Bowel movement problems : अनेकांचं रोज पोट नीट साफ होत नाही. अशानं कामात मन लागत नाही आणि मग विविध आजारांचा धोका वाढतो. पोट साफ न होण्याचं मुख्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हल्ली अनेकांना हा त्रास जाणवतोय. पण, पोट साफ न होण्यामागे आणखी काही वेगळी कारणं आहेत का? त्यामुळे आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? याविषयी डॉक्टरांकडून जाणून घेऊ…
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. विकास जिंदल म्हणाले की, पोट रोज नीट साफ होत नसल्यास त्याचा पोटातील आतड्यांवर परिणाम होतो. त्यामुळे आतड्यांची रोज नीट हालचाल होत नाही, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थता जाणवू लागते आणि विविध आरोग्य समस्याही उद्भवतात. दररोज पोट साफ न झाल्याने मोठ्या आतड्यामध्ये घाण साचून राहते, ज्यामुळे पोट फुगणे, पोटदुखी व जडपणा जाणवू शकतो.
कालांतराने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे मलाशय आणि ओटीपोटाच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे मूळव्याध आणि गुदद्वारातील फिशरचा धोका वाढतो. गंभीर प्रकरणांमध्ये दीर्घकाळ मल टिकून राहिल्याने मलविसर्जन करताना अडचणी येतात. अशा वेळी तुम्हाला डॉक्टरांच्या योग्य उपचारांची गरज भासते, असेही डॉ. जिंदाल म्हणाले.
हैदराबाद येथील बंजारा हिल्स येथील केअर हॉस्पिटल्समधील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीचे सल्लागार डॉ. राहुल दुब्बाका यांनी स्पष्ट केले की, ही एक सामान्य स्थिती आहे, जी विविध कारणांमुळे उद्भवू शकते. त्यामध्ये डिहायड्रेशन, शारीरिक हालचालींचा अभाव, काही औषधे व इरिटेबल बोवेल सिंड्रोम किंवा मधुमेह यांसारख्या वैद्यकीय परिस्थितींचा समावेश आहे.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, अशा स्थितीत शौचाला बसल्यानंतर मल खूप कडक होतो आणि हळूहळू तो बाहेर पडतो. तसेच, मल बाहेर पडताना गुदद्वारावर ताण येतो, ज्यामुळे अस्वस्थता येते, तीव्र वेदना होतात.
नियमित पोट साफ होण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत?
पोट रोज नीट साफ होण्यासाठी आहारात तृणधान्य, फळे व भाज्यांसह फायबरयुक्त पदार्थांना प्राधान्य द्या. भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहा. त्यामुळे मल नरम होऊन शौचाला बसल्यावर जोर देण्याची गरज भासत नाही. मग त्यामुळे पोटही नीट साफ होईल,” असे डॉ. जिंदाल यांनी सांगितले.
नियमित शारीरिक हालचाल केल्यास पोटातील आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते आणि पचनक्रिया सुधारते, असेही डॉ. जिंदाल म्हणाले.
त्याशिवाय रोज शौचास जाण्याची सवय ठेवा. शक्यतो जेवणानंतर नियमित टॉयलेटमध्ये जा. वारंवार जुलाबाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. कारण- त्यामुळे आतड्यांचे स्नायू कमकुवत होऊ शकतात.
‘या’ गोष्टींची घ्या काळजी
जीवनशैलीतील बदलांनंतरही जर पोट नीट साफ होत नसेल, तर ते इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), हायपोथायरॉइडीझम किंवा असंतुलित आहाराच्या सवयी यांसारख्या बाबींमुळे ही समस्या जाणवू शकते. पण जर तुम्हाला शौचास बसल्यानंतर तीव्र वेदना, मलामधून रक्त येणे किंवा अचानक वजन कमी होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण- ही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात,” असेही डॉ. जिंदाल म्हणाले.
पोट साफ होण्यासाठी किंवा जुलाबासारख्या समस्येवर मेडिकलमध्ये औषधे मिळत असली तरी ती सेवन करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांचा अर्थात डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही डॉ. दुब्बाका म्हणाले.