डॉ. शशांक सामक व डॉ. जेसिका सामक
नवरा-बायकोतले बहुतांशी संवाद जेव्हा फोनवर केले जातात, ते चौकश्यांचे जास्त असतात. त्यात रोमँटिकपणा क्वचितच असतो. अगदी ‘आय लव यू’ नाही म्हणता आले तरी ‘मला तुझी आठवण झाली म्हणून फोन केला’ अशी वाक्येसुद्धा रोमँटिकच असतात. ती उच्चारण्यासाठी काही सेकंदांचा वेळ लागतो आणि तेवढा वेळ आपण रोज निश्चितच काढू शकतो.
नवरा-बायकोतले बहुतांशी संवाद जेव्हा फोनवर केले जातात, ते चौकश्यांचे जास्त असतात. त्यात रोमँटिकपणा क्वचितच असतो. अगदी ‘आय लव यू’ नाही म्हणता आले तरी ‘मला तुझी आठवण झाली म्हणून फोन केला’ अशी वाक्येसुद्धा रोमँटिकच असतात. ती उच्चारण्यासाठी काही सेकंदांचा वेळ लागतो आणि तेवढा वेळ आपण रोज निश्चितच काढू शकतो. हे आपण आपले केलेले पॉझिटिव्ह ब्रेन वॉश असते. यामुळे दाम्पत्यस्वास्थ्य सुदृढ होत असते.
निलेश एक चाळिशीतला डॉक्टर. दोन मुले व गृहकृत्यदक्ष बायको असलेला. नेहमीपेक्षा आज जरा तो थोडा उशिराच उठला होता. तणतण करतच आवरून घेतले आणि तिरीमिरीतच ब्रेकफास्ट अर्धवट करून ऑपरेशनला गेला. किचकट ऑपरेशन पार पाडून त्या केसची पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट करता करता दुपारचे १२ वाजत आले. मग ओपीडी. स्टाफवर जरा चिडचिडतच होता तो. पेशंटशी थोडा वैतागूनच बोलत होता. मधेच बायकोचा एक प्रेमळ फोनही तुटकपणे बोलत ‘संपवला’. डोके गरगरत असताना ४ वाजता घरी आला आणि व्यवस्थित जेवला खरा, पण जेवण आणि पाणी देण्यावरून बायकोशी कुरबुर केली, मग बायकोही चिडली. ‘तू तू मं मं’ झाली आणि साडेपाचला पुन्हा ओपीडीला गेला. ओपीडी संपता संपता त्याला वाटलं आपण उगाचच चिडचिड केली बायकोवर. मग तिला फोन लावला, पण आता बायकोचा मूड नव्हता. वैतागून नंतर क्लिनिकल मीटिंगला गेला. एखाद दोन ड्रिंक्सही झाले. संपेपर्यंत बारा-साडेबारा झाले. घरी येऊन पाहिले बायको कधीच झोपली होती. मोठ्या मुलाचा टीव्ही चालू होता. त्याच्यावर डाफरून झोपून गेला बिचारा..
असेच दिवस जात होते. ‘काहीही’ घडत नव्हते. घरातला ताण मात्र वाढत होता. नीलेशला ते जाणवत होते, पण ‘कारण’ कळत नव्हते. बायकोलाही समजत नव्हते सध्या असं का चाललंय आणि अशातच ‘मेडिकल असोसिएशन’चे पत्रक आले की एक आगळावेगळा कार्यक्रम डॉक्टरांसाठी आयोजित करण्यात आला आहे, ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’. नीलेशने बायकोला ते पत्रक दाखवले. दोघांच्या डोक्यात प्रकाश पडला. ‘अरेच्चा, हे तर कारण नाही ना आपल्यातील ताणाचे?’ दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि आपल्या ताणाचे मूळ व भांडणांची उत्तरे शोधायला कार्यक्रमाला गेले..!
एका डॉक्टरच्या वैवाहिक जीवनाची ही सत्यस्थिती. अशा असंख्य केसेस गेल्या बत्तीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये बघूनच मला व माझ्या बायकोला, जेसिकाला, मी ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’ असा एक स्टेज शो करावा ही कल्पना सुचली. माझ्याकडील केसेस हाताळताना आलेले अनुभव, ‘कामजीवन’ याविषयीचा स्त्रियांचा दृष्टिकोन जेसिकाकडून (आणि अर्थातच तिच्या मत्रिणींकडूनही) समजून घेऊन मी टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम विकसित करीत गेलो. पुण्यातील पहिल्याच कार्यक्रमाला (५ ऑक्टोबर २००३) टिळक स्मारक मंदिरातील आटोक्यात न येणारा (काही विंगेतही येऊन बसलेला) उत्सुक, उत्साही व उदंड जनसमुदाय जमला होता. त्यासमोर ऑडियो-व्हिज्युअल साधनांनी हा विषय सादर केला गेला आणि दुसऱ्या दिवशीच्या पुण्यातील सर्व वर्तमानपत्रांनी तो उचलून धरला.
‘अॅडल्ट सेक्शुआलिटी’वरील पुण्यातील प्रतिसादाने माझा उत्साहही द्विगुणित झाला. विषय तसा मुळातच उत्सुकतेचा पण संकोचाचासुद्धा. खरं म्हणजे संकोच वाटायचे तसे काही कारण नाही. जी गोष्ट शंभरपकी नव्याण्णव जणांच्या आयुष्यात येते, जी अटळ आहे, आनंददायी आहे, प्राणिमात्रात मूलभूत आहे आणि जिचे परिणाम आयुष्यात दूरगामी होत असतात, तिच्याविषयीचे ज्ञान घेण्यास शरम वाटण्यासारखे काहीही नाही. परंतु ज्या वातावरणात आपण लहानाचे मोठे होतो त्या वातावरणाचा हा परिणाम असतो. बाहेरून आपण कितीही आधुनिक विचारांचे दाखवत असलो तरी कामजीवनाविषयी आपण कमालीचे कर्मठ असतो आणि सामाजिक, कौटुंबिक व शैक्षणिक परिस्थितींमधून आपण आपली अशी मते, विचार व कल्पना ठाम करून सेक्सकडे बघत असतो. हे ज्ञान पुष्कळदा गरज्ञानच असते.
खरे म्हणजे बहुतांशी गृहस्थाश्रमी व्यक्ती या आपल्या दैनंदिन कामकाजात इतक्या गुंतून जात असतात की त्यांच्या गृहस्थाश्रमाची सुरुवात ज्या गोष्टीने होत असते, ती कामजीवनासारखी नित्य व आवश्यक गोष्टच काळाच्या ओघात हरवून टाकतात आणि मग ‘कामात गुंतूनी गुंतता, झाला कामभाव हा वेगळा’ ही स्थिती होते. शृंगारच विसरला जातो. कामजीवनाची ‘चाळिशी’, निस्तेजता येते आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यावर ती येते. अगदी तिशी, पस्तिशीतसुद्धा. पती, पत्नी दोघेही याला जबाबदार असतात. याला सर्वात महत्त्वाचे कारण असते लिंग-योनी संबंध म्हणजेच सेक्स ही सेक्सविषयीची ठाम कल्पना. मग सर्व गोष्टी त्यासंबंधीच व त्यासाठीच केल्या जातात.
(लोकसत्ता चतुरंग पुरवणीमध्ये १६ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)