Egg Consumption : अंडी ही आपल्यापैकी अनेकांच्या आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रोटिनचा महत्त्वाचा स्त्रोत म्हणून अंड्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. अंड्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फॅट्स असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल येथील मुख्य आहारतज्ज्ञ प्रतिक्षा कदम सांगतात, “अंड्यामध्ये स्नायूचे आरोग्य सुदृढ ठेवणारे आवश्यक असे अमिनो ॲसिड असतात.”
अंड्यामध्ये व्हिटॅमिन्स बी १२, मेंदूचे शक्ती वाढवणारे कोलीन आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असे ल्युटीन असतात. अंडी खाल्ल्यानंतर भूक लागत नाही आणि दीर्घकाळासाठी पोट भरल्यासारखे वाटते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय आहे, तसेच वजन कमी करण्यासाठीसुद्धा फायदेशीर आहे. पण, एका दिवशी तुम्ही किती अंडी खाता? दिवसाला १२ अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? अंड्याच्या अतिसेवनाचा शरीरावर काय परिणाम पडतो? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.
दिवसाला १२ अंडी खाल्ल्याने काय होते?
आहारतज्ज्ञ प्रतिक्षा कदम सांगतात, “एका अंड्यामध्ये १८६ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. जर तुम्ही दिवसाला १२ अंडी खात असाल तर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते, ज्याचा हृदयाच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. ज्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार असेल, त्यांच्यासाठी डझनभर अंडी दिवसाला खाणे धोकादायक ठरू शकते. जर तुम्ही अंडी तेल किंवा तूपामध्ये तळून खात असाल तर तुमचे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढू शकते. तसेच अति प्रमाणात प्रोटिनचे सेवन केल्याने किडनीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.”
त्या पुढे सांगतात, “अति अंड्याच्या सेवनाने काही लोकांना पोटफुगी तसेच पचनक्रियेशी संबंधित समस्या जाणवू शकतात. जर तुम्ही इतर पदार्थांचे सेवन टाळून दिवसभर फक्त अंडी खात असाल तर शरीरात पोषक तत्त्वांचीसुद्धा कमतरता जाणवू शकते.”
कदम सांगतात की, दिवसाला डझनभर अंडी खाणे हानिकारक आहे. जरी अंडी पौष्टिक असली तरी कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते आणि हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात.