Fermented Foods Benefits : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मापासून अभिनेता शाही कपूरपर्यंत अनेक सेलिब्रिटी नाश्त्यामध्ये इडली खाणे पसंत असतात. हा पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठी अनुकूल असतोच; पण त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीलाही चालना मिळते. परंतु, तुम्ही सलग अनेक दिवस अशा प्रकारचे आंबवलेले पदार्थ नाश्त्यामध्ये खात असाल, तर त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? कधी विचार केला आहे का? नसेल, तर आज आपण याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेऊ..
चेन्नईतील द क्लेफ्ट अॅण्ड क्रॅनिओफेशियल सेंटर आणि श्री बालाजी मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याविषयीची माहिती दिली आहे. आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी सांगितले की, आंबवलेल्या पदार्थांमुळे आतड्यांतील मायक्रोबायोटाचे संतुलन राखले जाते. त्याशिवाय पचन आणि पोषक घटकांच्या शोषणातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात; परंतु नियमित सेवनाने आतड्याची चांगली हालचाल होऊ शकते. सूज कमी होते, रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. त्याव्यतिरिक्त आंबवलेल्या पदार्थांमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करु शकतात. आतडे आणि मेंदूचे एकमेकांशी कनेक्शन असते. त्यामुळे त्याचा तुमच्या मूड आणि मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आरोग्यविषयक धोके आहेत का?
आंबवलेल्या पदार्थांच्या सेवनाने आरोग्यास अनेक फायदे मिळतात, दीपलक्ष्मी पुढे सांगतात की, जर तुम्ही आंबवलेल्या पदार्थांचे काळजीपूर्वक सेवन केले नाही, तर काही धोकेही निर्माण होऊ शकतात. मिसो आणि सॉकरक्रॉट यांसारख्या अनेक आंबवलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास, ते रक्तदाब वाढण्याचे कारण ठरू शकते. प्रो-बायोटिक्स खाद्यपदार्थांमुळे काही लोकांना पोट फुगणे किंवा गॅससह पचनाचा त्रास होऊ शकतो. त्याव्यतिरिक्त अॅलर्जी किंवा लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास जाणवू शकतो. विशेषत: दह्यासारख्या डेअरीयुक्त पदार्थांच्या सेवनाने जास्त त्रास होऊ शकतो.
आहारतज्ज्ञांनी असेही सांगितले की, अयोग्य किण्वन प्रक्रियेतून बनविल्या गेलेल्या अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे आंबवलेले पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच ठेवले असतील, तरच खा किंवा घरात आंबवून बनविलेल्या पदार्थांचे सेवन करा. थोडक्यात आरोग्यविषयक धोका कमी करण्यासाठी योग्य ती काळजी घ्या.
नाश्त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या आंबवलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता?
नाश्त्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या आंबवलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता. या पदार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असतात.
१) तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रो-बायोटिक्सने समृद्ध दही किंवा केफिरचे सेवन करत असाल, तर त्याबरोबर फळे, नट किंवा ड्रायफ्रूटसचेही सेवन करू शकता.
२) आंबवलेला तांदूळ आणि डाळ यांच्यापासून बनवलेली इडली किंवा डोसा यांसारखे पारंपरिक पर्याय आतड्याचे आरोग्य अनुकूल ठेवू शकतात.
३) मिसो सूप एक चवदार पर्याय आहे. याच्या सेवनाने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.
४) आंबवलेले लोणचे किंवा सॉकरक्रॉट टॉपिंग्स म्हणून कमी प्रमाणात वापरल्यास तिखट चव जोडू शकतात. तर, आंबट ब्रेड अॅव्होकॅडो टोस्ट किंवा अंड्याच्या सँडविचसाठी पौष्टिक आधार म्हणून काम करतो.