Walking after Eating: अलीकडील धावपळीच्या जीवनशैलीमुळे कित्येक लोक सकाळी फिरायला जाणं किंवा व्यायाम करणं टाळतात. आपल्या शरीरासाठी चालणं खूप फायदेशीर मानलं जातं. काही जण रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारायला जातात. आपल्याकडे जेवणानंतर चालले म्हणजे जेवण चांगले पचते असे मानले जाते, याला आपण शतपावली म्हणतो. रात्री केलेल्या जेवणानंतर आपली हालचाल होत नाही. त्यामुळे बाहेर जाऊन फेरफटका मारण्याचा सल्ला दिला जातो. पण, खरोखरच जेवणानंतर चालायलाच हवे का? जेवणानंतर चालल्याने खरंच शरीरावर फरक पडतो का? रात्रीच्या जेवणानंतर आपण दररोज ३० मिनिटे चालत असाल तर आपल्या शरीरावर काय परिणाम होईल? याच विषयावर हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार चिकित्सक डॉ. के. सोमनाथ गुप्ता यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. गुप्ता सांगतात, “चालणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज चालणे हा निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग आहे. चालल्याने सर्व वयोगटातील लोकांना फायदा होतो. रात्रीच्या जेवणानंतर चालणं हे फायद्याचं ठरतं. याचा सुरुवातीला थोडा त्रास वाटू शकतो, मात्र एकदा का सवय झाली की तुमची शतपावली तर होईलच, शिवाय तुमचा व्यायामदेखील आपोआपच होईल. जेवल्यानंतर बहुसंख्य लोकांना लगेचच बसण्याची किंवा झोपण्याची सवय असते. जेवणानंतर लगेचच झोपी जाऊ नका, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाला अडथळा निर्माण होऊ शकतो.”

(हे ही वाचा: तुम्ही जिवंत मासे गिळल्याने दमा बरा होऊ शकतो? डाॅक्टरांचे स्पष्ट उत्तर; म्हणाले…)

रात्रीच्या जेवणानंतर चालण्याचे फायदे

१. रात्रीच्या जेवणानंतर चालण्याचे फायदे तुमच्या मेटाबॉलिझमला गती देण्यासाठी महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतो. कारण चालण्यामुळे एकतर अतिरिक्त असलेल्या कॅलरी बर्न होण्यास मदत होते. वजन कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर रात्री जेवल्यानंतर चालण्याचा तुम्हाला फायदा मिळतो. 

२. रात्री जेवल्यानंतर ३० मिनिटे चालल्याने पचनशक्ती सुधारते. अन्न सहज पचतं. याच्या मदतीने तुम्ही बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित इतर समस्याही टाळू शकता.

३. रात्री जेवल्यानंतर चालण्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते आणि याशिवाय शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन संवेदनशीलतेमध्ये अधिक फायदा होतो. तुम्ही जेवणानंतर चाललात तर तुमची मधुमेहाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४. रात्री जेवणानंतर सुस्ती येते हे खरं असलं तरीही चालण्यामुळे तुमच्या शरीराला व्यवस्थित व्यायाम मिळतो आणि थकवा येऊन तुमच्या झोपेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. तुम्हाला जर रात्री झोपायला त्रास होत असेल तर रात्रीच्या जेवणानंतर थोडावेळ चालण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमच्या शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी होईल आणि चांगली झोप लागण्यास अधिक मदत होईल.

५. जेवणानंतर चालल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येऊन हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. त्यामुळे सहसा जेवल्यावर लगेच न झोपता किमान १५ मिनिटे चालून मगच झोपावे.

महत्त्वाचं म्हणजे, जेवल्याबरोबर लगेच झोपी गेल्यानं पचनाची प्रक्रिया आणखी मंदावते, त्यामुळे पोटाच्याही अनेक समस्या उद्भवू शकतात. यापुढे जेवल्यानंतर नक्की फिरायला जा. सध्याच्या धावपळीच्या आणि बदलत्या काळात अनेक लोकांना तणावाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे या समस्येसाठी रात्री जेवण केल्यानंतर चालणं हा चांगला पर्याय ठरू शकतो.

त्याचप्रमाणे तुम्हाला गंभीर जीईआरडीसारखी काही वैद्यकीय परिस्थिती असल्यास, ही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जर जेवणानंतर चालत जाणे योग्य वाटत नसेल तर सकाळी किंवा लवकर संध्याकाळसारख्या वैकल्पिक वेळेचा विचार करा, असेही डॉ. गुप्ता नमूद करतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happens to the body if you walk every day after dinner for 30 minutes know from expert pdb