध असल्याचं आढळून येतं. जिभेवर साचणारा फिका पांढरा थर अपचनाचं लक्षण आहे. अपचन झालं तर आपल्या लक्षात येण्याअगोदर शरीरात पोषक तत्त्वांचे पचन अवघड होते. यामुळेच बद्धकोष्ठ होण्याची शक्यता देखील वाढते.

आपण दिवसभरात २ वेळा दात स्वच्छ करावेत असं अनेकदा सांगूनही आपण दातांबाबतीत दातदुखी सुरु झाल्याशिवाय दातांच्या आरोग्य कडे लक्ष देत नाही.जेवण झाल्यानंतर तोंड धुणे पुरेसे नाही तर चूळ भरणे तितकेच महत्वाचे असते हे झालं तोंडाच्या स्वच्छतेबाबत !

आहाराबाबत जाणून घ्यायचं झालं तर कोणते पदार्थ तोंडाच्या दुर्गंधीस कारणीभूत ठरतात हे देखील पाहूया.

मसालेदार पदार्थ

वापरलेल्या तेलात तयार होणारे पदार्थ म्हणजे संतृप्त तेलात तयार केले जाणारे पदार्थ किंवा पामतेल वापरून तयार केले जाणारे पदार्थ. यामुळे देखील तोंडाला दुर्गंधी येणे सुरु होऊ शकते. तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थांमध्ये बेकरी पदार्थांची यादी मोठी आहे.

त्याचप्रमाणे यावेळी खाल्ले जाणारे पदार्थदेखील कारणीभूत आहेत. विशेषत: उशिरा मिठाई किंवा आईस्क्रीम खाणे किंवा साठवणीचे म्हणजे शिजवून साठवून ठेवलेले पदार्थ (साठवून ठेवलेल्या ग्रेव्हिस, साठवून ठेवलेले ८ ते १० तास शिजवून ठेवलेले अन्न ) जर नियमितपणे खाल्ले जात असेल तरीदेखील तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.

जर तुम्ही सिगारेट ओढत असाल अगदी ती कितीही नैसर्गिक स्वरूपात असली तरीही ! माझ्या माहितीत च्युइंग गम किंवा मिंट चघळणाऱ्या ५०% हून जास्त लोकांपैकी जास्त लोक सिगारेट ओढणारे आहेत.

दारू, साखरयुक्त पेये किंवा शीतपेये पिणारे अनेकजण तोंडाच्या दुर्गंधीबद्दल तक्रार करतात. कारण या सगळ्याच पेयांमधून शून्य पोषकतत्त्वं मिळतात. आहार उत्तम, शक्य तितका पोषक आणि सकस असेल तर तोंडाची दुर्गंधी दूर होऊ शकते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहारात फळांचा समावेश करणे. आणि फळे चावून खाणे हा त्यातील महत्वाचा मुद्दा !

संत्रं, अननस, लिंबू, पपनस यासारखी फळ तोंडात लाळग्रंथींचं काम सुधारतात आणि तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत करतात. सालासकट खाल्लं जाणारं सफरचंद लाल आणि हिरवं दोन्ही प्रकार राखतात. या मोसमात स्ट्रॉबेरी , मलबेरी , स्टारफ्रुट , जाम यासारखी फळं मिळतात. यात असणारे क जीवनसत्त्व श्वास ताजातवाना राखण्यास मदत करतात. विशेषत: कोणत्याही जीवाणूंची वाढ होऊ न देणं आणि दातांचं तसेच हिरड्यांचा आरोग्य उत्तम राहिल्याने तोंडाची दुर्गंधी आपोआप कमी होते.

यातील कोणत्याही फळांचे रस पिण्यापेक्षा फळे चावून खाणे उत्तम मानले जाते. स्ट्रॉबेरीमध्ये असणारे मॅलिक ऍसिड दात पांढरे राहण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. लहान मुलांना कॅल्शिअम आणि सकस आहारासाठी नेहमी रात्री झोपताना दूध पिण्याची सवय लावली जाते. मात्र दूध प्यायल्यानंतर दात स्वच्छ करणे देखील तितकेच महत्वाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. नाहीतर दूध नियमित पिऊन तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास दातांवर दुधाळ वास असणारा पिवळसर थर तयार होत जातो. जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

आहारात भरपूर तंतूमय पदार्थ असणारे पदार्थ आवर्जून समाविष्ट करणे, फळे तसेच पालक, कोथिंबीर, पालेभाज्या किमान एका जेवणात तरी असणे अत्यावश्यक ठरते. अनेकदा जेवण झाल्यानंतर वेलची चघळावी असा सल्ला दिला जातो. वेलची चघळल्यामुळे लाळग्रंथींचे काम उत्तम होते आणि त्यामुळे देखील पचन सुधारते. याचप्रमाणे पचन सुधारण्यासाठी दालचिनीचे पाणी पिणे, काकडी-पुदिन्याचे पाणी पिणे यांनीदेखील उत्तम फायदे होतात.

पोट साफ असेल तर तोंडाची दुर्गंधी आपोआप कमी होते. पिण्याचे पाणी तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी उत्तम मानले जाते. याच पाण्यात पुदिना एकत्र करून नियमितपणे प्यायल्यास तोंडाचे आरोग्य आणि दुर्गंधी दोन्ही दूर होऊ शकते.

आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे टूथपेस्ट – कोणत्याही रंगीत टूथपेस्टमुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते हा गैरसमज आहे. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी ही बाह्य गोष्टीवर अवलंबून असणारी समस्या नाही हे नक्की लक्षात ठेवावे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What causes bad breath and how to combat it foods to eat and avoid to prevent bad breath easy ways to get rid of bad breath and maintain good oral oral hygiene psp