“डॉक्टर बघाना, आमचा अर्णव आता दोन वर्षाचा आहे. पण तो सहा महिन्याचा असल्यापासून त्याला अंगावर सतत पुरळ उठणं आणि खाज येणं असं चालूच आहे. औषध पाणी केलं की, जरा बरं वाटतं, पण परत ये रे माझ्या मागल्या. त्याला अ‍ॅलोपॅथी करून झालं. होमिओपॅथी केलं, आयुर्वेदिकही केलं. पण कश्शाने गुण म्हणून येत नाही. काय करावं कळत नाही.” अर्णवच्या आईच्या जीवाची होणारी घालमेल मला कळत होती. अर्णवच्या आईच्या जीवाची होणारी घालमेल मला कळत होती. ज्या मुलांची त्वचा ही अतिसंवेदनशील आहे अशा मुलांच्या पालकांची ही एक प्रातिनिधिक तक्रार आहे. अटोपीक डर्मेटायटिस , ज्याला अतिसंवेदनशील त्वचेचा आजार असेही म्हटले जाते, हा एक त्वचारोग आहे. जसं काही जणांना वारंवार शिंका येतात,
काहीजणांना दम्याचा आजार असतो, काही जणांचे डोळे अधून मधून खाजत असतात, तसंच काही जणांची त्वचाही अतिसंवेदनशील असते व अशा लोकांना साध्या साध्या गोष्टींचीही ऍलर्जी येते. या आजाराला अटोपीक डर्मेटायटिस किंवा अतिसंवेदनशील त्वचेचा आजार असे म्हटले जाते.

हा आजार होण्याची शक्यता कोणाला जास्त असते?

त्वचारोगाच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्यांपैकी साधारण ३ ते ५ टक्के रुग्ण हे या आजाराचे असतात. अतिलहान मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो. पण शाळकरी मुलं आणि मोठ्या माणसांनादेखील हा आजार होऊ शकतो. ज्यांच्या जवळच्या नातेवाईकांना (उदा. आई-बाबा, आजी-आजोबा, काका, मामा, मावशी, आत्या) दमा, वारंवार शिंका, अंगावर पित्त उठणे, डोळ्यांना खाज येणे किंवा अटोपिक डर्मेटायटिस वगैरे आजार असतात, त्यांनाही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांना लहानपणी बालदमा असतो त्यांना मोठेपणी हा त्वचारोग होऊ शकतो. या उलटही ज्यांना लहानपणी टोपिक डर्मेटायटिस असतो त्यांना मोठेपणी दमा किंवा सर्दी शिंकांचा आजार होण्याची शक्यता जरा जास्त असते.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ

आजाराची कारणे

अनुवंशिकता हे त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. अतिउष्ण व अतिदमट हवा किंवा अतिथंड व अतिकोरडी हवा, लोकरीचे, नायलॉनचे किंवा जास्त खरखरीत व घट्ट कपडे, साबण, डिटर्जंट, सॅनिटायझर यांचा वापर, तसेच धूळ व धुळीमध्ये असणारे सूक्ष्मजंतू (डस्ट माईट) यांच्या संपर्कामुळे हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. आपले घर जर काही दिवस बंद असेल तर गादी व चादरीवरदेखील हे धुळीतील जंतू बेसुमार वाढतात व ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्याला अशा गादीवर झोपल्यामुळे अंगाला खाज येऊ शकते. कुत्रा मांजरांच्या अंगावरील केस तसेच त्यांच्या अंगावरील धुळीमुळेदेखील काही जणांना अंगाला खाज येऊ शकते.

आजाराची लक्षणे

वयोमानाप्रमाणे या आजाराची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. पण त्वचा कोरडी असणे आणि अतिसंवेदनशील असणे हे या आजाराचे  सर्वसामान्य लक्षण आहे.

लहान बालके

साधारण वयाच्या दोन ते तीन महिन्याकडे हा आजार सुरू होतो. या वयातील मुलांच्या गालावरील त्वचा कोरडी होते व तेथे लाल पुरळ येते. तसेच कपाळ, हातापायांची बाहेरील त्वचा व कधी कधी पोटापाठींवर व डोक्यात देखील लाल पुरळ येऊन कधी कधी त्यातून लस येते. एवढ्या छोट्या मुलाला नेमके कुठे खाजवावे ते कळत नाही. पण ही मुलं बऱ्याच वेळा कान खाजवतात व थोडी मोठी झाली की मग आजार झालेली त्वचा खाजवत राहतात. खाजेमुळे त्यांची झोपही अपुरी होते व ती चिरचिरी होतात. पुढे रांगायला लागली की ही मुलं कधीकधी अडगळीत जातात व तिथल्या धुळीमुळे त्यांचा हा आजार थोडा वाढू शकतो. साधारण दोन वर्षानंतर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येतो. या वयातील ज्या बालकांना मच्छर चावलेले सहन होत नाहीत, त्यांनाही अटोपिक डर्मेटायटिस किंवा बालदमा किंवा ऍलर्जीची सर्दी असण्याची किंवा होण्याची शक्यता जास्त असते.

शाळकरी मुलेमुली

या वयोगटात हा आजार अंगभर न राहता हातापायाच्या लवणींमध्ये तर कधी काखेमध्ये किंवा जांघेमध्ये किंवा मानेवर अशा ठराविक ठिकाणी राहतो. या ठिकाणी बारीक पुरळ उठून भरपूर खाज येते. या वयात मुलांचे मैदानात व मातीमध्ये खेळणे जास्त असते. तसेच खेळल्यामुळे काखेत व जांघेत घामही येतो. त्यामुळे हा आजार कमी अधिक प्रमाणात सुरू राहातो. जसा बालदमा सहावी- सातवीपर्यंत राहतो, तसाच हा शाळकरी मुलांचा अटोपिक डर्मेटायटिस जशी मुलं मोठी होतात तसा कमी होत जातो.

स्त्री पुरुष

मोठ्या व्यक्तींच्या मानेवर किंवा हातावर किंवा जास्त करून पायांवर जे जाड कोरडे काळपट रंगाचे जुनाट इसब असतात तेही या आजारामुळे असू शकतात. काही व्यक्तींना गणपती दिवाळीला घर झाडले की अंगावर धुरळा किंवा जळमटे बसल्यामुळे उघड्या भागावरील त्वचेला भरपूर खाज येऊन पुरळ उठते. तसेच काही जणांना गवत कापलं, शेतातला पेंढा हाताळला, किंवा बरेच दिवस कपाटात ठेवलेला स्वेटर  किंवा एखादा ड्रेस घातला की अंगाला खाज येते.

हेही वाचा… Health Special: अल्कलीयुक्त पाणी घरच्या घरी कसे कराल?

हेही अटोपिक डर्मेटायटिसचे लक्षण असते. काही व्यक्तींना विशेषतः स्त्रियांना हाताला मिरची, मसाला, कांदा, लिंबाचा रस, वेगवेगळ्या भाज्या, कपड्या – भांड्यांचा साबण, डिटर्जंट, फिनेल इत्यादींचा संपर्क झाल्यास हात कोरडे पडतात. त्यांना चिरा पडतात व ते लाल होऊन भरपूर खाज येते. याला हाताचा इसब ( Hand Eczema किंवा Housewife Eczema ) म्हणतात व तेही अटोपिक डर्मेटायटिसचे लक्षण असते. अटोपिक  डर्मेटायटिस असलेल्या रुग्णाची त्वचा पिकण्याची व जडावण्याची शक्यताही जरा जास्त असते व त्यामुळे जिथे आधीच खाजरे पुरळ आहे तिथे पिकलेल्या फोडी येणे व लस किंवा पू वाहणे असेही कधी कधी होऊ शकते.

घरगुती उपाय व काळजी

या आजारात त्वचा कोरडी असते. त्यामुळे हा आजार असलेल्या तान्ह्या मुलांना दोनदा टब मध्ये कोमट पाण्यात बसवणे हे फार महत्वाचे आहे. तसेच मोठ्यांनी देखील त्यांचे हातपाय पाच मिनिटे पाण्यात बुडवावे. त्यानंतर हलक्या हाताने टिपून लगेच मॉइश्चरायझर लावावे. दिवसातून तीन-चार वेळा मॉइश्चरायझर लावावे. आंघोळीला सौम्य साबण, उदाहरणार्थ पिअर्स , डव्ह किंवा SYNDET बार वापरावा. आंघोळीला कोमट पाणी वापरावे. धूळ, धूर, केमिकल्स, गवत, पेंढा, झाडे, झुडपे, रेती, माती, सिमेंट यापासून लांब रहावे. घराची साफसफाई करावी लागणार असेल तर संपूर्ण अंग कपड्याने झाकून घ्यावे. हातात रबरी हातमोजे घालावेत. चेहऱ्यावर कपडा बांधावा.

हेही वाचा.. Health Special: भिडस्तपणा हा मनोविकार आहे का?

जे शक्य आहे ते ओल्या फडक्याने पुसावे. चादरी व उशीचे अभ्रे वारंवार धुऊन गरम पाण्यातून काढावीत. काही दिवस घर बंद असल्यास रुग्णाव्यतिरिक्त कोणीतरी गादी काठीने बडवून तिच्यावर इस्त्री मारावी जेणेकरून तिथले धुळीतील जंतू मरतील. वुलन, नायलॉन व अतिखरखरीत कपडे टाळावेत. अंगावर घाम राहिल्यास त्यामुळेही अशा व्यक्तींना खाज येते. त्यामुळे हवा दमट व उष्ण असल्यास शक्यतो पंख्याखाली किंवा एअर कंडिशनमध्ये राहावे, तसेच घाम आल्यास लगेच नरम कपड्याने पुसावा. ज्यांना हाताला हा आजार आहे त्यांनी हॅण्डवॉश किंवा सॅनिटायझर टाळावे व अशा व्यक्तींनी स्वयंपाक करताना डॉक्टर वापरतात तसे लॅटेक्सचे हातमोजे वापरावेत. भांडी घासावी लागल्यास कोपरापर्यंत रबरी मोजे वापरावेत.

डॉक्टरी उपचार

त्वचारोगतज्ज्ञ या आजारासाठी मॉइश्चरायझर तसेच आजाराचे स्वरूप पाहून कमी अधिक तीव्रतेची स्टिरॉइडची मलमे लिहून देतात. ही स्टिरॉइडची मलमे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व त्यांनी सांगितलेल्या कालावधीसाठीच वापरणे आवश्यक आहेत, कारण त्यांचेही दुष्परिणाम असतात. तसेच खाज कमी करण्यासाठी डॉक्टर अँटी-हिस्टॅमिनिक्स गोळ्या देतात. तसेच खाजेमुळे जंतूंचा संसर्ग होऊन खट / फोडी झाली असल्यास डॉक्टर अँटिबायोटिक लिहून देतात.

आजाराचे स्वरूप जास्त असल्यास व अंगभर आजार असल्यास डॉक्टर्स तोंडावाटे घेण्यासाठी स्टिरॉइडस तसेच प्रतिकारशक्तीवर प्रभाव टाकणारी काही औषधे ( उदा. Azathioprine, Cyclosporine इ.) लिहून देतात. समाजात जेवढी जागरूकता दमा किंवा ॲलर्जीच्या सर्दीबद्दल आहे तेवढी या अटोपिक डर्मेटायटिस किंवा अतीसंवेदनशील त्वचेच्या आजाराबद्दल नाही. त्या आजारांप्रमाणेच हा आजारही समाजातील बऱ्यापैकी लोकांना होतो. योग्य ती काळजी घेतल्यास हा आजार बऱ्यापैकी नियंत्रणात राहू शकतो.