२०२० मध्ये, संपूर्ण जगाने वैद्यकीय शब्दसंग्रहाचा एक वेगवान अभ्यासक्रम अनुभवला. आरटी-पीसीआर, अँटीजेन, अँटीबॉडी आणि पीपीई किट यासारख्या संज्ञा, ज्या एकेकाळी केवळ शास्त्रज्ञांना परिचित होत्या, त्या दैनंदिन चर्चेत आल्या. सप्टेंबर २०२४ पर्यंत फास्ट फॉरवर्ड केल्यास, एका सुप्रसिद्ध फास्ट-फूड चेनमधील बर्गरचा समावेश असलेल्या दूषित घटनेने E. coli (ई. कोलाई) जागतिक संभाषणात आले. अगदी अलीकडे, फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या समारोपाच्या टप्प्यात, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) गंगा नदीमध्ये मल कोलिफॉर्मची उपस्थिती नोंदवली. या लेखाचा उद्देश त्या अहवालाचे विश्लेषण करणे हा नाही, तर कोलिफॉर्म्सच्या तांत्रिक विषयाचे अन्वेषण करणे हा आहे, ते काय आहेत आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचे का आहेत, ते पाहूयात.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

कोलिफॉर्म जीवाणू म्हणजे काय?

मानवी केसांचा सरासरी व्यास अंदाजे 100 मायक्रोमीटर आहे. या जाडीमध्ये, 40 ते 100 जीवाणू गुण्यागोविंदाने नांदू शकतात. कोलिफॉर्म्स हे लांब, दंडगोलाकार जीवाणू सुमारे 2 ते 3 मायक्रोमीटर लांबीचे असतात आणि त्यात अनेक प्रजातींचा समावेश आहे. हे सूक्ष्मजीव माती, वनस्पती आणि प्रामुख्याने मानव आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतात. कोलिफॉर्म्स स्वतःहून हानीकारक नसले तरी, पाण्यातील त्यांची उपस्थिती हा एक महत्त्वाचा इशारा म्हणून काम करते – आग लागल्यास धुराचा अलार्म सक्रिय केल्याप्रमाणे, पाणी किंवा अन्नामध्ये कोलिफॉर्म आढळणे ही एक गंभीर चिंताजनक बाब आहे, जी मानवी किंवा प्राण्यांच्या विष्ठा संभाव्यतः दूषित असल्याचे दर्शवते. त्यातून रोगजनक सूक्ष्मजीव वाहून नेले जाऊ शकतात. जर मोठ्या संख्येने लोक कोलिफॉर्म्सने दूषित पाणी किंवा अन्नाच्या संपर्कात आले तर यामुळे गंभीर साथीचे रोग होऊ शकतात.

कोलिफॉर्म्सचे दोन मुख्य प्रकार

तज्ज्ञांच्या मते पाण्यात दोन प्रमुख प्रकारचे कोलिफॉर्म्स आढळतात :
१. एकूण कोलिफॉर्म्स (Total Coliforms):
एकूण कोलिफॉर्म जीवाणू सामान्यतः माती, वनस्पती आणि उष्ण रक्ताच्या सस्तन व काही थंड रक्ताच्या प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतात. या जीवाणूंचे प्रयोगशाळेत संवर्धन करणे तुलनेने सोपे आहे, ज्यामुळे ते रोगजनक जीवाणूंच्या उपस्थितीचे प्राथमिक निदर्शक बनतात. ते सहसा आरोग्यास धोका देत नसले तरी, त्यांची उपस्थिती सूचित करते की पाणी पुरेसे शुद्ध केले गेलेले नाही. एकूण कोलिफॉर्मच्या प्रमुख प्रकारांमध्ये सिट्रोबॅक्टर, एन्टरोबॅक्टर, क्लेब्सिएला, प्रोटीयस आणि हाफनिया सारख्या जीवाणू प्रजातींचा समावेश होतो.

२. मलजन्य कोलिफॉर्म्स (Fecal Coliforms):
हे कोलिफॉर्म्स तुलनेने उच्च तापमानात (४४.५°C) वाढण्याच्या क्षमतेमुळे एकूण कोलिफॉर्म्स गटापासून वेगळे केले जाऊ शकतात आणि ते केवळ उष्ण रक्ताच्या प्राण्यांच्या मलाशी संबंधित असतात. हे थेट माणसांच्या आणि प्राण्यांच्या आतड्यांमधून येतात. एस्चेरिचिया कोलाई (ई. कोलाई) हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध प्रतिनिधी आहे. पाण्यात ई. कोलाई आढळल्यास, त्याचा अर्थ म्हणजे ते पाणी मलमूत्र किंवा प्राण्यांच्या विष्ठेने दूषित आहे—अशा पाण्याचे सेवन करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. मलजन्य कोलिफॉर्म्स लॅक्टोज नावाच्या साखरेचे विघटन करून वायू निर्माण करतात. हे साधारण ४४.५°C तापमानात वाढतात, एकूण कोलिफॉर्म्स चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ३५–३७°C तापमानाच्या तुलनेत अधिक असते.
थोडक्यात जर पाण्यात कोलिफॉर्म जीवाणू आढळले, तर निसर्ग आपल्याला “सावध व्हा! हे पाणी सुरक्षित नाही!” असा इशारा देत असतो.

पाणी किती स्वच्छ असावे?

जगभरातील आरोग्य संस्थांनी पाण्यातील कोलिफॉर्म जीवाणूंच्या प्रमाणावर कठोर मर्यादा घातल्या आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी:

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, ई. कोलाई हा जीवाणू १०० मि.ली. पाण्यात शून्य असावा. जर तो आढळला, तर पाणी दूषित मानले जाते. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेने (Environmental Protection Agency, इपीए ) सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये एका महिन्यातील ५% नमुन्यांमध्ये एकूण कोलिफॉर्म्स सापडू नयेत, असे सूचित केले आहे.

विहारयोग्य पाण्यासाठी (तलाव, नद्या इत्यादी):

हे पाणी पिण्यासाठी नसल्याने नियम थोडे शिथिल आहेत. इपीए नुसार, ई. कोलाई चे प्रमाण १०० मि.ली. पाण्यात १२६ कॉलनी निर्माण करणाऱ्या एककांपेक्षा (Colony Forming Units, सी.एफ.यू ) जास्त नसावे, जर हे प्रमाण जास्त असेल, तर हे पाणी पोहण्यासाठी किंवा मासेमारीसाठी सुरक्षित नसते.

अर्थात ही कोणतीही परीक्षण पद्धती योग्य प्रयोगशाळेत आणि प्रशिक्षित सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांमार्फत केलेली असावी.

कोलिफॉर्म्स दूषण चिंतेचा विषय का आहे?

कोलिफॉर्म्स जीवाणू केवळ आरोग्यास धोका पोहोचवत नाहीत, तर आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण करतात.
आर्थिक परिणाम:
जर एखाद्या प्रसिद्ध हॉटेल किंवा खाद्यपदार्थ ब्रँडला दूषित पाणी किंवा अन्नामुळे संसर्ग झाल्याचे आढळले, तर त्याला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागतो. लोकांच्या विश्वासावरही परिणाम होतो.
पाणीपुरवठ्याचे संकट:
जर नळाच्या पाण्यात कोलिफॉर्म्स सापडले, तर प्रशासनाला पाणी उकळून पिण्याचा सल्ला द्यावा लागतो, ज्यामुळे पाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर ताण येतो आणि खर्च वाढतो.

कोलिफॉर्म्स शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती
पाण्यात कोलिफॉर्म्स जीवाणू आहेत का, हे शोधण्यासाठी काही विशेष चाचण्या वापरल्या जातात. या चाचण्या केवळ मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्येच केल्या जातात.
१. पटल गाळणी पद्धत (Membrane Filtration):
या पद्धतीत पाणी एका बारीक छिद्रांच्या गाळणीमधून सोडले जाते, त्यामुळे जीवाणू गाळणीवर अडकतात. नंतर या गाळणीला विशेष पोषक माध्यमावर ठेवल्यास कोलिफॉर्म जीवाणू वाढून दृश्यमान वसाहती तयार करतात.
२. बहु-नलिका किण्वन पद्धत/महत्तम संभाव्य संख्या (MPN Method – Most Probable Number):
या पद्धतीत पाण्याचे नमुने एका विशिष्ट पोषक द्रव्यात टाकले जातात. जर कोलिफॉर्म्स असतील, तर ते वायू तयार करतात व द्रव्यात रंगबदल होतो. किती नलिकांमध्ये हे आढळले यावरून त्यांच्या संख्येचा अंदाज घेतला जातो.
३. एन्झाइम सब्सट्रेट चाचणी (Enzyme Substrate Test):
या जलद चाचणीत, वैज्ञानिक पाण्यात विशिष्ट रसायन टाकतात. जर कोलिफॉर्म्स उपस्थित असतील, तर पाणी रंग बदलते किंवा UV प्रकाशाखाली चमकते.

पाण्याच्या सुरक्षिततेचे नियमन कोण करते?

पिण्याचे पाणी सुरक्षित असावे, यासाठी संबंधित संस्थांनी कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. भारतात, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, ही पाण्याच्या गुणवत्तेची मानके निश्चित करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असलेली प्राथमिक संस्था आहे, तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (Bureau of Indian Standards, BIS) पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करते.

निष्कर्ष: स्वच्छ पाणी आपली जबाबदारी!

कोलिफॉर्म्स जीवाणू हे निसर्गाचे पाण्याच्या स्वच्छतेविषयी दिलेले इशारे आहेत. त्यांचे अस्तित्व म्हणजे पाणी दूषित आहे आणि रोगांचा धोका आहे. म्हणूनच, नियमित पाणी चाचणी, कठोर सुरक्षा नियम, आणि योग्य शोध तंत्रज्ञान यांचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.

शुद्ध पाणी हा मानवाचा फक्त विशेषाधिकार नाही, तर तो एक मूलभूत हक्क आहे!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is coliform bacteria how much its percentage is bad for water psp