What Is Acid reflux : चित्रपट, मालिकांमधील अभिनेते, अभिनेत्री यांची त्वचा आणि फिटनेसकडे लक्ष गेले की, आपसूकच मनात येते की, यांच्या आरोग्याचे नेमके रहस्य काय असेल? तंदुरुस्त राहण्यासाठी, दिवसभर काम करण्यासाठी कोणत्या आहाराचे ते सेवन करीत असतील. तर या प्रश्नांची उत्तरे सध्या अनेक इन्फ्लुएन्सर त्यांच्या पॉ़डकास्ट मुलाखतीद्वारे अभिनेता आणि अभिनेत्रींना विचारतात आणि त्यांच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेतात. अलीकडेच नील नितीन मुकेशने त्याच्या खाद्यपदार्थांच्या आवडीबद्दलचा खुलासा केला. अभिनेत्याला पचनाची समस्या असल्यामुळे तो नेहमी वेळेवर खातो, असेदेखील त्याने सांगितले.
‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत ४३ वर्षीय अभिनेता नितीन मुकेश म्हणाला, “मी दर दोन तासांनी खातो. मला अनेक वर्षांपासून ॲसिड रिफ्लक्सची समस्या आहे. मला जीईआरडी आहे त्यामुळे मला दर दोन तासांनी काही ना काही खावे लागते.” अभिनेत्याला गुजराती छुंदा भरपूर आवडतो. त्याच्यासाठी त्यांच्या येथे राहणाऱ्या काकू सुमारे ८ ते १० किलो छुंदा बनवून ठेवते, जो त्याला पिझ्झा व इतर अनेक पदार्थांसह खायला आवडते, असे त्याने नमूद केले.
तर, ॲसिड रिफ्लक्स या समस्येबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने खराडी-पुणे येथील मणिपाल हॉस्पिटलचे सल्लागार डॉक्टर सुधीर जाधव यांच्याशी चर्चा केली. डॉक्टर म्हणाले, ॲसिड रिफ्लक्स, ज्याला हायपर ॲसिडिटी किंवा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD)देखील म्हणतात. ही सामान्यतः जीवनशैलीच्या विशिष्ट सवयी आणि तळलेले, फॅटी, मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे उद्भवणारी सामान्य समस्या आहे. अतिरिक्त ॲसिडच्या निर्मितीमुळे पोटाच्या लायनिंग (lining of the stomach) नुकसान पोहोचते आणि ढेकर येणे, छातीत दुखणे आदी समस्या उद्भवतात.
पोट खूप रिकामे किंवा खूप जास्त भरलेले राहू नये म्हणून दिवसभर सतत खात राहिल्याने त्यांच्या ॲसिड रिफ्लक्सच्या समस्या सहज हाताळता येतात, असे मुंबईतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी ग्लेनेगल हॉस्पिटलचे संचालक व वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मेघराज इंगळे यांनी सांगितले आहे. जर तुमचे पोट खूप भरलेले किंवा अगदी रिकामे असेल, तर पोटात ॲसिड तयार होऊ शकते, परिणामी ॲसिड रिफ्लक्स होऊ शकते, असे डॉक्टर इंगळे यांनी नमूद केले आहे.
जेव्हा तुम्ही दिवसातून बरेच तास काही खात नाही तेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेत जमा होऊ शकते. मग त्यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थतादेखील जाणवू शकते. दुसरीकडे जास्त जेवण सेवन केल्यानेदेखील असेच होऊ शकते. जास्त जेवणामुळे ॲसिड वरच्या दिशेने ढकलताना पोटावर दबाव येऊ शकतो. त्यामुळेच आम्लाची पातळी स्थिर ठेवण्यासाठी व्यक्तींना वारंवार थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत मिळू शकते. परिणामी पोट फुगणे टाळण्यास आणि पोटाच्या लायनिंग परिणाम होण्यामुळे संभवणारी चिडचिड कमी करण्यासही साह्य होऊ शकते.
या समस्येपासून स्वतःचा बचाव कसा करावा?
हलके आणि मसालेदार नसलेले पदार्थ खा. त्यामुळे ॲसिड रिफ्लक्सशी संबंधित लक्षणे टाळणे शक्य होऊ शकते, अशी सल्लावजा सूचना डॉक्टर इंगळे यांनी केली आहे.
तुमच्या पोटाला हलके असलेले आणि पचनाला उत्तेजन देणारे पदार्थ खाण्यावर अधिक लक्ष द्या. तुम्ही अन्न हळूहळू खा आणि चांगले चघळले गेलेय याची खात्री करा. त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. या खाण्याच्या पद्धतीचा अवलंब केल्याने तुम्हाला ॲसिड रिफ्लक्सच्या समस्येवर लक्षणीयतेने नियंत्रण ठेवता येते आणि रात्री उशिरा खाणे टाळण्यास मदत होऊ शकते. पण, सतत प्रयत्न करूनही तुमचा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास कायम राहिला, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे डॉक्टर तुमच्या स्थितीचे मूल्यांकन करू शकतात आणि त्यानुसार उपचार किंवा पर्याय सुचवू शकतात.