Heartburn chest pain acidity: अॅसिडिटी व छातीत जळजळ किंवा हार्टबर्न ही एक अत्यंत अनेकांना जाणवणारी समस्या आहे. अनेकांना या त्रासदायक समस्येचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा तर हृदयाचे विकार म्हणून खूप तपासण्या केल्या जातात. व शेवटी काही न सापडल्यामुळे अॅसिडिटीचे निदान केले जाते. छातीत जळजळ ही वास्तविक पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहे, हृदयाशी नाही. पण छातीत जाणवणाऱ्या जळजळीमुळे तिला हार्टबर्न हे नाव पडले आहे.
काय आहे हार्टबर्न?
जेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेत येते, तेव्हा छातीत जळजळ होते. सामान्यतः अन्ननलिकेच्या खालच्या भागात असलेला स्फिंक्टर या आम्लाला पोटातच ठेवतो. पण काही वेळा हा स्फिंक्टर (अन्न नलिका व जठर या मधील वर्तुळाकार स्नायू) योग्य प्रकारे काम करत नाही आणि आम्ल वर येते. यालाच reflux असेही म्हणतात. सुरवातीस जळजळ होते पण कालांतराने तिथे जखमा होतात व त्यातून रक्त स्त्राव , अरुंद होणे अश्याही समस्या होऊ शकतात.
यासाठी काय खाद्य पदार्थ टाळावेत?
साधारणपणे जास्त तिखट व तेलकट पदार्थांमुळे हे होते असा समाज आहे व तो खरा आहे. या व्यतिरिक्त संशोधनानुसार, विशेषतः जास्त ऑस्मोलॅलिटी (osmolality) असलेले पदार्थ हार्टबर्न वाढवू शकतात: या मध्ये
- रस्सा भाज्या व पदार्थ. खूप रस्सा असलेल्या भाज्या व चिकन, मटन व मासे कमी खावेत. या रश्यामुळे जास्त पित्त निर्माण होते.
- फळांचे रस: • संत्र्याचा रस (६५० mOsm/kg) • सफरचंदाचा रस (७०० mOsm/kg) • द्राक्षांचा रस (११७० mOsm/kg)
- गोड पदार्थ: • सरबत (२००० mOsm/kg पर्यंत) • मिठाई • साखरयुक्त पेय. गुलाबजाम व रसगुल्ला याच्या बरोबर येणाऱ्या पाकामुळे जास्त अॅसिडिटी होते.
- मसालेदार पदार्थ: • पिझ्झा (१००० mOsm/kg च्या जवळपास)
- जास्त मीठ असलेले पदार्थ • तिखट मसालेदार जेवण
- चॉकलेट (अन्ननलिकेच्या स्फिंक्टरवर परिणाम करते) • कॉफी • अल्कोहोल. द्रवरूपी चॉकलेटमुळे जास्त त्रास होतो.
यासाठी काय करावे? १. नियमित जेवण करा, एका वेळी खूप जास्त जेवू नका २. रात्री झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी जेवण करा ३. जेवणानंतर लगेच झोपू नका ४. वजन नियंत्रणात ठेवा ५. धूम्रपान टाळा
घरगुती उपाय: १. कोमट पाणी प्या २. जिरे-धने पाणी प्या ३. केळी खा – ही नैसर्गिक अँटासिड आहेत ४. दही खा – प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारतात. 5.ज्येष्ठीमधाचं चाटण घ्यावे.
अम्लता कमी करण्यास मदत करू शकणारे काही पदार्थ
- ताक : आयुर्वेद ताकाला सात्विक गुणांचा मानतो
- दही: दह्यातील कॅल्शियम अतिरिक्त अॅसिड काढून टाकण्यास मदत करते
- कोमट पाणी : ते सकाळी रिकाम्या पोटी आणि झोपण्यापूर्वी प्या
- फळे आणि भाज्या: सफरचंद, केळी, पपई, डाळिंब, नाशपाती, खरबूज, करवंद, भेंडी , तोंडली, हिरव्या पालेभाज्या
- बडीशेप: एक नैसर्गिक अन्न जे अॅसिडिटीमध्ये मदत करू शकते.
- तुळशीची पाने
- नारळ पाणी
- वेलची: आम्लपित्त कमी करण्यास मदत करणारे अन्न
- या शिवाय अम्लता कमी करण्यास उच्च फायबरयुक्त पदार्थ, आले, लिंबू पाणी हे वापरले जाते.
डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?
जर हार्टबर्न आठवड्यातून अनेक वेळा होत असेल
जर अँटासिड औषधांनी आराम मिळत नसेल
जर खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असेल
छातीत दुखत असेल
हार्टबर्न ही गंभीर समस्या असू शकते, पण योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करून तिला नियंत्रित करता येते. जास्त ऑस्मोलॅलिटी असलेले पदार्थ टाळणे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या आहारावर लक्ष ठेवा आणि कोणते पदार्थ तुम्हाला त्रास देतात याची नोंद ठेवा.