What is Ajinomoto and how does it impact your body: लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आवडीने खाणाऱ्या चायनीज नूडल्समध्ये म्हणजेच विशेषतः भारतातील देशी फ्राईड राईस, हाका नूडल्स, मंच्युरिअन मध्ये अजिनोमोटो हा एक प्रकार हमखास वापरला जातो. आजवर आपण थोरामोठ्यांकडून या अजिनोमोटोचे अनेक दुष्परिणाम ऐकले असतील पण त्यात खरंच तथ्य आहे का हा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडला असेल. त्यामुळे आज आपण इंडियन एक्सस्प्रेसने तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून अजिनोमोटो व त्याच्या परिणामांविषयी दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजिनोमोटो म्हणजे काय?

मुळात अजिनोमोटो हे मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) या उत्पादनाच्या ब्रँडचे नाव आहे, जे पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरले जाते. शेफ अजय चोप्रा यांनी सांगितले की, कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी अजिनोमोटो माफक प्रमाणात वापरला जाऊ शकतो. तुम्ही किती प्रमाणात आणि किती वेळा वापर करताय यावरून पदार्थाचे फायदे तोटे ठरत असतात. अजिनोमोटो हा निश्चितच खाण्यायोग्य पदार्थ आहे, लोकं याला जितकं वाईट समजतात तितका हा पदार्थ हा हानिकारक नाहीच फक्त तुम्ही प्रमाण व वारंवारता यावर लक्ष द्यायला हवं.”

डॉ निरुपमा राव, पोषणतज्ज्ञ, रेजुआ एनर्जी सेंटर, मुंबई व प्राइमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रभारी आहारतज्ज्ञ अंकिता घोषाल बिष्ट, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “एमएसजी गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा विषय असताना, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की जेव्हा तुम्ही मध्यम प्रमाणात त्याचे सेवन करता तेव्हा ते सुरक्षित ठरू शकते. MSG हे चव वाढवणारे आहे जे तुमच्या जेवणात एक तुरट, आंबट, चव वाढवते आणि त्यामुळे पदार्थाला घट्टपणा येऊ शकतो.” अजिनोमोटोचा वापर प्रक्रिया केलेले पदार्थ, रेस्टॉरंट मधील पदार्थ आणि फास्ट-फूड पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

डॉ राव यांनी पुढे सांगितले की, काही लोक MSG असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखी, घाम येणे आणि छातीत दुखणे यासारखी लक्षणे अनुभवल्याचा दावा करतात. याला “चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम” असे संबोधले जाते. MSG चे अधिक सेवन केल्याने सुद्धा काहींना त्रास होऊन अशी लक्षणे जाणवू शकतात.

अजिनोमोटोमुळे त्रास होण्याचे कारण काय?

आरोग्य सल्लागार व Nurture च्या संस्थापक शिखा अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे, अजिनोमोटोमध्ये सोडियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे सोडियमच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी हे चिंतेचे कारण ठरते.

तर अग्रवाल यांच्या माहितीनुसार, असे काही पुरावे आहेत की अजिनोमोटो असलेले अन्न हे अधिक चविष्ट असल्याने अति खाण्यास उत्तेजन देऊ शकते व कालांतराने वजन वाढण्यास आणि लठ्ठपणात योगदान देऊ शकते.”

हे ही वाचा<< दिवसातून एकदा जेवून करताय उपवास? वजन कमी करण्याचे प्रयत्न आरोग्यावर काय परिणाम करतात, पाहा 

एमएसजीचा वापर मर्यादित कसा करावा?

तुमच्या अन्नातील MSG च्या स्रोताची माहिती असणे आवश्यक आहे. अंकिता घोषाल बिश्त यांनी सांगितले की, प्रक्रिया न केलेले अन्न हे संतुलित आहारासाठी उत्तम आहे, ज्यामध्ये MSG चा वापर नसतो. पण क्वचित कधीतरी कमी प्रमाणात MSG किंवा अजिनोमोटोचा वापर करायला हरकत नाही. हे केवळ एक कृत्रिम चव वाढवणारे उत्पादन आहे, पोषणाचा स्रोत म्हणून त्यावर अवलंबून राहू नये. अशा पदार्थांवर जास्त अवलंबून राहिल्याने अधिक पौष्टिक संपूर्ण अन्नपदार्थ खाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्याचे परिणाम वाईट होऊ शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is ajinomoto is it actually bad for you if you eat chinese fried rice hakka noodles expert burst out myths how to use msg svs
Show comments