What is Cockroach Milk: सुपरफूड्स त्यांच्या अतिउत्तम पौष्टिक मूल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर ओळखले जातात, ज्यामध्ये बेरी, नट्स व पालेभाज्या यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. पण, या सगळ्यात आता एक आश्चर्यकारक नवा प्रतिस्पर्धी समोर आलेला आहे ते म्हणजे झुरळाचे दूध. जरी हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी संशोधकांनी या पदार्थाला आतापर्यंत सापडलेल्या सर्वांत पोषक घटकांपैकी एक म्हणून मानलं आहे.
पण झुरळांचं दूध हे प्रत्यक्षात दूध नसतं – तो एक पिवळसर द्रव असतो, जो झुरळांच्या पिल्लांच्या पोटात क्रिस्टिलाईज होतो. पॅसिफिक बीटल झुरळ (Diploptera punctata) पासून मिळवलेले हे दुधासारखे स्राव प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ल आणि चांगल्या साखरेने भरलेले असतात.
‘जर्नल ऑफ द इंटरनॅशनल युनियन ऑफ क्रिस्टलोग्राफी’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, झुरळाचं दूध म्हशीच्या दुधापेक्षा तिप्पट ऊर्जा प्रदान करतं, जे एकेकाळी सर्वांत जास्त कॅलरी असणारं दूध मानलं जात होतं. “क्रिस्टिलाइन फॉर्ममध्ये अन्न साठवल्याने केवळ उच्च एकाग्रतेत (high concentration) अन्न साठवता येत नाही, तर आवश्यकतेनुसार पोषक घटकांचे नियंत्रित प्रकाशनदेखील होते. या इन विवो-ग्रोव्हन (सजीव शरीरात वाढलेल्या) प्रोटीन क्रिस्टल्सची आण्विक रचना समजून घेतल्याने थर्मोडायनॅमिक्स (क्रिस्टल पॅकिंग) व कायनेटिक्स (क्रिस्टल आणि द्रावण स्थिती यामधील समतोल) या तत्त्वांचा उत्कृष्ट वापर कसा केला जातो हे समजून घेता येतो,” असे त्यांनी नमूद केले.
शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की, उत्पादनाशी संबंधित अडचणी सोडवल्या, तर झुरळांचे दूध भविष्यामध्ये शाश्वत पोषणासाठी एक पर्याय बनू शकतो.
झुरळांचे दूध हे भविष्यातील सुपरफूड आहे का? पचनक्षमता आणि आरोग्यदायी फायद्यांमध्ये ते इतर पर्यायी प्रथिनांच्या तुलनेत कसे आहे?
कनिका मल्होत्रा, कन्सल्टंट डाएटिशियन व प्रमाणित डायबिटीज एज्युकेटर सांगतात की, झुरळांचे दूध त्याच्यातील अद्वितीय पौष्टिक रचनेमुळे इतर प्रथिन स्रोतांपेक्षा वेगळे आहे. “पॅसिफिक बीटल झुरळांनी तयार केलेल्या त्याच्या प्रथिन क्रिस्टल्समध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले असतात आणि पचनक्रियेदरम्यान हळूहळू पोषक घटक सोडतात, ज्यामुळे कायमस्वरूपी ऊर्जा मिळते. हा एक मुख्य फरक आहे झाड किंवा व्हे प्रोटिन्सच्या तुलनेत, जे लवकर पचतात,” असं त्या म्हणतात.
म्हशीच्या दुधापेक्षा तिप्पट आणि गाईच्या दुधापेक्षा चार पट जास्त कॅलरीज असलेले झुरळांचे दूध प्रथिने, फॅट्स, ग्लायकोसायलेटेड शर्करा, ओलेइक व लिनोलिक अॅसिड यांसारख्या आवश्यक फॅटी अॅसिडने समृद्ध असते, जे पेशींच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी महत्त्वपूर्ण असतात.
संशोधकांनी त्याच्या पौष्टिक गुणधर्म आणि शाश्वततेच्या शक्यतेमुळे त्याला सुपरफूड मानलं आहे. दुग्धोत्पादनाच्या तुलनेत, झुरळांच्या शेतीला जागा आणि पाण्याची कमी गरज असते. “ज्या लोकांना लॅक्टोज सहन होत नाही, त्यांच्यासाठी लॅक्टोजमुक्त आणि त्यातील हायपोअलर्जेनिक गुणधर्म झुरळांच्या दुधाला आकर्षक ठरवतो; पण नैतिक चिंता व उत्पादनातील अडचणी उपलब्धता मर्यादित करतात,” असे मल्होत्रा सांगतात.
तथापि, त्या मान्य करतात की, अनेक लोकांना मानसिक अडचणी येऊ शकतात. “झुरळांचे दूध अन्न म्हणून मानणं थोडं विचित्र वाटतं! हा वेगळा प्रोटिन स्रोत आपल्याला पोषण आणि शाश्वततेबद्दलचे विचार बदलायला भाग पाडतो.”
या प्रकारचे दूध मानवी वापरासाठी सुरक्षित आहे का?
सध्या झुरळांचं दूध मानवी वापरासाठी सुरक्षित मानले जात नाही. मल्होत्रा त्याच्या सुरक्षिततेवर विशेषतः संभाव्य अॅलर्जी आणि दूषित होण्याच्या जोखमींबद्दल संशोधनाची कमतरता सांगतात. “त्याच्या सुरक्षिततेची पुष्टी करण्याच्या दृष्टीनं पुरेसं संशोधन झालेलं नाही, ज्यामुळे तो एक धोकादायक पर्याय आहे. विशेषतः गर्भवती व्यक्ती किंवा शेलफिशची अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी,” असं त्या म्हणतात.
झुरळांचं दूध सुरक्षित करण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञांकडून नावीन्यपूर्ण उपायांचा शोध
लॅबमध्ये तयार करणे : यीस्ट किंवा सूक्ष्म जीवांचा जनुक अभियांत्रिकी करून झुरळांच्या दुधातील प्रोटीन्स तयार करणे, त्यामुळे कीटक काढण्याची आवश्यकता नाही.
सुरक्षा चाचण्या : अॅलर्जीक रिअॅक्शन आणि दीर्घकालीन आरोग्य परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी व्यापक मानवी अभ्यास.
कडक गुणवत्ता नियंत्रण : शुद्धता सुनिश्चित करणे आणि हानिकारक रोगाणू दूर करणे.
मल्होत्रा यांना ही संकल्पना आकर्षक वाटते; पण त्या मान्य करतात की, अजूनही महत्त्वाचे अडथळे आहेत.
“झुरळांचे दूध विचित्र वाटू शकते; परंतु पौष्टिकतेने समृद्ध पर्याय म्हणून त्याची क्षमता निर्विवाद आहे. तथापि, जोपर्यंत आपण सुरक्षितता आणि नैतिक चिंता सोडवू शकत नाही तोपर्यंत ते व्यावहारिक अन्नस्रोतापेक्षा वैज्ञानिक कुतूहलच राहील.”