What Happens When You Skip Tongue Cleaning : तुमच्यापैकी किती जण रोज जीभ स्वच्छ करीत असतील? हे वाचल्यावर कित्येक जण आपण तर जीभ स्वच्छ करतच नाही, असे मनात नक्कीच बोलले असतील. आपल्यापैकी बहुतेक जण दात घासतात आणि कदाचित फ्लॉस करतात; पण जिभेकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. जर तुम्ही तुमची जीभ स्वच्छ करणे फक्त एक-दोन दिवस नाही, तर संपूर्ण महिनाभरासाठी सोडून दिले तर काय होईल? …

तर जिभेची स्वच्छता करणे योग्य आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिनचे प्रमुख सल्लागार डॉक्टर नरंदर सिंगला यांच्याशी चर्चा केली.

डॉक्टर सिंगला यांच्या मते, जिभेची नियमित स्वच्छता केल्याने तिच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरीत्या जमा होणारे जीवाणू, अन्नाचे अवशेष आणि मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. हे ऐकायला कदाचित तुम्हाला किरकोळ वाटेल. पण, तुमच्या दैनंदिन दिनचर्येत जीभ स्वच्छ करणे समाविष्ट करणे चांगले ठरू शकते. मग ते जीभ स्क्रॅपरने असो किंवा टूथब्रशने असो. जीभ स्क्रॅपर हे एक लहान, यू-आकाराचे (U-shaped) उपकरण आहे जे प्लास्टिक किंवा धातूचे बनलेले असते.

जिभेची नियमित स्वच्छता करण्याचे फायदे (Cleaning Tongue Benefits) :

१. तोंडाची दुर्गंधी रोखणे.
२. तुमची चवीची जाणीव सुधारणे.
३. तोंडातील हानिकारक जीवाणू कमी करणे.
४. पचन व्यवस्थित होण्यास मदत करणे.

तुम्ही ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस जीभ स्वच्छ केली नाही तर काय होईल? (what If You Skip Tongue Cleaning For Over 30 Days)

डॉक्टर सिंगला स्पष्ट करतात की, जीवाणू तुमच्या जिभेच्या पृष्ठभागावर वाढतात आणि एक जाड, चिकट बायोफिल्म तयार करतात. तर ही गोष्ट फक्त वाईट नाही, तर खूप गंभीर आहे. त्यामुळे पुढील काही गोष्टी होऊ शकतात…

१. सतत हॅलिटोसिस (श्वासाची दुर्गंधी).
२. टेस्ट बड्स बंद झाल्यामुळे (Taste Buds get clogged) चवीची भावना मंदावणे.
३. ओरल थ्रश – एक बुरशीजन्य संसर्ग ज्यामुळे अस्वस्थता आणि पांढरे ठिपके तोंडात निर्माण होतात.
४. काळी जीभ – एक निरुपद्रवी पण चिंताजनक स्थिती, जिथे मृत पेशी अडकल्यामुळे जीभ काळी आणि अस्पष्ट दिसते.
५. जिभेतील जीवाणू हिरड्यांमध्ये पसरल्याने पिरियडोंटल (Periodontal) रोगाचा धोका वाढतो.

तसेच काही वेळा जिभेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्षित केल्यामुळे किंवा तोंडाची स्वच्छता नसल्यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडीसारख्या पचनाच्या समस्यादेखील उद्भवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही दीर्घकाळ जीभ स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम आणखीन वाढू शकतात आणि दीर्घकालीन संसर्ग, जळजळ आणि अगदी हिरड्यांचे आजार अशा समस्यादेखील उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे चांगली पचनक्रिया तोंडापासून सुरू होते. तुमची जीभ स्वच्छ करणे हा सराव चांगला श्वास घेण्यापुरताच मर्यादित नाही, तर तो शरीराचे आरोग्य चांगले राखण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे डॉक्टर नरंदर सिंगला म्हणाले आहेत.

कोणी जास्त काळजी घेण्याची गरज?

प्रत्येकाने दररोज आपली जीभ स्वच्छ केली पाहिजे. पण, पुढील काही लोकांनी विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे.

१. ज्यांचे तोंड कोरडे असते.
२. धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती.
३. ज्यांचे आहारात प्रथिने किंवा दुग्धजन्य पदार्थ जास्त असतात.
४. ज्यांना तोंडातून दुर्गंधी येते किंवा तोंडातून लाळ गळण्याची शक्यता जास्त असते
५. वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेले लोक.
६. काही औषधे तुमचे तोंड कोरडे करू शकतात, ज्यामुळे बॅक्टेरिया बाहेर काढणे आणखी कठीण होते. म्हणून जर तुम्ही दीर्घकालीन औषधे घेत असाल, तर जीभ स्वच्छ करणे ही सवय विशेषतः महत्त्वाची आहे.

जीभ स्वच्छ करण्यास एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. पण त्याचा परिणाम फ्रेश श्वास, तीक्ष्ण चव व चांगले आरोग्य असा दिसतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा टूथब्रश घ्याल तेव्हा फक्त दात घासून थांबू नका. तुमच्या जिभेकडेसुद्धा लक्ष द्या.