Foods To Eat And Avoid During Summer : उन्हाळ्यात आपले शरीर थंड राहण्यासाठी जास्त वेळ काम करते. त्यामुळे शरीराचे तापमान आणि एकूणच चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. काही पदार्थ आपल्याला ताजेतवाने राहण्यास मदत करतात, तर काही प्रकारचे पदार्थ, जसे की मीठयुक्त अन्न, जड आणि तेलकट जेवण आणि साखरयुक्त पेये शरीरात अस्वस्थता आणि आरोग्य समस्या निर्माण करू शकतात, त्यामुळे उन्हाळ्यात हायड्रेशन आणि पचनास मदत करणारे पदार्थ खाणे आवश्यक असते.

तर कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे आणि कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरूच्या एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील सेवा, क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स प्रमुख एडविना राज यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते,

उन्हाळ्यात खालील प्रकारचे अन्न खाणे टाळले पाहिजे…

जास्त मीठ असलेले पदार्थ

अति-प्रक्रिया केलेले स्नॅक्स, फास्ट फूड, पॅकिंग केलेले जेवण यांसारख्या पदार्थांमध्ये जास्त मीठ असते. असे जास्त मीठ असलेले पदार्थ डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलनास कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे एडविना राज चेतावणी देतात की, या पदार्थांना पचनासाठी जास्त द्रवपदार्थांची आवश्यकता असते, ज्यामुळे हायड्रेटेड राहणे कठीण होते.

जड आणि तेलकट जेवण

जड, तेलकट जेवण शरीराचे तापमान वाढवू शकते, आळस निर्माण करू शकते आणि सक्रिय (ॲक्टिव्ह), हायड्रेटेड राहणे कठीण करू शकते. तळलेले आणि तेलकट पदार्थ पचायला जास्त वेळ घेतात आणि उष्ण हवामानात अस्वस्थता निर्माण करू शकतात; असे एडविना राज म्हणाले आहेत.

साखरयुक्त पेये

साखरयुक्त पेये ताजेतवाने वाटत असली तरीही त्यामुळे रक्तातील साखरेमध्ये तीव्र वाढ होते, ज्यामुळे थकवा आणि तंद्री येते.

मग उन्हाळ्यात नक्की काय खावे? (Best foods For Summer)

हायड्रेट करणारी फळे आणि भाज्या (Hydrating fruits and vegetables)

काकडी, टरबूज, संत्री आणि पालेभाज्या यांसारखी पाणीयुक्त फळे आणि भाज्या खा. हे शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करताना थंड होण्यास मदत करतात.

अँटिऑक्सिडंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स समृद्ध अन्न (Foods rich in antioxidants and electrolytes)

इलेक्ट्रोलाइट्स आणि प्रोबायोटिक्स समृद्ध अन्न हायड्रेशन आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. राज यांनी उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय म्हणून आंबवलेले तांदूळ, ताक, दही आणि फळांच्या स्मूदीसह खाण्याची शिफारस केली आहे.

लीन प्रोटीन्स (Lean proteins)

ग्रील्ड चिकन किंवा मासे यांसारखे हलके प्रोटीन स्रोत जड मांसापेक्षा पचायला सोपे असतात आणि तुम्हाला आळस न जाणवू देता सतत ऊर्जा देतात.

संपूर्ण धान्य (Whole grains)

बार्ली (barley), क्विनोआ (quinoa), ओट्स, पॉलिश न केलेले तांदूळ आणि बाजरी यांसारखी संपूर्ण धान्ये शरीरात हळूहळू ऊर्जा सोडतात, ज्यामुळे दिवसभर सहनशक्ती टिकून राहण्यास मदत होते.

तर अशाप्रकारे उन्हाळ्याच्या महिन्यांत तुम्ही जेवणाची योग्य किंवा स्मार्ट निवड करून थंड, आरामदायी आणि निरोगी राहू शकता.