Roasted Chana Eating Daily Benefits and Loss: थंडीच्या दिवसांमध्ये होणारी सांधेदुखी टाळण्यासाठी भाजलेले चणे व गूळ खावे असे आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. भाजलेले चणा हा लहानश्या भूकेवर चटकन करता येणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी वेळ, खर्च कष्टात करता येणारा उपाय आहे. अशा चण्यांमध्ये असणारे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे आवश्यक पोषक मुबलक प्रमाणात असते. पण समजा हे भाजलेले चणे आपण रोज खायचे असं ठरवलं तर ते कितपत फायद्याचे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळते की नुकसान होऊ शकते याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी काव्या नायडू, क्लिनिकल पोषणतज्ज्ञ व डॉ. सोमनाथ गुप्ता, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन, यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेली माहिती पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजलेल्या चण्याचे सेवनाचे फायदे व तोटे, तज्ज्ञ सांगतात..

काव्या नायडू सांगतात की भाजलेले चणे अनेक आरोग्यदायी फायदे देतात आणि त्याचे दररोज सेवन शरीरासाठी आश्चर्यकारक काम करू शकते. प्रत्येक व्यक्तीने त्याचा आहारात समावेश करायला हवा. तर डॉ. सोमनाथ गुप्ता सांगतात की, भाजलेल्या चण्यातील प्रथिने स्नायूंच्या दुरुस्ती आणि वाढीस मदत करतात, ज्यामुळे एकूण स्नायूंच्या आरोग्यासाठी हातभार लागतो. चण्यातील फायबर पचनास मदत करते, निरोगी पचनास चालना देते आणि आतड्याची हालचाल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. भाजलेल्या चण्यामध्ये जीवनसत्त्वे (उदा. बी व्हिटॅमिन) आणि खनिजे (उदा. लोह, मॅग्नेशियम) असतात जे संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देतात आणि विविध शारीरिक कार्यांची क्षमता वाढवतात.

याविषयी डॉ दिलीप गुडे, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन, यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, चणे हे आहारातील (नैसर्गिक) फायबरचा एक उत्तम स्रोत आहेतच पण त्याहीपेक्षा सर्वात फायद्याची बाब म्हणजे चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे मधुमेहींना सुद्धा याचे सेवन करता येऊ शकते.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, लोह, सेलेनियम, मॅंगनीज, कॅल्शियम, तांबे, जस्त आणि पोटॅशियम असणारे “कोलेस्टेरॉल, सोडियम नसल्याने हृदयरोग टाळण्यास चण्याची मदत होऊ शकते. नियमित सेवनाने चणे होमोसिस्टीन देखील कमी करू शकतात, तसेच रक्ताच्या गुठळ्या तयार करणे कमी करून महत्त्वपूर्ण अवयवांना चांगला रक्त प्रवाह सुनिश्चित करता येऊ शकतो. चण्यातील मॅग्नेशियम हृदयाच्या विद्युत क्रिया (लय) सुरळीत राखण्यास मदत करतात परिणामी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास देखील मदत होते.

भाजलेल्या चण्यातील फायबर आणि प्रथिने तुम्हाला पोट भरल्याचा आभास करून देतात. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या रुटीनमध्ये हे एक अत्यंत फायदेशीर स्नॅक्स ठरते. मात्र एक बाब लक्षात घ्यायला हवी की मुळातच भाजलेल्या चण्यांमधील कॅलरीजचे प्रमाण अधिक असते तसेच अतिसेवनामुळे शरीरात अधिक उष्णता वाढू शकते परिणामी वजन वाढवण्यासही चणे कारणीभूत ठरू शकतात.

डॉ. गुडे यांच्या माहितीनुसार, चण्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेवर उपाय करता येतो, रक्तातील साखरेची वाढ थांबत असल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. चण्यातील प्री-प्रोबायोटिक घटक आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. मात्र डॉ गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, भाजलेल्या चण्यांमधून जास्त प्रमाणात फायबर घेतल्याने पचनास त्रास होऊ शकतो, ज्यामध्ये सूज येणे आणि गॅस होणे असेही धोके निर्माण होऊ शकतात. तसेच भाजलेल्या चण्यामध्ये प्युरीन असते, जी संधिरोग होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींसाठी चिंतेची बाब ठरू शकते. उच्च प्युरीन पातळी यूरिक ऍसिड जमा होण्यास आणि सांध्याच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. भाजलेले चणे आरोग्यासाठी फायदे देत असले तरी, अतिसेवनाशी संबंधित संभाव्य तोटे टाळण्यासाठी संयम आवश्यक आहे.

किती प्रमाणात चण्याचे सेवन करावे?

नायडू सांगतात की, चण्याच्या अतिसेवनामुळे काहींना अतिसार, पोट फुगणे, आतड्यांतील वायू आणि ऍलर्जी यासारखे काही त्रास होऊ शकतात. १०० ग्रॅम पेक्षा जास्त भाजलेले चणे खाऊ नका. जास्त प्रमाणात सेवन केल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. नेहमी लक्षात ठेवा संयम ही गुरुकिल्ली आहे.

हे ही वाचा<< ५३ वर्षीय IIT च्या शिक्षकाचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू! कोलेस्टेरॉल ठरला घातक, तज्ज्ञ सांगतात योग्य पातळी किती असावी? 

यासाठी आहारामध्ये विविध पदार्थांचा समावेश करून पोषक तत्वांचे संतुलित सेवन करावे. संतुलित आहारामध्ये इतर प्रथिने स्त्रोत जसे की शेंगा, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि अंडी सुद्धा जोडता येऊ शकतात तर फायबरसाठी आहारात भाज्या, फळे, निरोगी फॅट्सचा समावेश करता येऊ शकतो. या सर्व फायद्यांना लक्षात घेतल्यावर तुम्हालाही चण्याचे सेवन सुरु करायचे असेल पण अन्य कोणती आरोग्य स्थिती असेल तर आधी तुमच्या वैद्यकीय रेकॉर्ड्सची माहिती असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happens if you eat roasted chana for months daily what is perfect way to eat chana to avoid acidity and heat how body changes svs
Show comments