इंटरनेटच्या जगात आणि किशोरवयीन मुलांच्या राज्यात लिंगभेद असतो का? दिसतो का? किशोरवयीन मुलामुलींचं त्याविषयी काय मत आहे हा माझ्यासाठी अतिशय कुतूहलाचा विषय राहिला आहे. कारण इंटरनेट माणसामाणसात जात, धर्म आणि लिंग भेद करत नसला तरी वापरणारे खऱ्या आयुष्यतले सगळे भेद, घेऊनच इंटरनेटच्या जगातही वावरतात. बायकांनी काही लिहिलं की त्यांना ट्रोल करणारे खऱ्या आयुष्यतही अनेकदा त्यांच्या आजूबाजूच्या बायकांना निरनिराळ्या पद्धतीने ट्रोल करतच असतात. जातीधर्माचा भेद मानणारे, श्रेष्ठत्वाच्या गर्व बाळगणारे, तसं उघड लिहिणारे खऱ्या आयुष्यतही तसेच असतात. काहीवेळा स्त्री पुरुष समानता सोशल मीडियावर मानणारे प्रत्यक्ष आयुष्यात घरगुती हिंसा करणारे आणि बायकांना कमी लेखणारे किंवा उपभोग्य वस्तू मानणारे असतात. मोठ्यांच्या जगात असे अनेक प्रकार सहज बघायला मिळतात. किशोरवयीन मुलांच्या ऑनलाईन जगात नेमकं काय सुरु आहे हे शोधण्याचा प्रयत्न केल्यावर मोठ्यांच्याच जगाचं प्रतिबिंब तिथेही बघायला मिळतंय. एकमेकांना जात, धर्म, पंथ यावरुन ट्रोल करणारे, मुलींना कमी लेखणारे, त्यांना उपभोग्य वस्तू मानणारे किशोरवयीन तरुण या जगात सहज सापडतात. हे सगळं न मानणारे मोठे जसे असतात तसेच हे सगळे न मानणारे किशोरवयीन ही आहेत. पण आपला एका सर्वसाधारण समज असतो की मुलांच्या जगात जाती-धर्म -स्त्री पुरुष असलं काही नाहीये..त्यांच्या मनातही ते येत नाही, इतके ते निरागस असतात. तर ही गोष्ट अगदी लहान मुलांच्या बाबतीत कदाचित खरी असू शकते, पण किशोरवयीन मुलामुलींच्या बाबतीत मात्र नाही. तिथे मोठ्यांच्या जगाची मोठी आणि गडद छाया मुलांच्या जगावर पडलेली आहे आणि ती काही चांगली गोष्ट नाही. मोठ्यांच्या जगाने ज्या अनेक चुका करुन ठेवल्या आहेत त्यातली ही एक फारच मोठी आणि चटकन सुधारणार नाही अशी चूक आहे.
आणखी वाचा: Mental Health Special: मुलांच्या मोबाइल वापरासाठी नियम असावेत का?
माध्यमांवर सहज एक फेरफटका मारला तर अनेक स्त्रिया समाज माध्यमे वापरताना दिसतात. तिथे लिहिताना आणि स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यावरुन भारतात मुली व महिला मोठ्या प्रमाणात सायबर स्पेसमध्ये आहेत आणि समाज माध्यमे वापरतात असा कुणाचाही समज होण्याची शक्यता आहे. पण आपल्या देशाची एकूण लोकसंख्या बघता त्या अनुषंगाने विचार केला तर आजही सायबर स्पेस आणि समाज माध्यमांवर पुरुषांचाच वावर सर्वाधिक आहे. आणि तंत्रज्ञान वापरात मोठ्याप्रमाणावर असमानता दिसून येते आहे. युनिसेफच्या वतीने २०१७ मध्ये एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. त्यानुसार, भारतात सोशल मीडियात आजही पुरुषांची मक्तेदारी आहे. ग्रामीण भागातल्या तरुणींना माहिती तंत्रज्ञानाच्या वापरापासून रोखलं जातं कारण त्या स्त्रिया आहेत. युनिसेफच्या म्हणण्यानुसार, माहिती तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत आणि ते स्त्री-पुरुष सगळ्यांना मिळायला हवेत. पण तसं होताना दिसत नाहीये. स्त्रियांना त्या निव्वळ स्त्रिया आहेत म्हणून माहिती तंत्रज्ञानापर्यंत पोचू दिलं जात नाहीये ही वस्तुस्थिती आहे. ‘वी आर सोशल’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की भारतात फेसबुक वापरणाऱ्या पुरुषांची संख्या ७६ टक्के आहे आणि स्त्रियांची संख्या २४ टक्के आहे. २०२०च्या आकडेवारीनुसार भारतात प्रौढ स्त्रियांच्या लोकसंख्येच्या २५ टक्के स्त्रियांकडे स्वतःचे मोबाईल फोन्स होते तर प्रौढ पुरुषांच्या लोकसंख्येच्या ४१ टक्के पुरुषांकडे स्वतःचे मोबाईल फोन्स होते. मोबाईल, इंटरनेट या गोष्टींची उपलब्धता शहरी भागात ५१ टक्के तर ग्रामीण भागात २९ टक्के आहे. अशात मोबाईलवर, इंटरनेटवर खर्च करायचाच असेल तर तो पुरुषासाठी करायचा, स्त्रीसाठी नाही हा विचार आजही घराघरातून शाबूत असल्याचं नोंदवलं जातंय. त्यातल्या त्यात गोवा, केरळ, पश्चिम बंगाल, पूर्वेकडील सात राज्ये, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा इथे हा डिजिटल लिंगभेद कमी प्रमाणात दिसतो.
आणखी वाचा: Mental Health Special: तुमची मुलं इंटरनेटवर ‘हे’ सर्च करतात का?
डिजिटल लिंगभेद कशापद्धतीने मनात आणि समाजात रुजलेला आहे याचं एक उदाहरण कामाच्या निमित्ताने दिसून आलं. एका शहरातल्या प्रतिष्ठित महाविद्यालयातील मुलींशी झालेला संवाद. या महाविद्यालयात मुली आणि मुलांची होस्टेल्स आहेत. त्यातही मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलांना मोबाईल वापराची परवानगी आहे, पण मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती नाही. असं का, तर मुली मुलांशी मोबाईलवर बोलत बसतील, अफेअर्स करतील, पॉर्न बघतील, बिघडतील, जे पालकांना आणि महाविद्यालयीन प्रशासनाला अजिबात नको आहे. पण हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलग्यांनी तेच केलं तर त्यावर मात्र पालक आणि महाविद्यालयाची हरकत नाहीये. किंवा त्याविषयी काही म्हणणंच नाहीये. मुलांकडे मोबाईल हवाच ही मानसिकता पालक आणि प्रशासन सगळ्यांचीच आहे. त्यामुळे हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलींकडे मोबाईल नाही पण मुलांकडे आहे.
असाच अनुभव प्रार्थमिक मधल्या मुलींच्या गटाबरोबर काम करताना घेतला. चौथीपाचवीतल्या मुली त्यांच्याच एका मैत्रिणीला ‘डॉल गेम’ न खेळता ‘कार गेम’ खेळते म्हणून चिडवत होत्या. त्यानिमित्ताने मुलांच्या गेमिंगच्या जगात डोकावून बघितलं की त्यात मुलांचे गेम्स आणि मुलींचे गेम्स अशी सरळ विभागणी बघायला मिळते. मुलींमध्ये बार्बी डॉलवाले, मेकअप-फॅशन-ब्युटीपार्लर-कपडेपट यांच्याशी संबंधित, गृहसजावटीचे आणि कँडी क्रशसारखे खेळ सर्वसाधारणपणे लोकप्रिय आहेत; तर मुलांमध्ये रेसिंगचे, धाडसी, हाणामारीवाले, सिव्हिलायझेशन, वॉर गेम्सचा समावेश असतो. मुलं जसजशी गेमिंगच्या दुनियेत शिरतात; तसतसा त्यांना मुलांचे गेम्स आणि मुलींचे गेम्स हा भेद जाणवायला लागतो. इथेही पिंक आणि ब्ल्यू यांचं भांडण आहे आणि हा फरक बाकी काही समजायच्या आत मुलांना कळायला लागतो.
मोठ्यांच्या जगातले समाज गैरसमज, धारणा, कल्पना, किशोरवयीन मुलांच्या किंवा त्यापेक्षाही लहान वयाच्या मुलांच्या समाजमनावर आघात करता आहेत. संपूर्ण इंटरनेट ही मोठी बाजारपेठ आहे, मुलं या बाजारपेठेचं सगळ्यात पहिलं लक्ष्य आहेत. कुटुंबव्यवस्थेवर, स्त्री-पुरुषांच्या भूमिकांवर बाजारपेठेतल्या ट्रेंडचे काय परिणाम होतात; याचा विचार ही बाजारपेठ करत नाही. तो पालकांनी/ शिक्षकांनी/ मोठ्यांच्या जगणेच करायला हवा. पण मोठ्यांचं जग भेदाभेद करण्यात, ट्रोलिंग करण्यात गुंतलेले असेल तर मुलांच्या जगापर्यंत काय पोचतं आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, आपण काय विचारधारेची पिढी तयार करतो आहोत, आपण आपल्या मुलांना कसं वातावरण देऊन जाणार आहोत हा सगळाच विचार मागे पडतो.
अशावेळी, काही मूठभर किशोरवयीन मुलंमुली या सगळ्या विरोधात त्यांच्या समवयीनांशी बोलताना दिसतात, त्यांचा आवाज क्षीण न होवो, एवढीच आपण प्रार्थना करु शकतो.