Dry Eyes Disease: Causes, Symptoms, and Prevention Tips : पंचेचाळीस वर्षांच्या श्रुतीला हे माहीत नव्हते, “लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्याने आणि मोबाईलचा सतत वापर केल्याने तिच्या डोळ्यांवर इतका परिणाम होईल की, तिला योग्य अंतराने कोमट पाण्याने डोळे धुवावे लागतील आणि किमान २० सेकंद डोळे मिचकवावे लागतील. आय ड्रॉप वापरल्यानंतरही तिच्या डोळ्यांवरील ताण वाढला आणि अखेर तिला ड्राय आय डिसीज (DED)चे निदान झाले. ड्राय आय डिसीज (DED) ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये तुमचे डोळे संरक्षक थर तयार करण्यासाठी पुरेसे अश्रू निर्माण करू शकत नाहीत.
डोळे सतत लाल होणे, डोळ्यांची आग होणे व खाज सुटणे, प्रकाशासाठी डोळे संवेदनशील होणे, डोळ्यांवर दबाव व डोळ्यांचा थकवा यांमुळे तिला खूप त्रास झाला. त्यानंतर ती पुण्यातील कम्युनिटी आय केअर फाउंडेशनमधील नेत्र शल्यचिकित्सक व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. परीक्षित गोगटे यांच्या क्लिनिकमध्ये गेली. आता श्रुती तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या आय व्हिटॅमिन सप्लिमेंट्स (eye vitamin supplements) घेत आहे आणि तिच्या डोळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घेते. ऑनलाइन काम पूर्ण केल्यानंतर ती विश्रांती घेते, डोळ्यांच्या स्नायूंना आराम देण्यासाठी काही वेळ वरच्या दिशेला पाहते, जाणूनबुजून डोळे मिचकावते आणि थोडे पाणी पिते.
रुग्णांना त्यांच्या ड्राय आय सिंड्रोमची जाणीव का नसते(Why patients might not be aware of their dry eyes syndrome)
“श्रुती ही अशा अनेक लोकांपैकी एक आहे, ज्यांना ड्राय आय डिसीज (DED) आहे. कारण- ते मोबाईल, लॅपटॉपसारख्या उपकरणांवर जास्त अवलंबून असतात आणि वातानुकूलित वातावरणात राहतात. त्यांना कदाचित हेदेखील माहीत नसेल की, त्यांना हा आजार आहे. कारण- लक्षणे तितकी स्पष्ट नसतात आणि बहुतेकदा या आजाराची लक्षणे इतर आजारांच्या लक्षणांसारखी असू शकतात, ज्यामुळे निदान करणे कठीण होते,” असे डॉ. गोगटे सांगतात.
ड्राय आय डिसीजची इतर आजारांसारखी लक्षणे म्हणजे डोळे लाल होणे आणि डोळे पाणावणे, दुसरे म्हणजे कोरडेपणाची अॅलर्जीक प्रतिक्रिया. डोळे पाणावलेले दिसू शकतात; परंतु या अश्रूंमध्ये डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक घटक नसतात. म्हणूनच अलीकडच्या एका बहुकेंद्रित इटालियन अभ्यासात असे म्हटले आहे, “ड्राय आय डिसीजकडे अजूनही दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे उपचार करणे कठीण होते.”
अभ्यासात पुढे असे नमूद केले आहे की, ड्राय आय डिसीजमुळे कामावर आणि सामाजिक कार्यक्रमांमधील उपस्थितीवर परिणाम होतो.
ड्राय आय डिसीज होण्याचे कारण काय आहे (What causes dry eyes)
अश्रुपडद्याच्या बिघाडाची अनेक कारणे आहेत, ज्यात हार्मोनल बदल, ऑटोइम्युन रोग, पापण्यांच्या ग्रंथींना सूज येणे, अॅलर्जीक डोळ्यांचे आजार, अश्रूंचे उत्पादन कमी होणे आणि अश्रूंचे जलद बाष्पीभवन यांचा समावेश आहे. ए, बी१२ व डीसारख्या आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोळे कोरडे पडू शकतात.
डॉ. गोगटे म्हणतात, “रक्तदाबाविरुद्धची औषधे, अँटी-अॅलर्जिक गोळ्या, चिंताग्रस्त पदार्थ, हार्मोन्स, स्टिरॉइड्स, अँटीडिप्रेसेंट्स व आय ड्रॉपचा अतिवापर (त्यांचे संरक्षक अश्रू पडद्याला हानी पोहोचवतात) ही कारणे कारणीभूत ठरू शकतात.
पुण्यातील दादा आय लेसर इन्स्टिट्यूटचे संस्थापक व नेत्र शल्यचिकित्सक डॉ. जीवन लाडी म्हणतात, “तरुण व्यावसायिकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत आहे. डोळे पूर्णपणे न मिचकावल्याने पापण्यांमधील तेलग्रंथींना उत्तेजन मिळत नाही. परिणामी, अश्रूंचा थर अस्थिर होतो आणि त्यामुळे डोळे कोरडे होतात.”
ड्राय आय डिसीज होणे कसे टाळावा? (How to prevent dry eyes)
तुम्ही ज्या खोलीत आहात, त्या खोलीत थेट जास्त हवेचा प्रवाह किंवा पंखे कमी करा, स्क्रीन वापरण्याचा वेळ कमी करा, मोबाईल, लॅपटॉप वापरताना वारंवार ब्रेक घ्या आणि ह्युमिडिफायर वापरा. “अंधारात जास्त वेळ मोबाईल वापरल्याने डोळ्यांच्या लहान स्नायूंना थकवा येऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखी आणि चिडचिड होऊ शकते,” असे डॉ. लाडी सांगतात.
‘मेयो क्लिनिक’च्या एका सल्ल्यानुसार तुम्ही तुमचा संगणक स्क्रीन लाईट डोळ्यांच्या पातळीच्या खाली (below eye level) ठेवावा; जेणेकरून तुमच्या डोळ्यांवर जास्त ताण येणार नाही. ही बाब डोळे मिचकावताना तुमच्या अश्रूंचे बाष्पीभवन कमी करण्यास मदत करू शकते.
ड्राय आय डिसीज उपचारा कसे होतात? (What about treatment)
डॉ. लाडी सांगतात, “नवीन ल्युब्रिकंट्स आणि सायक्लोस्पोरिन आय ड्रॉप्स (Lubricants and cyclosporine eye drops) प्रभावी आहेत. आम्ही स्थानिक ल्युब्रिकंट आय ड्रॉप्स (local lubricant eye drop), टॉपिकल ऑक्युलर ल्युब्रिकंट (topical ocular lubricants) वापरू शकतो, पापण्यांची स्वच्छता करू शकतो (वॉर्म कॉम्प्रेस व लिड स्क्रब) आणि पौष्टिक पूरक आहार वापरू शकतो,”
दोन्ही डॉक्टर खात्री देतात, “जर हे काम करत नसेल, तर प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री ल्युब्रिकंट (preservative-free lubricants,), अश्रू व ओलावा टिकवून ठेवण्यासाठी अश्रू डक्ट प्लग (tear duct plugs), तसेच अश्रू ग्रंथींना अनब्लॉक करण्यासाठी पापण्यांवर नियंत्रित उष्णता आणि दाब लावणारी उपकरणे आहेत. त्याशिवाय टॉपिकल इन्फ्लेमेटरी आय ड्रॉप्स (topical inflammatory eye drop) आहेत.