Avoid Maida For 30 Days: मैदा, किंवा रिफाईंड केलेले गव्हाचे पीठ, भारतीय पाककृतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. घरी जेवताना आपण गव्हाच्याच पोळ्या केल्या तरी ब्रेड, बिस्किटे, पेस्ट्री आणि स्नॅक्स अशा इतरही माध्यमातून आपल्या पोटात मैदा जातोच. तुम्ही डाएट फॉलो करत असाल आणि त्यासाठी सूप पिऊन डिटॉक्स करण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि अशावेळी आपण हॉटेलमधून सूप ऑर्डर केलं तर आश्चर्य असं की त्यात सुद्धा घट्टपणा येण्यासाठी मैदा वापरलेला असतो. बाकी रोटी, नान सारख्या पदार्थांमध्ये तर सरळ सरळ मैद्याचा वापर होतो हे आपल्यालाही माहित आहे. मैद्याचा पोत हा इतर पिठांच्या तुलनेत मऊ असल्याने तो एक प्रसिद्ध व सोयीस्कर पर्याय ठरला आहे पण मैद्याचे अतिसेवन हे सुद्धा आरोग्यास हानिकारक ठरू शकते.
मैदामध्ये आवश्यक पोषकसत्व आणि फायबरचा अभाव असल्याने हे पीठ कॅलरीजचे सेवनचे वाढवते, जे वजन वाढण्यास आणि संबंधित आरोग्य समस्यांमध्ये मुख्य कारण असते. मग, तुम्ही तुमच्या आहारातून मैदा पूर्णपणे काढून टाकावा का? आणि, समजा प्रयोग म्हणून तुम्ही एका महिन्यासाठी मैद्याचा त्याग करून पाहायचं ठरवलं तर तुमच्या शरीरात काय बदल होऊ शकतात? याबाबत अधिक माहिती आज आपण पोषणतज्ज्ञ नुपूर पाटील यांच्याकडून जाणून घेऊया..
एक महिना मैद्याचे सेवन टाळल्यास मिळणारे फायदे
सुधारित पचन: मैद्यामध्ये फायबर आणि पोषक घटक कमी असतात, ज्यामुळे ते पचायला जड जाते. मैद्याचे सेवन टाळल्यास पचन सुधारते आणि शरीराला सतत येणारी सूज कमी होते. संपूर्ण गव्हाचे पीठ, बदामाचे पीठ, नारळाचे पीठ किंवा अगदी ज्वारी, बाजरी, नाचणी यांचे पीठ यांसारख्या पर्यायांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनास मदत करतात.
रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते: मैदा शरीरात प्रवेश घेताच झपाट्याने ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मैदा वगळल्यास रक्तातील साखरेची पातळी स्थिर होण्यास मदत होते आणि इन्सुलिनच्या प्रतिकाराचा धोका कमी होतो.
वजनावर नियंत्रण: मैद्यामध्ये कॅलरीज अधिक असल्याने वजन वाढण्याचा वेगही वाढतो. मैदा कमी केल्याने वजनही कमी होण्यास मदत होऊ शकते. वर म्हटल्याप्रमाणे कॅलरीजपेक्षा फायबर युक्त पदार्थांचा आहारात अधिक समावेश केल्यास शरीरातील अनावश्यक फॅट्स बाहेर टाकले जातात व वजन नियंत्रणात राहते. शिवाय यामुळे पोट भरल्यासारखे वाटते व सतत खाण्याची लालसा होत नाही.
पोषकसत्वांचे शोषण: ज्वारी, बाजरी, नाचणी, यासारख्या संपूर्ण धान्याचा पर्याय, तुमच्या शरीराला फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या अधिक आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा करू शकतो.
ऊर्जा वाढेल: रिफाईंड कार्ब्समुळे शरीरात हालचाल करण्याची सुद्धा ऊर्जा टिकत नाही. त्यामुळे मैद्याला पर्याय शोधल्यास शरीराला आवश्यक ते पोषण व दीर्घकाळ टिकून राहणारी ऊर्जा मिळू शकते.
जळजळ कमी करणे: शुद्ध केलेले पीठ शरीरात जळजळ होण्याचे कारण ठरू शकते. तर बाजरीसह संपूर्ण पदार्थांनी युक्त आहार दाह कमी करण्यास मदत करू शकतो.
पण, तुमच्या आहारातून मैदा पूर्णपणे काढून टाकणे खरोखर योग्य आहे का?
हावडा येथील नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे सल्लागार डॉ. श्रीकांत मोहता यांनी सांगितले की, संपूर्ण आरोग्यासाठी रिफाइंड पिठाचा (मैदा) वापर कमी करणे किंवा मर्यादित करणे ही एक चांगली कल्पना आहे.
तथापि, डॉ मोहता पुढे म्हणाले की, या महिन्यात तुम्हाला इतर स्त्रोतांकडून पुरेशा पोषक तत्वांसह संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. “तुम्ही मैदा आहारातून काढून टाकण्याचे ठरविल्यास, तुमच्या जेवणात संपूर्ण धान्य, भाज्या, फळे, पातळ प्रथिने आणि निरोगी फॅट्स समाविष्ट करण्याचे करायला हवे”.
मैद्याला पर्याय काय?
मैद्याला अनेक आरोग्यदायी पर्याय आहेत जे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. “संपूर्ण गव्हाचे पीठ हा एक सामान्य पर्याय आहे जो अधिक पोषकसत्व आणि फायबर मिळवून देतो. तसेच बेसन, कॉर्न फ्लोअर (मक्याचे पीठ) आणि ओट्सचे पीठ, क्विनोआ, ब्राऊन राईस, आणि रताळे हे कार्बोहायड्रेट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत जे मैद्यापेक्षा अधिक पोषक तत्वे देतात.”
हे ही वाचा<< COVID 19 चा नवा व्हेरियंट ‘ERIS’ चा वेग वाढला; पुण्यात आढळला संसर्ग, लक्षणे काय जाणून घ्या
नुपूर पाटील यांनी मैद्याच्या जागी बदामाचे पीठ, नारळाचे पीठ, ओटचे पीठ, क्विनोआ पीठ, चण्याचे पीठ, बाजरीचे पीठ किंवा तपकिरी तांदळाचे पीठ वापरण्याचा सल्ला दिला. लक्षात ठेवा की प्रत्येक पर्यायाची विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत आणि वापर करताना तुम्ही त्यांचे मूल्य आणखीन वाढवू शकता. तुमच्या आहारात या विविध पर्यायांचा समावेश केल्याने रिफाइंड पिठाची गरज कमी करता येऊ शकते.