डॉ. विभावरी निगळे
आतापर्यंत आपण ह्या सदरातून विविध त्वचारोगासंबंधी माहिती करून घेतली. हे शतक आहे सोशल मीडियाचे. आपली प्रत्येक छबी व केलेली कृती फोटो द्वारे या मीडियावर प्रसारित करण्याचे. त्यामुळे बाह्य सौंदर्याला अतोनात महत्त्व आले आहे. त्यातूनच कॉस्मेटॉलॉजी किंवा सौंदर्य वृद्धीशास्त्र या उपशाखेचा जन्म झाला. कॉस्मेटॉलॉजी हा इंग्रजी शब्द ग्रीक भाषेतील कॉस्मेटस या शब्दावरून तयार झालेला आहे. कॉस्मेटॉस चा अर्थ आहे इन ऑर्डर अथवा सुव्यवस्थेत (असणे). कॉस्मेटॉलॉजी म्हणजे सौंदर्य वृद्धीची कला किंवा आचरण पद्धती. कॉस्मेटॉलॉजी त्वचा, केस व नखे या शरीरावरील आवरणाची काळजी घेऊन जतन करणारी, असलेले सौंदर्य टिकवणारी, ते वृद्धिंगत करणारी, त्यात काही खोट अगर कमतरता असेल तर ती सुधारणारी अशी त्वचा रोगाची उपशाखा आहे. सौंदर्यशास्त्र हे भारतात पुरातन काळापासून अस्तित्वात होते. चंदनाचा लेप, केशर युक्त दुधाची अंघोळ , चेहऱ्याला काकडी किंवा लिंबाचा रस लावणे हे त्या काळातले राजमान्य उपाय होते. आज ही सेवाशाखा कला आणि शास्त्र यांचा संगम आहे.
ही सेवा पुरविणारे कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा सौंदर्यशास्त्र तज्ञ कोण असतात?
हल्ली ब्यूटी सलूनच्या पाट्या तर आपण गल्लोगल्ली पाहतो. ब्युटी सलून हे प्रसाधनांच्या साहाय्याने व काही पद्धतींचा वापर करून सौंदर्यात व नीटनेटकेपणात भर घालतात. उदाहरणार्थ केस रंगवणे, केस कापणे, त्यांना विविध आकार देणे, फेशियल करणे, वॅक्सिंग मॅनिक्युअर पेडिक्युअर करणे इत्यादी. सौंदर्यशास्त्रतज्ञ हे त्वचारोग तज्ञ डॉक्टर असावे लागतात. त्यामुळे वर दिसणाऱ्या त्वचेच्या आतील सर्व शरीराचे व त्याच्या कार्यपद्धतीचे त्यांना ज्ञान असावे लागते. शरीराच्या सर्व अवयवांचा आणि संस्थांचा एकमेकांशी असलेला संबंध व त्यांचे एक दुसऱ्यावर होणारे परिणाम, तसेच उपचारांचा त्वचेवर होऊ शकणारा परिणाम व दुष्परिणाम याची त्यांना समज असावी लागते.
एक छोटेसे उदाहरण देते. स्त्रियांना चेहऱ्यावर काहीवेळा पुरुषांसारखे राठ केस येतात. याची कारणे दडलेली असतात शरीरातील संप्रेरकांच्या गडबडीत. हे ज्ञान नसेल तर आपण नुसतेच हे केस काढण्याचा उपाय करत राहू. हा कायमस्वरूपी इलाज नाही. म्हणजे केस काढण्याच्या विविध उपचार पद्धती बरोबर त्यामागचे मूलभूत कारण शोधून त्यावर उपाय करणे हे कॉस्मेटॉलॉजिस्टचे काम आहे.
सौंदर्य वृद्धीशास्त्रात कोणत्या गोष्टी अंतर्भूत होतात?
त्वचा : त्वचेचा रंग, टोन, टेक्सचर त्यावरील तीळ, चामखीळ, सुरकुत्या, मुरमे व खड्डे , अपघाताचे व्रण या सर्व बाबींचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करणे.
केस : काळे भोर किंवा विविधरंगी, दाट, चमकदार, सरळ किंवा कुरळे केस उत्तम मानले जातात, कोरडे, विरळ केस आणि टक्कल यामुळे माणसाच्या स्वप्रतिमेला धक्का पोहोचतो.
नखे : तुटकी, कोरडी नखे माणसांना हस्तांदोलन करण्यापासून परावृत्त करतात.
कॉस्मेटोलॉजिस्ट या सर्व त्रुटींवर उपचार करून स्त्रिया व पुरुष दोघांचेही बाह्यरूप सुधारतात आणि खुलवतात.
सौंदर्यवृद्धीसाठी कोणते उपाय योजले जातात?
सर्वप्रथम त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक असते. तिला असणाऱ्या व्याधी, ती घेत असलेली इंग्लिश अथवा देशी औषधे मलमे, सौंदर्यप्रसाधने, घरगुती उपचार यांची सविस्तर नोंद कॉस्मेटोलॉजिस्ट घेतात. त्या त्या पेशंटच्या रूपामधल्या खटकणाऱ्या बाबी समजून घेऊन मग तिची संपूर्ण तपासणी केली जाते. गरज पडल्यास काही रक्त तपासण्या किंवा सोनोग्राफी यांचीही मदत घेतली जाते. त्यानंतर योग्य उपाययोजना सुचविल्या जातात.
या उपायांचे स्वरूप काय असते, सर्व उपाय खर्चिक असतात का?
सर्वप्रथम औषध उपचाराद्वारे दोष सुधारण्यावर भर दिला जातो. त्याला जोड दिली जाते विविध आधुनिक उपचार पद्धतींची. उदाहरणार्थ, हेअर ट्रान्सप्लांट, लेझर हेअर रीमूव्हल, केमिकल पील्स वगैरे. सर्व उपाय खर्चिक नसतात, अत्याधुनिक मशीनद्वारे केले जाणारे उपचार थोडे महाग असतात. परंतु हल्ली सरकारी व महानगरपालिका रुग्णालयांमध्ये देखील या उपचारांची सोय केलेली आहे.
आपण या लेखमालेत सौंदर्यातील विविध उणीवांची ओळख करून घेणार आहोत. त्यावरचे उपचार, त्यांचे फायदे आणि उपचारांच्या मर्यादा जाणून घेणार आहोत. खूपदा आमच्याकडे येणाऱ्या लोकांच्या अवास्तव अपेक्षा असतात. जसे की संपूर्ण टक्कल पडलेल्या माणसाला भरपूर केस येणे किंवा विसाव्या वर्षी पडलेल्या मुरमांच्या खड्ड्यांना 45 व्या वर्षी समूळ नष्ट करून चेहरा नितळ करणे वगैरे. अशावेळी त्यांची मानसिकता समजून घेणे, त्यांना खोटी आश्वासने न देता पर्याप्त निष्पन्न स्वीकारण्यास त्यांचे मन वळविणे हे नाजूक काम असते.
“या जगात शाश्वत असे काहीच नसते”, या उक्तीप्रमाणे सौंदर्याची जोपासना ही सातत्याने अंमलात आणावयाची बाब आहे. जोपर्यंत तुम्ही काळजी घ्याल तोपर्यंतच तुमचे सौंदर्य टिकेल. ज्या दिवशी ही काळजी घेणे तुम्ही बंद कराल त्या दिवसापासून काळ आपल्या खुणा तुमच्या त्वचेवर पुन्हा उमटवीत जाईल.
आपण पुढील काही आठवडे या संबंधीच्या विविध बाबींची माहिती करून घेणार आहोत.