वयाच्या तिशी पस्तीशी नंतर आपण कित्येकांना मानेवर छोटी-मोठी चामखीळे आलेली बघतो. कधी एखाद दुसरा चामखीळ असतो. तर कधी दहा-पंधरा चामखीळांनी मान भरलेली असत. आज आपण या चामखीळांबद्दल माहिती घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चामखीळांना इंग्रजीमध्ये Skintag व वैद्यकीय भाषेत Acrochordon म्हणतात. ही होण्याचे एक कारण म्हणजे अनुवंशिकता. म्हणजेच जर आपल्या आई-वडिल, आजी-आजोबा, काका, मामा किंवा आत्या, मावशी यांना अशा प्रकारची चामखीळे असतील तर ती आपल्याला होण्याची शक्यता जास्त असते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे स्थूलपणा ज्यांचे वजन त्यांच्या उंचीच्या मानाने जास्त आहे अशा व्यक्तींनाही अशी चामखिळे होतात. आपण स्थूल तर नाही ना हे पाहण्यासाठी आपला बॉडी मास इंडेक्स ( BMI ) पाहावा.

आपले वजन भागिले आपल्या मीटरमधील उंचीचा वर्ग म्हणजे आपला BMI. समजा एखाद्या पुरुषाचं वजन ७५ किलो व उंची १.६ मिटर ( ५ फूट ३ इंच ) आहे. तर त्याचा BMI = ७५ / (१.६)२ (१.६चा वर्ग) = ७५/२.५६ = २९.३ आपला BMI हा साधारणपणे १८ ते २५च्या मध्ये असावा. ढोबळपणे सांगायचे म्हणजे आपली उंची सेंटीमीटर मध्ये जेवढी असेल उणे १०० एवढे आपले वजन असावे. ज्यांना मधुमेह असतो किंवा ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता असते ( pre diabetic ) त्यांनाही अशी चामखीळे होण्याची दाट शक्यता असते. गरोदरपणी देखील अशा प्रकारची चामखीळे येण्याची शक्यता जास्त असते.

हेही वाचा : मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका ‘या’ ७ पदार्थांनी होऊ शकते कमी; कसे कराल सेवन?

मानेवरची चामखीळे म्हणजे त्वचेचीच एक प्रकारची वाढ असते. पण ती कर्करोगाची नसते व त्यामध्ये कधी कर्करोग होतही नाही. ही चामखीळे त्वचेच्या रंगाची किंवा थोडी काळपट असतात. एखादा चामखीळ जर जास्त काळा असेल तर तो तिळासारखा देखील भासतो. जास्त करून चामखीळे मानेवर असतात. परंतु कधीकधी ती काखेत किंवा जांघेत किंवा डोळ्याच्या वरच्या पापणीवर किंवा गालांवर देखील असू शकतात. स्त्रियांच्या स्तनांखालीही ती येऊ शकतात. तसेच स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांवरदेखील ती येऊ शकतात. ती हाताला नरम लागतात व बहुतेक वेळा त्यांना देठही असतो. त्यांचा आकार एक ते पाच मिलिमीटर एवढा असतो. क्वचित एखादे चामखीळ तर बदामाएवढ्या किंवा आणखी मोठ्या आकाराचेदेखील असते. पण त्याला देठ असतो. त्याला Giant Acrochordon म्हणतात. बहुतेक वेळा चामखीळांचा काही त्रास होत नाही पण कधी कधी त्यांना खाज येते किंवा ती दुखतात. कधी कधी देठ असलेल्या चामखीळाला हाताळल्यामुळे, तसेच कपडा किंवा दागिना घासल्यामुळे अचानक पीळ बसतो. त्यामुळे त्याचा रक्तप्रवाह कमी होतो. ते लाल होते व सुजते. जास्त दुखायला लागते. पण असे क्वचितच होते. कधी कधी एखादे चामखीळ दागिन्यात अडकले किंवा खेचले गेले तर त्यातून रक्त येऊ शकते व तिथे थोडी जखम होऊ शकते. बहुतेकांना चामखीळांचा काही त्रास होत नसला तरी ती दिसण्यास चांगली दिसत नसल्यामुळे एखाद्याला त्याची चिंता वाटू शकते. तसेच एखाद्याचा आत्मविश्वास त्यामुळे ढळू शकतो. साधारण वयाच्या तिशीनंतर ही चामखीळे येण्यास सुरुवात होतात व जसं वय वाढत जातं तसे ती संख्येने वाढत जातात. साधारण ४५ प्रतिशत लोकांना अशी चामखीळे असतात. आणखी एक वेगळ्या प्रकारची चामखीळे असतात. जी विषाणूमुळे होतात. त्यामुळे त्यांना Viral Warts असे म्हणतात. ही चामखीळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुठल्याही वयामध्ये होऊ शकतात व संसर्गजन्य आजार असल्यामुळे ती एकाच्या बाजूला दुसरी असे करत करत संख्येने वाढत जातात. या चामखीळांचा पृष्ठभाग हा कॉलीफ्लॉवरसारखा खरखरीत असतो व ही चामखिळे skintags सारखी नरम नसतात व त्यांना skintag सारखा देठही नसतो. या Viral warts बद्दल आपण पुढील भागात माहिती घेऊ.

हेही वाचा : Mental Health Special : मुलांना लागलेलं स्क्रीनटाईमचं व्यसन कसं सोडवाल?

चामखिळे ( Skintags ) असल्यास काय करावे?

चामखिळे होऊ नयेत किंवा झाल्यास ती संख्येने व आकाराने मोठी होऊ नयेत यासाठी वजन आटोक्यात ठेवणे, तसेच मधुमेह असल्यास तो नियंत्रणात ठेवणे व रोज एअरोबिक व्यायाम करणे आवश्यक आहे.

चामखिळे जर न काढता तशीच ठेवली तर त्याने काहीही विपरीत होत नाही. एकदा तर एक वयस्क गृहस्थ माझ्याकडे वयाच्या पासष्ठीकडे चामखीळे काढायला आले. त्यांना ती बरीच वर्षे होती. म्हणाले , ‘ही असल्यामुळे माझा नातू माझ्याकडे येत नाही’. त्यामुळे जर एखाद्याला दिसण्यास बरी वाटत नसतील तर त्याने ती काढून घ्यावीत. वर नमूद केल्याप्रमाणे जर एखादे चामखीळ देठाभोवती पिळले गेल्यामुळे अचानक लाल होऊन दुखायला लागले तर ते लवकर काढून घेणे बरे.

हेही वाचा : चहा पिणे पूर्णपणे बंद केल्यास वजन होते कमी? डॉक्टर काय सांगतात, वाचा

कधी कधी काही जण चामखीळ घालवण्यासाठी म्हणून त्याच्या मुळाशी घोड्याचा केस किंवा तंगुससारखा दोरा बांधतात. त्यामुळे तेथील रक्तप्रवाह थांबून चामखीळ गळून जाऊ शकतो. पण हे होताना चामखीळ लाल होते, सुजते, दुखू लागते व कधीकधी पिकते देखील. अशी गुंतागुंत होत असल्यामुळे अशा गोष्टी टाळणेच बरे. कोणी कोणी अशा चामखीळांवर इतरांचे ऐकून चुना व पापडखार किंवा आणि काहीतरी जालीम ऍसिड लावतात. त्यामुळे तर चामखीळाबरोबरच आसपासची त्वचाही भाजली जाते व तिथे खोल व मोठी जखम होऊ शकते व ती बरी झाल्यावर त्याचा व्रणही राहू शकतो. तसेच या दोन्ही प्रकारच्या उपायांमुळे चामखीळ अर्धवट निघून अर्धवट तसाच राहू शकतो. त्यामुळे असे अघोरी उपचार टाळणेच बरे. अशा प्रकारचे चामखीळे काढण्यासाठी त्वचारोगतज्ञांकडे रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉटरी हे उपकरण असते. आधी चामखीळाच्या मुळाशी सुन्न करायचे इंजेक्शन मारून तो भाग बधिर केला जातो. त्यानंतर या उपकरणाच्या सहाय्याने चामखीळ काढले जाते. अशा प्रकारे काढल्यामुळे चामखीळाच्या बाजूच्या त्वचेला फारच कमी इजा पोहोचते. त्यामुळे जखम भरल्यानंतर त्या ठिकाणी व्रणही नगण्य राहतो. तसेच चामखीळ काढताना रक्त आल्यास तेही त्या उपकरणामुळे लगेच थांबवता येते. चेहऱ्यावरची व अगदी पापणीवरची देखील चामखिळे या उपकरणाने काहीही गुंतागुंत न होता काढता येतात. अति थंड अशा द्रवरूप नत्रवायू ( Liquid Nitrogen ) चा फवारा वापरून देखील छोटी छोटी चामखीळे काढता येतात.अशा वेळी तिथे इंजेक्शनने सुन्न करायचीही गरज पडत नाही. या उपचाराला क्रायोथेरपी ( Cryotherapy ) असे म्हणतात. या नत्र वायूचे तापमान हे उणे १९२ डिग्री एवढे असते. काही त्वचारोगतज्ञ लेझर उपकरणाच्या सहाय्यानेही चामखीळे काढतात. त्यामुळे skintags काढण्यासाठी त्वचारोगतज्ञांकडे जाणे सोयीस्कर.

हेही वाचा : Health Special: थंडीमध्ये उडदाचे पदार्थ का खावेत? आयुर्वेद काय सांगतो?

Skintags किंवा चामखिळे ही तशी निरूपद्रवी बाब आहे. परंतु ती जर नरम नसून घट्ट व कॉलीफ्लावरसारखी खरखरीत असतील व एकाच्या आसपास अनेक येऊन संख्येने लवकर वाढत असतील तर ते Viral wart असण्याची शक्यता असते. चामखीळ जर एखादे असेल व ते हळूहळू पण सतत वाढत असेल तर ते चामखीळ नसून त्वचेचा कर्करोग असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्वचारोगतज्ञांचा सल्ला घेणे उत्तम.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What causes viral warts and skintags on neck how to remove skintags and warts hldc css
Show comments