डॉ. वैभवी वाळिम्बे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्गोफोबिया म्हणजे शारीरिक वेदनेची अवास्तव आणि तीव्र भीती. अर्थातच सामान्यपणे कुणालाही आपल्याला कधीच कुठली वेदना जाणवू नये असंच वाटत. हा फोबिया असलेले लोक वेदनेच्या विचारानं किंवा कल्पनेनंदेखील अतिशय घाबरून जातात. त्यांना वाटणारी चिंता ही होणार्‍या वेदनेच्या किंवा संभाव्य वेदनेच्या कैकपट जास्त असते. ही सततची चिंता या व्यक्तींना वेदनेबद्दल अधिक संवेदनशील करते. अल्गोफोबियाला काही वेळा ‘पेन रिलेटेड फियर (Pain Related Fear)’ असं ही म्हणतात.

अल्गोफोबिया किती सामान्य आहे?

जुनाट वेदना (क्रॉनिक पेन) असलेल्या लोकांमध्ये अल्गोफोबिया बर्‍याच प्रमाणात दिसून येतो. त्यातल्या त्यात बर्‍याच काळापासून कंबरदुखी किंवा पाठदुखी, गुडघेदुखी असलेले रुग्ण मनात ही अवास्तव भीती घेऊन जगतात. क्रॉनिक वेदनेमुळे जगातील १९.३% लोक त्रस्त आहेत आणि हे लोक अल्गोफोबियासाठी जास्त संवेदनक्षम आहेत. अर्थात प्रत्येक क्रॉनिक पेन असणार्‍या माणसाला अल्गोफोबिया असेलच असं नाही.

अल्गोफोबिया कशामुळे होतो?

सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण रस्त्याने चाललो आहोत आणि अचानक समोर अस्वल दिसल तर भीती वाटण आणि पळून जाणं स्वाभाविक आहे. ही अचानक वाटलेली भीती आणि चिंता आपल्याला धोकादायक परिस्थितींपासून वाचवण्याचं काम करत असते. पण याच दुसरं टोक म्हणजे नेहमीच रस्त्याने चालताना अस्वल रस्त्यावर असेलच आणि ते मलाच त्रास देईल असा विचार आणि चिंता सतत करण. हे जेंव्हा वेदनेच्या बाबतीत होतं तेंव्हा याला अल्गोफोबिया असं म्हणतात.

हेही वाचा… Health Special: सविराम उपास म्हणजे काय?

याचा शास्त्रीय आधार म्हणजे मानवी मेंदूतील भीती किंवा चिंतेच नियमन करणारी रसायनं आणि तुमच्या वेदनेची तीव्रता ठरवणारी रसायनं एकच आहेत. त्यामुळे रासायनिक असंतुलन दोन्ही समस्यांना चालना देतं.

अल्गोफोबिया कोणाला होऊ शकतो?

अल्गोफोबिया कोणालाही कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो, पण क्रॉनिक पेन असलेल्या लोकांमध्ये हे सर्वात सामान्य आहे. या काही वेदनांशी ही भीती प्रामुख्याने जोडली गेलेली आहे.

१. कर्करोगाशी संबंधित वेदना.
२. सतत आणि वारंवार होणारी डोकेदुखी.
३. दाहक वेदना (संसर्ग किंवा स्वयंप्रतिकार विकारांमुळे वेदना).
४. मस्कुलोस्केलेटल वेदना, जसे की पाठदुखी किंवा संधिवात
५. न्यूरोजेनिक वेदना (मज्जासंस्थेच्या विकारांमुळे वेदना).
६. नोसिसेप्टिव्ह वेदना (जळणे किंवा जखम यांसारख्या ऊतींच्या दुखापतीमुळे होणारी वेदना).
७. सायकोजेनिक वेदना (मानसिक घटकांशी संबंधित वेदना).

अल्गोफोबियाची लक्षण काय आहेत?

अल्गोफोबिया असलेल्या लोकांमध्ये वेदना आणि चिंतेचं एक अव्याहत चक्र दिसून येते:

आपत्तीजनक दृष्टिकोन (Catastrophizing): कोणत्याही परिस्थितीत सगळयात वाईट संभाव्य परिणामाची कल्पना करणे. अल्गोफोबिया असलेली व्यक्ती वेदनेकडे एक धोका म्हणून पाहू लागते. उदाहरणार्थ, रस्त्यावर पायी चालणे, जिने चढणे उतरणे यासारख्या अगदी साध्या क्रियाही धोकादायक वाटतात. मी रस्त्याने चालताना पडेन, पाय घसरून पडेन मग माझा पाय फ्रॅक्चर होईल मग खूप दुखेल आणि त्यामुळे मला काम करता येणार नाही, नोकरी करता येणार नाही.

अतिदक्षता (Hypervigilance): यात रुग्ण संभाव्य वेदनेवर लक्ष केंद्रित करून प्रतिक्रिया देतात. रुग्णाची भीती ही वेदनेच्या कल्पनेने आलेली असते. असे रुग्ण कोणत्याही परिस्थितीत वेदना होण्याची शक्यता पाहू लागतात. अतिशय साध्या आणि निरुपद्रवी शारीरिक क्रिया किंवा शारीरिक संवेदना ते वेदनेशी जोडतात.

फियर अ‍ॅव्हॉइडन्स: यामध्ये व्यक्ती अशा शारीरिक क्रिया किंवा हालचाली टाळते ज्यामुळे वेदना होऊ शकतात. काही लोकांना यातून कायनेसोफोबिया (म्हणजे विशिष्ट हालचाल करण्याची भीती) विकसित होतो, ज्याबद्दल आपण येणार्‍या काही लेखात जाणून घेणारच आहोत.

अल्गोफोबियाचं निदान कसं केलं जातं?

पेशंटने आपल्या वेदनांबद्दल जितके शक्य तितके तपशील पुरवणे महत्वाचं आहे. किती त्रास होतो? वेदना किती काळ टिकते? कधीपासून होते? याची व्यवस्थित आणि सखोल माहिती देणं हे पेशंटचं कर्तव्य आहे तसचं तुमच्या मते तुमच्या वेदानेचं कारण काय आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न फिजिओथेरपिस्टने विचारणं आवश्यक आहे.

हेही वाचा… Health Special: पावसाळ्यातील आरोग्यबिघाडाला ‘हे’ कारणीभूत!

याव्यतिरिक्त अल्गोफोबियाचं निदान करण्यासाठी एक स्केल वापरली जाते जिला Pain Anxiety Symptom Scale (पेन अ‍ॅन्झायटी सिम्पटम स्केल) असं म्हणतात ‘वेदना होत असताना मी सरळ विचार करू शकत नाही’ किंवा ‘वेदनेमुळे मला मळमळ होते’ अशा विधानांवरील तुमच्या प्रतिसादांना रेट करण्यास सांगते. रेटिंग स्केल शून्य (कधीही नाही) ते ५ (नेहमी) पर्यंत जाते. या स्केलचा एकंदरीत स्कोअर, सखोल सबजेक्टिव्ह आणि ऑब्जेकटिव्ह तपासणी यावरून अल्गोफोबियाचं निदान करता येतं. अल्गोफोबिया चे उपचार आणि प्रतिबंध पुढच्या भागात..

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is algophobia hldc dvr
Show comments