what happens if we eat ghee daily: तूप हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न आहे. त्यातील विविध घटक शरीरासाठी उपयुक्त आहेत. पौष्टिक आणि सुगंधी तूप अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि संतुलित चरबीने समृद्ध आहे. प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांपासून ते आजच्या वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत, शतकानुशतके तूप एकंदर आरोग्यासाठी चांगले मानले गेले आहे. आपल्यापैकी बरेच जण रोजच्या जेवणात आवर्जून चमचाभर साजूक तूप खातात. साजूक तूप योग्य प्रमाणात खाल्ल्याने त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण, तुम्ही रोज चमचाभर तूप खाल्ले, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? यशोदा हॉस्पिटल्स हैदराबादचे फिजिशियन व मधुमेहतज्ज्ञ डॉ. रंगा संतोष कुमार यांनी दररोज तूप खाल्ले, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल, याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत जाणून घेऊ…
डॉ. रंगा संतोष कुमार सांगतात की, “तूप खाणं हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. शरीराला फायदेशीर ठरणारे अनेक पोषक घटक तुपामध्ये असतात. त्यामध्ये साधारण ९०० ग्रॅम कॅलरी असून, सर्वांत जास्त ऊर्जा त्यातून मिळते.
तुपामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात, तुपामध्ये ए, डी, ई, के इत्यादी जीवनसत्त्वे, ओमेगा 3 व ओमेगा 6 यांसारखी संतुलित फॅटी ऍसिड, असे अनेक पौष्टिक घटक असतात. तुपामध्ये आढळणाऱ्या आरोग्यदायी चरबीमुळे आपले आरोग्य चांगले राहते. त्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यासोबतच आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते. तुपाच्या सेवनाने पचनक्रियाही सुरळीतपणे कार्यरत राहते.”
यशोदा रुग्णालयातील वरिष्ठ चिकित्सक डॉ. दिलीप गुडे सांगतात की, “तूप हे पचण्यासाठी अत्यंत सोपे असते. तुपामध्ये ब्युटीरेट हे एक प्रकारचा शॉर्ट चेन फॅटी ॲसिड आहे, जे पोटाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तूप पाचन तंत्राच्या पेशींचे पोषण करते आणि जळजळ कमी करते. तसेच तूप त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण- ते त्वचेचे पोषण करते आणि तिला हायड्रेटेड ठेवते. तुपातील पोषक घटक त्वचेला घट्ट ठेवतात.”
डॉ. कुमार यांनी असेही नमूद केले की, “तुम्ही दररोज तुपाचा थोडासा भाग घेतल्याने तुमचे एकूण आरोग्य सुधारू शकते. त्यामध्ये हाडे मजबूत होऊ शकतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते. तथापि, ते असाही सावधगिरीचा इशारा देतात की, तुपाचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने शरीराचे गंभीर नुकसानदेखील होऊ शकते.”
वजन कमी होण्यास मदत : वजन कमी करायचे असेल, तर तूप खाऊन वजनावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य आहे. तज्ज्ञांच्या मते कमी प्रमाणात तूप खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण- तूप पचन सुधारण्यास आणि चयापचय वाढविण्यास मदत करते.
मुलांच्या स्मरणशक्ती वाढीस साह्यभूत: मुलांनी तुपाचे सेवन केल्यास त्यांची स्मरणशक्ती, दृष्टी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.
एक लक्षात ठेवा, तुपाचे सेवन मध्यम प्रमाणात केले पाहिजे; अन्यथा आरोग्य बिघडू शकते. तसेच तुपात चरबी आणि कोलेस्ट्रॉल भरपूर आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हृदयरोग आणि कर्करोगाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच वृद्धांनी त्यांच्या हृदयाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी चीज बटरपासून दूर राहावे, असा सल्ला डॉ. कुमार यांनी दिला.