Quit Smoking For One Month: धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेणे हा एक धाडसी आणि जीवन बदलणारा निर्णय आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या अगदी पहिल्याच दिवसापासून तुम्हाला विविध बदल दिसून येऊ शकता. असं म्हणतात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना काय होईल याचा अंदाज जर मनात- डोक्यात स्पष्ट असेल तर ती गोष्ट करण्याची इच्छा- शक्ती अधिक वाढते. जर तुम्हीही सिगारेट सोडण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही आपल्याला याचे काही फायदे सांगणार आहोत. अनेकदा सिगारेट सोडण्यामागे ‘सवय लागलीये’ हे कारण अडथळा ठरते पण सवय प्रयत्नानांनी दूरही करता येते, त्यासाठी संयम व सातत्य महत्त्वाचे असते. म्हणूनच किमान बदलाची सुरुवात करणे आवश्यक आहे. आज सुरुवात म्हणून आपण किमान एका महिन्यासाठी सिगारेट सोडल्यास काय फायदे होऊ शकतात हे पाहणार आहोत.
सिग्नस लक्ष्मी हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ संजय कुमार यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “सिगारेट बंद केल्यास शरीर काही तासांतच विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यास सुरवात करते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो.” तर उजाला सिग्नस ब्राइटस्टार हॉस्पिटलमधील सल्लागार पल्मोनोलॉजिस्ट डॉ. दीपक कुमार यांनी स्पष्ट केले की, “यामुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारते कारण श्वसननलिका हानीकारक विषापासून मुक्त होत असते, खोकला, धाप लागणे, श्वास घेताना अडचण येणे हे त्रास यामुळे कमी होतात आणि शरीर उत्साही राहते.”
शरीराला मिळणारे फायदे
सुधारित रक्ताभिसरण आणि हृदयाचे आरोग्य: डॉ. संजय कुमार यांनी स्पष्ट केले की सिगारेट सोडल्यानंतर काही तासांतच तुमचे शरीर विषारी पदार्थ काढून टाकण्यास सुरुवात करते, ज्यामुळे रक्त प्रवाह चांगला होतो आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
फुफ्फुसाचे कार्य आणि श्वसन आरोग्य: डॉ दीपक कुमार यांनी पुष्टी केल्याप्रमाणे, तुमचे फुफ्फुसे काही दिवसातच सुदृढ होऊ लागतात. हानिकारक विषारी पदार्थ साफ होतात, श्वसननलिका आराम करतात आणि श्वास घेणे सोपे होते, खोकला कमी होतो.
मानसिक फायदे
वाढलेली स्पष्टता आणि सुधारित मनःस्थिती: डॉ दीपक कुमार यांनी नमूद केले की, निकोटीनच्या पकडीतून मुक्त झालेल्या, व्यक्ती अधिक एकाग्र होतात. तसेच मूड स्विंगची वारंवारता कमी होते.
चांगली झोप आणि वाढीव ऊर्जा: निकोटीन कमी झाल्यामुळे झोपेसाठी मदत होते. शरीर विश्रांती घेत असल्याने दिवसभर नवीन ऊर्जा मिळते, ज्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येऊन उत्पादन क्षमता सुद्धा वाढते.
सिगारेट सोडताना येणाऱ्या अडचणी व उपाय
धूम्रपान सोडणे सोपे नसते. निकोटीन कमी झाल्यामुळे अस्वस्थता व चिडचिड या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवू शकतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. डॉ. संजय कुमार यांनी या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला व आधार घेण्याचा मार्ग सुचवला आहे.
हे ही वाचा<< कोबीची तिखट ‘किमची’ वजन कमी करेल झटपट; डॉक्टरांनी सांगितले आंबवलेल्या भारतीय पदार्थांचे फायदे व पर्याय
काहींच्या बाबत वजन वाढणे ही चिंतेची बाब असू शकते, परंतु लक्षात ठेवा, खाण्याच्या सवयी आणि नियमित शारीरिक हालचाली या संभाव्य दुष्परिणामांना नियंत्रणात ठेवू शकतात. एका महिन्यासाठी धूम्रपान सोडणे हे निरोगी, धुम्रपान-मुक्त भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं शक्य आहे पण चिकाटी व दृश्यनिश्चय महत्त्वाचा आहे.