How Many Times In A Week Should You Drink Sugarcane Juice : अनेकदा बाजारात गेल्यावर भरपूर खरेदी केल्यानंतर आपण घरी जाताना एक तरी ग्लास उसाचा रस हा पितोच. तसेच उन्हाळ्यात तर उसाच्या रसाची मागणी आणखीनच वाढू लागते. थंडगार उसाचा रसाचा रस उन्हाळ्यातील उष्णता सहन करण्यास आपली मदत करतो. परवडणारे, चवीला गोड व खनिजांनी समृद्ध असलेले हे थंडगार पेय भारतीयांसाठी एक लोकप्रिय पर्याय आहे. पण, दररोज उसाचा रस पिणे खरंच आरोग्यदायी आहे का, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?
म्हणूनच दी इंडियन एक्स्प्रेसने दररोज उसाचा रस प्यायल्याने शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा केली. चेन्नईतील प्राग्मॅटिक न्यूट्रिशन येथील मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी म्हणाल्या की, जेव्हा तुम्ही दररोज उसाचा रस पिता तेव्हा तुमच्या कॅलरीज वाढण्याचा धोका असतो. कारण- त्यात पुरेशा प्रमाणात फायबर नसते आणि साखरेचे प्रमाण मात्र जास्त असते. त्यामुळे रक्तशर्करेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते, ज्यामुळे मधुमेही, आतड्यांसंबंधीच्या आरोग्य समस्या व वजनावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती या सर्वांसाठी ती एक धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींनी शक्यतो उसाचा रस पिणे टाळलेच पाहिजे.
तसेच, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमधून उसाचा रस प्यायल्याने त्या पेयात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या स्वच्छता आणि गुणवत्ता यांच्याबद्दल चिंता निर्माण होऊ शकते. कारण- त्यामुळे जीवाणूजन्य दूषितता (बॅक्टेरियल काँटामिनेशन) आणि संसर्ग यांची बाधा होण्याची शक्यता असते.
चेन्नईतील श्री बालाजी मेडिकल सेंटरमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी म्हणाल्या की, उसाच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने दातांच्या पोकळी आणि दातांच्या इनॅमलची झीज यांसारख्या समस्यासुद्धा उद्भवू शकतात. अस्वच्छ परिस्थितीत रस काढणे आणि साठवणे यांमुळे सूक्ष्मजीव दूषितता (मायक्रोबायल काँटामिनेशन) होण्याची शक्यता असते, ज्यामुळे अनेक अन्नजन्य आजार होऊ शकतात. त्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शन आणि हेपॅटायटिसचा समावेश आहे.
उसाचा रस पिण्याचे काही फायदे आहेत का?
पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी म्हणाल्या की उष्ण, दमट महिन्यांत कमी प्रमाणात उसाचा रस पिण्याचे अनेक फायदे होऊ शकतात. उसाच्या रसामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांचा स्रोत आहे. म्हणूनच, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इलेक्ट्रोलाइट नुकसान व्यवस्थापित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
त्याचबरोबर व्यायामानंतर उसाचा रस तुम्हाला जलद उर्जेचा स्रोत म्हणून मदत करू शकतो. त्याचबरोबर उसाच्या रसामध्ये पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने, लघवीस आणि मूत्रपिंडाच्या कार्यास त्याची मदत होते.
तुम्ही आठवड्यातून किती वेळा उसाचा रस पिऊ शकता?
जर बैठी जीवनशैली असेल तर दररोज उसाचा रस पिणे टाळा. खूप उन्ह असणाऱ्या दिवसात तुम्ही आठवड्यातून एकदा उसाचा रस पिऊ शकता किंवा ताकासारखे इतर पर्याय निवडा, ज्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तसेच निरोगी व्यक्तींनी आठवड्यातून जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा, अंदाजे १५० ते २०० मिली उसाच्या रसाचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी दिला आहे.