‘खामोशी’सारखा सिनेमा त्यातल्या कथेमुळे, सुंदर अभिनयामुळे, संगीतामुळे आपल्याला भावतो, पण मनात गडद सावली राहते, ती मनोरुग्णाच्या इस्पितळाची. One flew over the cuckoo’s nest हा प्रसिद्ध इंग्रजी सिनेमा पाहतानाही मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमधील वातावरण मनावर ठसा उमटवते. ‘दामिनी’, ‘लम्हे’ अशा चित्रपटांमधून पाहिलेली शॉक ट्रीटमेंट म्हणजे मोठ्ठे यंत्र, रंगीबेरंगी दिवे, पेशंटचे किंचाळणे! अशी केविलवाणी दृश्ये पाहून प्रेक्षकांच्या मनात मानसिक विकार बरे करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपचारांविषयी मनात भीती निर्माण होते.
आणखी वाचा: Health Special: कधी थंड, कधी गरम: त्वचाविकारांचा आणि तापमानाचा काय संबंध?
१८व्या शतकात पाश्चिमात्य देशांमध्ये मुख्य वस्तीपासून दूर मनोरुग्णांसाठी इस्पितळ बांधणे आणि तिथे मनोरुग्णांना वर्षानुवर्षे ठेवणे हाच मुख्य उपाय होता. आपल्याकडेही इंग्रजांनी मोठाली ‘मेंटल हॉस्पिटल्स’ बांधली. याच्या जोडीलाच विविध अघोरी उपायांचे प्रयोग लोक मनोविकार बरे करण्यासाठी
करीत असत. आजही अंधश्रद्धेमुळे, अज्ञानामुळे, अनेक गैरसमजुतींमुळे गंडेदोरे, बुवाबाजी, वेगवेगळे अंगारेधुपारे करणारे दर्गे, तांत्रिक-मांत्रिक यांच्याकडे मानसिक आजार बरे करण्यासाठी धाव घेणारे अनेक जण आहेत. अर्थात आता मनोविकारांसाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. समाजात मानसिक ताणतणावाची आणि मानसिक विकाराची स्वीकारार्हता वाढते आहे. म्हणूनच एखादी २० वर्षांची तरुणी आपल्या आई-वडिलांना सांगते की ‘मला मदतीची गरज आहे. मला कौन्सिलरकडे घेऊन चला’, किंवा एखादे ६५ वर्षांचे गृहस्थ आपणहून मनोविकारतज्ज्ञांकडे येऊन सांगतात, ‘मला वाटते मला हल्ली विस्मरण व्हायला लागले आहे, काय उपाय करू?’
आणखी वाचा: Health Special: व्हिनेगरचा वापर- काय कराल, काय टाळाल?
एखाद्याने आपल्या मानसिक समस्येसाठी मदत घ्यायची ठरवली तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे मधुमेहाचा इलाज करताना औषधे, गोळ्या, आवश्यक असेल तर इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते; परंतु तेवढेच पुरेसे नसते. आपली जीवनपद्धती बदलावी लागते, आहारावर नियंत्रण ठेवावे
लागते, व्यायाम करावा लागतो आणि ताणतणावाचे नियोजन करावे लागते. हे सगळे करताना केवळ एक डॉक्टर सगळे करत नाही. आहारासाठी, व्यायामासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. ठराविक काही कालावधीने रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात. तसेच काहीसे मनोविकारांच्या उपचारामध्ये असते. मनोविकारतज्ज्ञ रोगाचे निदान करून आवश्यकतेनुसार औषध गोळ्या सुरू करतात. अनेकांच्या मनात या औषधांविषयी अनेक प्रश्न असतात. ‘या गोळ्यांचे व्यसन तर नाही ना लागणार?’ “ या गोळ्या आयुष्यभर घ्यायच्या का?” “ गोळ्या न घेता मला बरे नाही का होता येणार?” “ या गोळ्यांचे खूप गंभीर दुष्परिणाम होणार तर नाहीत ना?” “माझा मुलगा सारखा झोपून नाही ना राहणार?”
आणखी वाचा: Health Special: वेदना आपल्या संरक्षणासाठी असते, म्हणजे काय?
काही मानसिक विकार अगदी सौम्य प्रमाणात झालेले असतात. उदा. डिप्रेशन आणि चिंतेचा विकार. तसे असेल तर गोळ्यांची आवश्यकता नसते, तर केवळ मानसोपचाराने अशा सौम्य विकारांवर उपचार होऊ शकतो. मनोविकाराची लक्षणे तीव्र स्वरूपाची असतील, रुग्णाच्या दैनंदिन आयुष्यावर आणि
जीवनाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असेल तर औषधे, गोळ्या घेणे अतिशय आवश्यक असते. मनोविकारांमध्ये मेंदूतील रासायनिक संतुलन ढळते. हे संतुलन औषधांच्या साहाय्याने कायम ठेवले जाते. हे रासायनिक संतुलन परत आले तर रोगाची लक्षणे नियंत्रणात येतात. उदा. डिप्रेशनमध्ये मनात येणारी निराशा आणि नकारात्मक विचार, मंत्रचळ (obsessive compulsive disorder) या रोगात मनात पुन्हा पुन्हा येणारे विचार आणि ते कमी व्हावेत म्हणून परत परत केल्या जाणाऱ्या कृती, स्किझोफ्रेनियासारख्या आजारात पेशंटमध्ये निर्माण झालेली आक्रमकता. औषधे आपले काम करताना काही दुष्परिणाम कधी कधी आढळतात, परंतु कमीत कमी दुष्परिणाम होतील किंवा ते नियंत्रणात ठेवता येतील असेही उपाय करता येतात. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने या अडचणीवर मात करता येते. औषधे बराच काळ घ्यावी लागली याचा अर्थ त्यांचे व्यसन लागले असा होत नाही. पेशंटची लक्षणे, उपचाराला प्रतिसाद आणि मनोविकार किती वेळा झाला आहे अशा अनेक गोष्टींवर औषधे किती दिवस द्यायची, बंद करायची की नाही ते ठरते. संशोधनाने असे दाखवून दिले आहे की मनोविकार बरे करताना औषधे आणि मानसोपचार (psychotherapy) दोन्हीचा एकत्रितपणे उपयोग होतो. मानासोपचाराचेही अनेक प्रकार असतात. वर्तणूक उपचार (behavior therapy), विचार वर्तणूकनिष्ठ मानसोपचार (Cognitive behavior therapy), विवेकनिष्ठ उपचारपद्धती (Rational emotive behavior therapy), Interpersonal therapy आणि अशा अनेक पद्धती वापरून रुग्णांना मनोविकारातून बाहेर पडायला तसेच जीवनाची गुणवत्ता (quality of life) वाढायला आणि समाजामध्ये सामावून जायला (social integration) मदत करते.
मानासोपचाराबरोबरच व्यवसायोपचारपद्धती (occupational therapy), श्रवणशास्त्र व वाचा-भाषा विकृतीउपचारपद्धती (Audiology and speech language therapy), विशेष शिक्षणतज्ज्ञ (special educator) असे अनेक जण मनोविकारांवर उपाय करणाऱ्या चमूमध्ये असतात. अशाच अनेक शंका असतात त्या Electroconvulsive therapy बद्दल. अत्यंत छोटा असा विजेचा झटका (electric current) क्षणार्धात दिला जातो. अतिशय परिणामकारक, अत्यंत शास्त्रीय आणि संशोधनाने सिद्ध झालेली अशी ही उपचारपद्धती काही ठराविक पेशंटसाठी विशिष्ट परिस्थितीमध्ये वापरली जाते. मेंदूतील रासायनिक संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम ईसीटी करतात आणि तेही औषधांपेक्षा झटपट! शल्यक्रियेआधी भूल दिली जाते, तशीच याच्या आधी दिली जाते. त्यामुळे जी भयावह दृश्ये आपण चित्रपटांमधून पाहिलेली असतात तसे काही घडत नाही. आपल्या मनातील सर्व
शंकांचे निरसन अवश्य करून घ्यावे! विज्ञानाची प्रगती सुरूच असते. त्यामुळे चेतासंस्थेचे नियंत्रित परिवर्तन (neuromodulation), सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना यश येताना दिसते आहे. ईसीटीची काहीशी जटिल प्रक्रिया, एखाद्या शस्त्रक्रियेप्रमाणे घ्यावी लागणारी काळजी आणि मानसिक विकारांवर अधिकाधिक परिणामकारक उपाय शोधण्याची गरज या सगळ्यांतून नवीन तंत्रांचा जन्म होताना आज दिसतो आहे. Transcranial
magnetic stimulation आणि Transcranial direct current stimulation अशा नवीन उपचारपद्धती वापरात येत आहेत. सतत आणखी प्रभावी औषधे, कमीत कमी दुष्परिणाम आणि नवनवीन तंत्रे ज्यांचा उपयोग मनोरुग्णांचे आयुष्य सुंदर व्हावे यासाठीच आहे!