स्त्री आणि मानसिक स्वास्थ्य याची चर्चा करणारा हा शेवटचा लेख. स्त्रीच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांवर घडणारे विशिष्ट मानसिक बदल आणि निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या आपण पहिल्या. रजोनिवृत्ती (menopause) हा त्यातला शेवटचा टप्पा. जसे पाळी येणे हा पौगंडावस्था दर्शवणारा आणि गरोदरपणा हा जसा तारुण्य दर्शवणारा काळ तसाच रजोनिवृत्तीचा काळ म्हणजे प्रौढपणाकडून वृद्धापकाळाकडे वाटचाल. अनेक शारीरिक आणि मानसिक बदल या काळात होतात आणि त्यांच्याशी प्रत्येक स्त्रीला जुळवून घ्यावे लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वसाधारणपणे ४५-५५ वयापर्यंत पाळी येते. शास्त्रीय व्याख्येप्रमाणे पाळी येणे बंद होऊन एक वर्ष पूर्ण झाले की रजोनिवृत्ती झाली असे म्हणतात. अंडाशयात बीजनिर्मिती होणे बंद होते आणि स्त्री विशिष्ट अंतःद्रव्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस॒टेरोन(estrogen and progesterone) हळू हळू कमी प्रमाणात तयार होतात. मध्यरात्री खूप घाम येणे(night sweats), अचानक मध्येच चेहरा, मान, छाती गरम झाली आहे असे वाटणे(hot flashes), असा अनुभव महिलेला येतो. त्याने अस्वस्थ व्हायला होते. आपल्याला काय होते आहे हे समजत नाही; कधी कधी भीती वाटते. या लक्षणांबरोबर स्नायू, सांधे दुखणे, थकवा जाणवणे, स्थूलपणा, चेहऱ्यावर लव(केस) वाढणे, योनीभागामध्ये कोरडेपणा, खाज येणे, लैंगिक इच्छा कमी होणे अशी अनेक लक्षणे पाळी बंद होताना दिसून येतात. ब्लड प्रेशर, डायबिटीस (Diabetes mellitus and insulin resistance) या काळात सुरू होतात. झोपेवर खूप विपरीत परिणाम होतो. स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणे अशा आपल्या बौद्धिक क्षमता काही प्रमाणात कमी होतात.

हेही वाचा… Health Special: पित्त म्हणजे काय?

पाळी बंद होणे म्हणजे आपले ‘स्त्रीत्व’ आणि सौंदर्य कमी झाले अशी महिलेच्या मनात भावना निर्माण होते, आपल्यातली आकर्षकता कमी झाली असे वाटते, त्यामुळे कधी कधी आत्मविश्वास कमी होतो, न्यूनगंड निर्माण होतो. याच काळात मुले आपापल्या आयुष्यात व्यग्र होतात, कधी कधी ती स्त्री आणि पती असे दोघेच घरात उरतात, त्याने एकटेपणा येतो. अशा स्त्रीला नैराश्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते. रजोनिवृत्तीच्या काळात एक पंचमांश स्त्रियांमध्ये डिप्रेशनची लक्षणे आढळतात. जर पूर्वी कधी डिप्रेशनचा त्रास झाला असेल तर ही शक्यता वाढते, तसेच जर कुटुंबात कोणाला कधी डिप्रेशन झाले असेल तरी हा धोका वाढतो.

रजोनिवृत्तीच्या अनुभवाकडे ती महिला कशा दृष्टीकोनातून पाहते यावर बरेच काही अवलंबून असते. पाळी जाताना अनुभवला येणारी लक्षणे जसे थकवा येणे, लक्ष न लागणे, झोपेचा त्रास, लैंगिक इच्छा कमी होणे ही नैराश्याची लक्षणे सुद्धा आहेत, त्यामुळे बहुतेकदा नैराश्याची लक्षणे म्हणजे होणारे नैसर्गिक बदलच आहेत असे मानले जाते आणि योग्य उपचार घेतले जात नाहीत. नैराश्य असेल तर उदासपणा, चिडचिड, आनंद अनुभवण्याची क्षमताच नाहीशी होणे, आणि मरणाचे विचार ही लक्षणे हमखास आढळतात. या काळात अनेक नकारात्मक अनुभव आले, कठीण परिस्थिती असली तर स्त्रीचे मनोबल आणखी कमी होते. सतत चिंता वाटणे, अचानक भीती वाटणे, छातीत धडधडणे, घाम फुटणे, हातपाय थरथरायला लागणे, श्वास कोंडणे अशी चिंतेच्या विकाराची लक्षणेसुद्धा अनेकांच्यात दिसून येतात.

खूप वेळा अशा महिलेला समजून घेणारे कोणी असले तरी ही सगळी लक्षणे कमी व्हायला मदत होते. एका हळुवार परिस्थितीतून आपली पत्नी जाते आहे, त्यामुळे आपण तिच्या भावनिक गरजा ओळखून तिला आधार दिला पाहिजे, तिला सुसह्य वाटेल अशा गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत अशी पतीची भूमिका राहिली तर स्त्रीला या कालावधीत खूप उपयोग होतो. उदा. वजन कमी करण्याचे उद्दिष्ट डॉक्टरांनी दिले आहे, म्हणून रोज चालण्याचा नियम आपली पत्नी पार पाडते आहे तर तिच्या बरोबर आपणही तिच्या प्रयत्नांमध्ये सामील होणे, खाण्यापिण्याच्या आपल्या सवयींवरही नियंत्रण ठेवणे.

हेही वाचा… Health Special: उपासाचं व्यवस्थापन

मानसिक आधार मिळण्याबरोबरच योग्य औषधोपचार तर हवेतच. पाळी बंद होताना लक्षणे तीव्र असतील तर हॉर॒मोन थेरपी(hormone therapy) ची आवश्यकता असते. मानसोपचारही महत्त्वाचेच. रजोनिवृत्तीच्या अनुभवाकडे सकारात्मकतेने बघणाऱ्याही खूप स्त्रिया आढळतात. हा काळ आपापल्या कामाच्या क्षेत्रात अधिकाधिक आव्हाने पेलण्याचा, नवनवीन जबाबदाऱ्या घेण्याचा आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढवणारा! मुलांच्या संगोपनातून मोकळे झाल्यावर स्वतःसाठी काही करण्याची उर्मी बाळगणारी ही स्त्री भराऱ्या मारायला मुक्त असते. समाजातही एक ज्येष्ठत्त्व प्राप्त होते. पती पत्नीचे नातेही अधिक परिपक्व झालेले असते, एकमेकांच्या जोडीने अनेक गोष्टी करण्याचा आनंद हवा असतो. असा दृष्टीकोन असलेली स्त्री या काळात आणि नंतर आनंदी राहते.

रजोनिवृत्तीच्या काळात मानसिक स्वास्थ्य टिकवायचे असेल तर स्वतःबद्दल जागरूक राहायला हवे. आपल्यात होणारे बदल आपणच जाणून घेतले पाहिजेत. आपला आहार, आपला व्यायाम, आपल्या जीवनमानात करण्याचे बदल हे प्रयत्न उत्साहाने केले पाहिजेत. या काळात योग, प्राणायाम, ध्यान यांचा मानसिक संतुलनासाठी चांगला उपयोग होतो. व्यायाम करताना सुद्धा स्नायूंची ताकद वाढवणे, सहनशक्ती(endurance) वाढवणे, उर्जा वापरली जाणे असे वेगवेगळे उद्देश असतात. नियमित शारीरिक चाचण्यांनी आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवता येते. आपला छंद जोपासणे, मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी नाते दृढ करणे ह्या सगळ्यातून हा कठीण काळ सुकरपणे पार पडतो.

स्त्रीजीवन असे वेगवेगळ्या टप्प्यांमधून जाते, प्रत्येक टप्प्यावरचे अनुभव, ताणतणाव आणि संघर्ष वेगवेगळे! पण एक एक टप्पा यशस्वीपणे पार करत स्त्री एक आनंदी आयुष्य जगू शकते!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What effect does menopause have on mental health hldc dvr
Show comments