डॉ. जान्हवी केदारे
धावतपळत विमानतळावर पोहोचले. वाटले आपल्याला उशीरच झाला, पण पाहिले तर विमान अनिश्चित काळापर्यंत उशीरा सुटेल अशी सूचना लावली होती. मला धक्काच बसला. आधीच रात्रीचे ९ वाजले होते. ‘आता कधी सुटणार फ्लाईट? कधी घरी पोचणार? उद्या सकाळी पुनः धावपळ आहे, ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचले पाहिजे.’ एक ना दोन…
अनेक विचारांनी मनात गर्दी केली. मग राग येऊ लागला. ‘हे एअरलाईन्सवाले काय झोपा काढतात का? असा कसा अनिश्चित काळापर्यंत उशीर असू शकतो? बेजबाबदारपणाची हद्द झाली.’ तेवढ्यात एक अधिकारी माणूस आला. त्याने सर्वांची माफी मागितली. एक मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले आणि निदान तीन तास लागतील असे म्हणाला. झाले, सगळ्यांनी नुसता त्याच्यावर हल्लाच चढवला. त्याला शिव्यांची लाखोली वहायलाही काही जण सरसावले, एक जण बाह्या सरसावतच पुढे आला. मीसुद्धा अस्वस्थ होऊन, स्वतःच्या नशिबाला दोष देत चुळबुळ करत एका खुर्चीत बसले.
आणखी वाचा-Mental Health Special : न्यूड फोटो पाठवताय… सावधान
शेजारी पहिले, एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन बसली होती. तिने खाऊचा डबा उघडला. गोष्ट सांगत मुलाला भरवले, लगेचच झोपवले आणि मग चक्क स्वतः खाऊन, प्रार्थना करून जमिनीवर आडवी झाली. पुढच्या पाच मिनिटात ती गाढ झोपली होती. विमानाची घोषणा झाली तेव्हा ती चटकन उठली, मुलाला उचलले आणि निघाली. तिच्याकडे पाहूनच मला शांत वाटले. मनात आले मी का नाही अशी शांत? माझ्या आजूबाजूचे लोकही का नाही थोडे सहनशील? केवढा मोठा फरक होता आमच्यात आणि तिच्यात! कुठून आला एवढा धीर तिच्याकडे?
परिस्थिती थोडीशी जरी बिकट झाली तरी आपण त्या परिस्थितीला दोष द्यायला लागतो. मग तिकीटाची खिडकी आपण रांगेत असताना अचानक बंद झाली किंवा साधे इंटरनेट लगेच सुरू नाही झाले तरी आपण अस्वस्थ होतो. मनात अशा परिस्थितीचे नेहमी नकारात्मक मूल्यमापन करून तशाच प्रकारच्या विचारांची एक मालिकाच तयार करतो आणि मग आपल्या भावनांवर आपला ताबा राहात नाही. राग येतो आणि कधी कधी रागाच्या भरात भांडण, मारामारी काहीही होऊ शकते.
सध्या आपल्या आयुष्याला एवढी गती आहे की छोट्या छोट्या गोष्टी मिळवताना आलेले अडथळे नकोसे वाटतात आणि धीर सुटतो, frustration येते. अधीरपणा, उतावळेपणा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम करतो. उतावळेपणामुळे लवकर निराशा येते, यश मिळण्यासाठी थांबण्याची तयारी नसते. त्यातून मानसिक ताण वाढतो. यातून बीपी वाढणे, मधुमेह, हृदयविकार असे आजार होऊ शकतात. अतिचिंता(anxiety disorder), उदासीनता (depression) असे मानसिक विकार होतात. याउलट धीर धरायला शिकण्याचे अनेक फायदे असतात. धीर धरणे म्हणजे तणावपूर्ण परिस्थितीमध्ये मनाची शांती कायम राखणे, आपल्या मनात नकारात्मक भावनांना स्थान न देणे. यातून परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन होते आणि संकटसमयी मार्ग सापडतो. उदा. बिल्डिंगला आग लागली आहे असे लक्षात आल्यावर उतावळेपणाने प्रतिक्रिया दिली तर असेल तसे घराबाहेर जावे असे वाटते, परंतु थोडा धीर बाळगला, (याचा अर्थ घरात बसून नाही राहायचे,) तर घाबरून पळत न सुटता आपल्या सुटकेची योजना करता येते आणि सुखरूपपणे बिल्डिंगमधून बाहेर पडता येते.
आणखी वाचा- Mental Health Special: मानसिक स्वास्थ्यासाठी आशावाद का महत्त्वाचा?
आयुष्यात मोठे लक्ष्य साध्य करायचे तरी धीर धरणे, मार्गातल्या अडचणींनी घाबरून न जाणे महत्त्वाचे असते. एखादा व्यवसाय यशस्वी करताना हे जितके महत्त्वाचे तितकेच आपल्यातील मानसिक बदल घडवून आणताना सुद्धा धीर धरणे आवश्यक असते. दारूचे व्यसन सोडण्याचा प्रयत्न करताना दारू नाही मिळाली तर काही त्रास होणार, तो सहन करत धीराने वाट पाहणे, योग्य उपचार करणे उपयोगी ठरते. बरेच दिवस वजन कमी करण्याची योजना आखणाऱ्या स्त्रीला घाईघाईने वजन कमी करता येत नाही. एखाद्या आठवड्यात वजन वाढलेले दिसले, तर त्याचा अर्थ चालू केलेले डाएट चुकीचे असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. त्यापेक्षा हळू गतीने पण आपल्या जीवन शैलीमध्ये बदल घडवून आणत कमी केलेले वजन अधिक समाधान देते.
डीप्रेशनसारख्या आजाराला तोंड देतानाही जादू केल्यासारखे आपले डिप्रेशन दूर होणार नाही असे लक्षात ठेवावे लागते. आपण डिप्रेशनमधून बाहेर येणार आहोत हा विश्वास बाळगणे फार महत्त्वाचे. त्यातून धीर धरण्याची शक्ती निर्माण होते. आपल्या उदासीनपणाचे काय कारण आहे ते शोधून काढणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, उपचारासाठी आपल्यालाच नियम घालून घेणे, उदा. वेळेवर औषधाच्या गोळ्या घेणे, ठराविक दिनक्रम आखून घेणे आणि एकीकडे बरे होण्याची वाट पहाणे यातून उपचार यशस्वी व्हायला मदत होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी सुद्धा आपल्या कुटुंबातल्या मनोरुग्णाचा आजार स्वीकारून, तो बरा होण्याची प्रक्रिया लहानशी नाही, त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल हे समजून घेतले तर तेही मनात धीर बाळगतात आणि रुग्णालाही धीर देतात. म्हणजेच मनात धीर धरणे याचा अर्थ केवळ परिस्थिती अपोआप बदलण्याची वाट पाहणे नाही, तर त्या दिशेने पाऊल टाकण्याची योजना बनवून, त्या प्रमाणे मार्गक्रमणा करताना परिस्थिती बदलण्याची, यश मिळण्याची, अडचणी दूर होण्याची वाट पाहणे! अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी आपली धीर धरण्याची क्षमता वाढवता येते.
आणखी वाचा-Mental Health Special: हसणे मन:स्वास्थ्यासाठी किती आवश्यक?
आपली सहनशक्ती वाढवायची तर समोरच्या परिस्थितीचे वास्तववादी चित्र मनात असावे लागते. आपल्या भावनांचे त्यावर रोपण केले की तीच परिस्थिती अधिक गडद भासू लागते. त्या त्या वेळी नियोजनपूर्वक पावले उचलावी लागतात. पुढे येणाऱ्या अडचणींची कल्पना करून त्यावर उपाय योजावे लागतात. उदा. प्रवासाला जाताना पाणी जवळ बाळगणे, ट्रॅफिकमध्ये ऐकण्यासाठी जवळ गाण्यांचा साठा असणे किंवा पावसाळ्यात जवळ छत्री बाळगणे! इतक्या क्षुल्लक गोष्टीही आपल्याला मदत करतात. ‘एका वेळेस एक दिवस’ या तत्त्वानुसार जगले की भूतकाळाचे ओझे राहत नाही आणि भविष्याची चिंता सतावत नाही. ‘आज आत्ता’ काय करायचे यावर लक्ष केंद्रित करता येते. आजूबाजूची सगळीच परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाली असेल असा खोटा विश्वास न बाळगणेच इष्ट!
ध्यान करणे, मनात अंक मोजणे, दहा श्वास मनात मोजणे, श्वासावर लक्ष केंद्रित करणे, समोरच्याविषयी मनात अनुकंपा बाळगणे अशा उपायांनी आपण धीर धरण्याची सवय करू शकतो आणि मानसिक स्वास्थ्याच्या दिशेत मोठा पल्ला गाठू शकतो!
म्हणूनच समर्थ रामदासांनी म्हटले आहे,
धीर धरा, धीर धरा
हडबडू गडबडू नका!