Healthy sleep: चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. फोनच्या व्यसनामुळे आणि सोशल मीडिया आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तुम्हीही आता लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं असा नवीन वर्षाचा संकल्प केलाय का? तसेच तुम्हाला माहितीये का, जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय सोळंके यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. दत्तात्रय सोळंके यांच्या मते, रात्री ८ ते पहाटे ४ या वेळेच्या झोपेचे वेळापत्रक सर्वोत्तम आहे. ही दिनचर्या तुमच्या शरीरावर कसा सकारात्मक परिणाम करू शकते आणि लवकर रात्रीचे जेवण तुमचे आरोग्य आणि झोपेची गुणवत्ता कशी वाढवू शकते जाणून घेऊयात.
झोपेची गुणवत्ता : वेळेत झोपल्यानं झोपेला प्रोत्साहन मिळते. पूर्वीची झोपण्याची वेळ तुमच्या शरीराला फायदेशीर ठरायची, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य नीट राहायचे.
चांगली ऊर्जा : लवकर झोपणे आणि लवकर उठल्यामुळे दिवसभर फ्रेश वाटते, ताजेतवाने वाटते आणि सतर्कता येते.
हार्मोन्स व्यवस्थित राहतात : वेळेवर झोपल्याने तसेच पुरेशी झोप घेतल्याने शरीरातील हार्मोन्स व्यवस्थित राहतात. तसेच तुम्हाला जागृत होण्यास आणि ताजेतवाने होण्यास मदत होते.
पचनास मदत : लवकर झोपल्याने रात्री उशिरापर्यंतची लालसा कमी होते. जेव्हा तुम्ही लवकर झोपता तेव्हा तुमचे शरीर अन्नाचे पचन अधिक प्रभावीपणे करते.
हेही वाचा >> रिकाम्या पोटी थोडा वेळ राहिल्यास तुमचंही डोकं दुखतं का? यामागचं कारण ऐकून धक्का बसेल
रात्रीचे जेवण लवकर केल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो?
डॉ. सोळंके म्हणाले की, रात्रीचे जेवण लवकर केल्याने शरीराला झोपेच्या वेळेपूर्वी अन्न पूर्णपणे पचते, अस्वस्थता, ॲसिड रिफ्लक्स किंवा अपचन टाळता येते. “जेव्हा तुम्ही लवकर जेवता, तेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे रात्री जागे होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही झोपेत असताना तुमचे शरीर अन्न पचवण्यासाठी कठोर परिश्रम करत नाही, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते.
बेंगळुरूच्या एस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलचे मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ वीणा व्ही यांनी सांगितले की, रात्रीचे लवकर जेवण आणि झोपण्याची वेळ यामधील अंतर पचनशक्ती वाढवते आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता कमी करते. “सुरुवातीच्या रात्रीच्या जेवणामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, कारण विश्रांतीच्या वेळी शरीर अन्न पचवण्यास व्यस्त नसते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि रात्री उशिरा स्नॅक्सची गरज न पडता रात्रभर ऊर्जा प्रदान करते.”
योग्य वेळी झोप तसेच फक्त व्यायाम करून परिणाम दिसत नाही तर तुमचा आहारही योग्य असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही जर मानसिक तणावात असाल किंवा वारंवार कोल्डड्रिंकचे सेवन करत असाल तर तु्म्हाला झोप न येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.