What Is The Symptoms Of Panic Attack : भारतात अनेकांना हसता-खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाल्याचे प्रसंग आपण ऐकत आलो आहोत. त्यातला एक प्रकार म्हणजे पॅनिक अटॅक (Panic Attack). पॅनिक अटॅक म्हणजे चिंतेचा झटका. तो जर वारंवार येत असेल, तर त्याला आपण पॅनिक डिस-ऑर्डर किंवा चिंतेच्या झटक्यांचा आजार म्हणतो. पण, हा पॅनिक अटॅक केव्हा येतो आणि पॅनिक अटॅक आल्यावर त्यावर नियंत्रण कसे मिळवावे याबद्दल जाणून घेऊ…

‘अनुपमा’मध्ये वनराज शाहची भूमिका साकारणारा अभिनेता व गायक सुधांशु पांडे याने अलीकडेच ‘ब्रूट इंडिया’शी बोलताना त्याला आलेल्या पॅनिक अटॅकचा (Panic Attack) अनुभवाबद्दल सांगितले की, या अटॅकनंतर अभिनेत्याला नैराश्याच्या समस्येला सामोरे जावे लागले. अभिनेत्याने आपल्या प्रवासाबद्दल खुलासा करताना सांगितले की, जेव्हा तो मुंबईला आला तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी कोणतेही मित्र किंवा त्याच्या हातात काम सुद्धा नव्हते.

अभिनेता सुधांशु पांडे कोणत्या मित्राबरोबर नाही, तर त्याच्या पत्नीसह मुंबईत आला. त्यामुळे त्याला स्वतःबरोबर पत्नीचीही काळजी घ्यावी लागायची. त्यामुळे कोणतेही निश्चित काम हाती नसताना या शहरात येणे त्याच्यासाठी दुहेरी आव्हान होते. त्यादरम्यान २००१ मध्ये त्याच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. त्या काळात अभिनेत्याने खूप काम केले, बरेच चित्रपट केले. लेफ्ट, राईट, सेंटर जो रोल भेटेल त्या सर्व गोष्टी अभिनेत्याने स्वीकारल्या; मग ते चांगले, वाईट किंवा कुरूप असो. कारण- तेव्हा पैसे कमवणे महत्त्वाचे होते. अभिनेता सुधांशु पांडेने जेव्हा सैफ अली खानकडून घर विकत घेतले तेव्हा त्याला समजले की, आता त्याला EMI देखील भरावा लागणार आहे म्हणून. पुन्हा ‘बँड ऑफ बॉईज’मध्ये सामील होण्यापूर्वी अभिनेत्याने २०२५ पर्यंत अनेक प्रकारचे चित्रपट केले.

पण २००७ मध्ये त्याला अचानक ‘गंभीर पॅनिक अटॅक’ (Panic Attack) आला. यादरम्यान अभिनेता एका कॅफेमध्ये मित्राबरोबर बसला होता. मित्राशी बोलताना अभिनेत्याचे हात सुन्न झाले आणि अचानक पालपिटेशन [palpitations] जाणवले. अभिनेत्याला नीट श्वाससुद्धा घेता येत नव्हता. त्याला पॅनिक अटॅक इतका गंभीर होता की, काही सेकंदांतच त्याला तीव्र नैराश्येला सामोरे जावे लागले. ही खूप विचित्र भावना होती. यातून बाहेर यायला अभिनेत्याला चक्क चार वर्षे लागली, असे ‘ब्रूट इंडिया’शी बोलताना सुधांशु पांडे म्हणाला.

पॅनिक अटॅकची कारणे आणि उपाय याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने क्लिनिकल सायकोलॉजिस्ट दिव्या रतन यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, पॅनिक अटॅक (Panic Attack) हा चिंताग्रस्त हल्ल्यासारखाच असतो, जो खूप तणाव, पदार्थाचा गैरवापर किंवा न्यूरोट्रान्समीटरचे असंतुलन असेल तेव्हा होतो. पॅनिक अटॅक तीव्र भीतीचा भाग आहे, जो कोणताही धोका नसतानाही शारीरिक प्रतिक्रियांना चालना देतो.

पॅनिक अटॅकची लक्षणे (Panic Attack)

हृदयाची धडधड, मरण्याची भीती, अतिसार / मळमळ, थरथर कापणे, छातीत दुखणे, सुन्न होणे, घाम येणे, श्वास घेण्यात त्रास, डिप्रेशन आदी पॅनिक अटॅकची लक्षणे आहेत.

मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सोनल आनंद यांनी सांगितले की, कोणत्याही वॉर्निंग साइन्सशिवाय (warning signs) जेव्हा पॅनिक अटॅक येतो तेव्हा व्यक्ती सहजपणे गोंधळून जाऊ शकते. त्यामुळे अशा वेळी शांत राहणे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे विविध घटना, परिस्थिती तुमच्या भावनांना अशा प्रकारे चालना देऊ शकतात; ज्यामुळे पॅनिक अटॅक होऊ शकतो हे लक्षात घ्यावे. त्यामध्ये खूप जास्त ताण घेणे, एखाद्या क्लेशकारक अनुभवातून जाणे, असुरक्षितता, काही गोष्टींची किंवा लोकांची भीती आणि आरोग्य समस्यांचे निदान होणे यांसारख्या घटकांचा समावेश असू शकतो. या घटकांव्यतिरिक्त, पॅनिक अटॅक (Panic Attack) विशिष्ट परिस्थितींमुळेही येऊ शकतात. जसे की, मोठ्या ग्रुपमध्ये किंवा जास्त माणसांमध्ये राहणे, तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टींचा सामना करणे आणि इतर अनेक कारणेदेखील आहेत.

पॅनिक अटॅक आल्यावर कोणती गोष्ट लक्षात ठेवावी?

डॉक्टर आनंद यांनी ठामपणे सांगितले की, पॅनिक अटॅकचे व्यवस्थापन करणे प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. प्रत्येकाकडे पॅनिक अटॅकचा सामना करण्याचा त्यांचा एक अनोखा मार्ग असू शकतो. तुम्हाला पॅनिक अटॅक किंवा त्याच्याशी संबंधित लक्षणे जाणवत असल्यास, शांत राहण्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला चक्कर आल्यास खुर्चीवर किंवा जमिनीवर बसा. दीर्घ श्वास घ्या आणि तुमचा वेगवान श्वास शांत करण्यावर लक्ष केंद्रित करा.

पॅनिक अटॅक आल्यावर नक्की काय उपाय करावा?

१. दीर्घ श्वास घ्या.
२. काहींना फेरफटका मारल्यानंतर बरे वाटू शकते.
३. एका वस्तूवर लक्ष केंद्रित करा.
४. गोष्टी मोजण्यास सुरुवात करा.
५. स्नायू शिथिलीकरण
६. हलका व्यायाम आदी अनेक गोष्टी तुम्ही करू शकता.

Story img Loader