१२ ऑक्टोबर हा जागतिक संधिवात दिवस म्हणून पाळला जातो. यंदा या दिवसाची संकल्पना ‘इन्फॉर्म्ड चॉईसेस अँड बेटर आउटकम्स अशी आहे. रुग्णांना संपूर्ण आणि योग्य माहिती देऊन उत्तम उपचार आणि परिणाम साध्य करण असं मूळ उद्दिष्ट आहे. आर्थरायटिस हा आजार सर्वपरिचित आहे, मात्र याची संपूर्ण माहिती लोकांमध्ये अजूनही नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अनुषंगाने एकंदरीत आर्थरायटिस आणि त्यामधे होणार्‍या वेदनांबद्दल जाणून घेणं आपली क्वालिटी ऑफ लाइफ निश्चितपणे वाढवणार आहे. यामुळे आर्थरायटिसमुळे समाजावर आलेला शारीरिक, आर्थिक आणि भावनिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा >>>Health Special: पावसाळ्यातील कोणते पाणी प्यावे? कोणते पिऊ नये?

आर्थरायटिस हा सांध्याशी निगडीत आजार आहे. यात सांध्याला सूज येणं, सांधे दुखणं, सांधे आखडणं, यासारखी लक्षणं जाणवतात, कधी कधी सांध्यातून कटकट आवाज येतो. आर्थरायटीसचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. डिजनरेटिव आर्थरायटिस आणि इन्फलमेटरी आर्थरायटिस. आधी आपण डिजनरेटिव म्हणजेच वयानुरूप होणार्‍या आर्थरायटिस बद्दल जाणून घेऊया.

डिजनरेटिव आरथ्रायटीस हा वयानुसार सांध्यामध्ये होणार्‍या बदलांमुळे होतो.  साहजिकच हा शरीराच्या वजन पेलणार्‍या सांध्यामध्ये होतो. (उदाहरणार्थ गुडघा, खुब्याचा सांधा). डिजनरेटिव आर्थरायटिसला Osteoarthritis असं संबोधलं जातं.

जगभरात सगळ्यात जास्त आढळणारा  Osteoarthritis चा प्रकार म्हणजे गुडघ्याचा osteoarthritis (Knee Osteoarthritis) आपण त्याबद्दल समजून घेऊया,

हेही वाचा >>>तुम्ही दररोज किती वेळा मिठी मारता? जाणून घ्या, मिठी मारणे हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर?

गुडघ्याचा सांधा दोन हाडं (मांडीचं हाड आणि पोटरीचं हाड)  आणि त्यांच्यावर असलेलं आवरण म्हणजेच कार्टीलेज याने तयार होतो. कार्टीलेज हा एक प्रकारचा कनेक्टिव टिशू आहे, थोडक्यात एक संरक्षक आवरण आहे. ज्यामुळे दोन हाडं एकमेकांवर सुरळीतपणे (घर्षण) न होता फिरू शकतात किंवा ग्लाइड होतात. हाडांच्या एकमेकांवर ग्लाइड होण्यामुळे  आपल्या रोजच्या हालचाली सहज शक्य होतात. पायर्‍या चढणं उतरणं, चालणं, उकिडवं बसणं, खाली बसून उभं राहणं अशा हालचाली हाडांच्या स्मूथ (घर्षण विरहित) होणार्‍या ग्लायडिंग मुळे शक्य होतात. कार्टिलेजबरोबर अजून एक घटक जो या हालचाली सुलभ करतो तो म्हणजे सायनोवियल फ्लूईड. हे एक अशा प्रकारच द्रव्य आहे जे सांध्यामध्ये वंगण म्हणून काम करतं. कार्टिलेजमध्ये कोनड्रोसाइट नावाचा एक घटक असतो. या घटकाचं मुख्य काम कार्टिलेजची झालेली झीज भरून काढणं आणि नवीन कार्टिलेज तयार करणं हे आहे. निरोगी गुडघ्यामध्ये हे कोनड्रोसाइट आपलं काम अव्याहतपणे करतात.  पण खाली दिलेल्या एका किंवा अनेक कारणांमुळे या कोनड्रोसाइटस च्या कामात अडथळा येतो, त्यामुळे कार्टिलेजची झालेली झीज भरून निघत नाही आणि नवीन कार्टिलेज तयार होण्याची प्रक्रिया देखील मंदावते.

वय, स्थूलत्व, सांध्याचा अतिवापर, पोषण मूल्यांची कमतरता, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, क्वचितप्रसंगी सांध्याला झालेली इजा या कारणांनी कोनड्रोसाइटसचं काम तितक्या प्रभावीपणे होत नाही. झालेली झीज भरून न निघल्यामुळे आणि नवीन कार्टिलेज निर्मिती न झाल्यामुळे हळूहळू कार्टिलेज मऊ पडतं, त्यातली लवचिकता कमी होते आणि ते विरून जायला सुरुवात होते. हाडांचा पृष्ठभाग उघडा पडतो. रोजच्या आयुष्यातील हालचाली करताना हे हाडांचे पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात आणि त्यामुळे वेदना होतात.

यापुढील लेखात आपण र्‍हुमॅटॉईड आर्थरायटिस बद्दल अधिक जाणून घेऊया.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What changes does arthritis cause in the body hldc amy