नेत्रपटल हे संवेदनाक्षम पेशींनी बनलेले असते. प्रकाश आणि प्रतिमा, संवेदना या पेशींमधून नेत्रचेता मार्फत (डोळयाची नस) सरळ मेंदूकडे पोचतात. हे नेत्रपटल अतिरक्तदाब आणि मधूमेह या दोन आजारात खराब होते व त्यामुळे अंधुक दिसते. म्हणूनच या दोन्ही आजारात नियमितपणे नेत्रपटलांची तपासणी करावी लागते. यासाठी डॉक्टर फंडोस्कोप नावाचे बॅटरीसारखे एक छोटे यंत्र वापरतात.
नेत्रपटल सुटणे
नेत्रपटल आपल्या जागेवरून सुटून डोळयामध्ये सरकण्याचा एक आजार असतो. याला आपण नेत्रपटल सुटणे असे म्हणू या. या आजाराची विविध कारणे आहेत. मुख्य लक्षण म्हणजे डोळयाच्या काही भागात अंधारी येणे व दृष्टीचे क्षेत्र कमी होणे.
यावर लेझर शस्त्रक्रियेचा चांगला पर्याय आता उपलब्ध आहे. नेत्रतज्ज्ञांमध्ये आता नेत्रपटल-तज्ज्ञांची वेगळी शाखा विकसित झाली आहे.
अपूर्ण वाढ झालेल्या नवजात बालकांमधील नेत्रपटलदोष
अर्भकाच्या नेत्रपटलाची संपूर्ण वाढ होण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो.
आठ महिन्यांआधी जन्मास आलेल्या अर्भकाचे नेत्रपटल कमजोर असते. नेत्रपटलावरील रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण झालेली असते. जन्मानंतर अपूर्ण वाढ झालेल्या रक्तवाहिन्यांची वाढ होताना ती दोषपूर्ण होते व दोषपूर्ण रक्तवाहिन्यांचे एक जाळे तयार होते. या सदोष रक्तवाहिन्या नेत्रपटलास नैसर्गिक रक्तपुरवठा करू शकत नाहीत व या रक्तवाहिन्यांच्या वाढीमुळे मागचा पडदा निसटू शकतो.
नेत्रपटलदोषाची कारणे
जन्मत: बाळाचे वजन कमी असणे (दीड किलोपेक्षा कमी)
जन्मत:च इतर आजार असणे (फुप्फुसाचे आजार, इ.)
बाळाची नेत्रतपासणी कधी करावी?
प्रथमत: जन्माच्या दोन ते तीन आठवडयानंतर व तेव्हापासून पुढे रक्तवाहिन्यांची संपूर्ण वाढ होईपर्यंत नेत्रतज्ज्ञांकडून नेत्रपटलाची संपूर्ण तपासणी करावी.
उपचार
रक्तवाहिन्यांमधील दोषाचे प्रमाण कमी असेल तर हा दोष आपोआपच नाहीसा होतो. दोषाचे प्रमाण जास्त असेल तर सदोष रक्तवाहिन्यांची वाढ होऊ नये यासाठी लेसर उपचार करावा लागतो. लेसर उपचाराने पडदा निसटण्याची शक्यता कमी होते. दोषाचे प्रमाण जास्त असेल तर पडदा निसटतो व यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार करावा लागतो. परंतु शस्त्रक्रिया करूनही दृष्टी पूर्ववत होण्याची शक्यता कमी असते.
उपचारानंतर पाठपुराव्याची गरज आहे का?
उपचारानंतरही कधीकधी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी नेत्रपटलाची तपासणी होणे गरजेचे आहे.
आजाराचे दूरगामी परिणाम
चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता जास्त असते.
कमजोर राहिलेला डोळा आळशी बनतो.
तिरळेपणा
दोषाचे प्रमाण जास्त असल्यास अंधत्वही येऊ शकते. उपचाराने अंधत्व येण्याची शक्यता कमी होते. परंतु ही शक्यता संपूर्णपणे टाळता येत नाही